वैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका

गणपतीचे संपूर्ण भारतात अस्तित्व बघायला मिळत असले तरी गणपतीचे पूजन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. विघ्नांचा नाश करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारा देव म्हणून गणपतीकडे बघितले जाते. विघ्नकर्ता असणारा गणपती पूजा केल्यास विघ्नहर्ता होतो. गणपतीच्या मूर्तीकडे बघताना सुटलेले पोट, हत्तीची सोंड, मोदक, भव्य गंडस्थल, आखूड मांड्या या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते. हिंदू दैवतांमध्ये ह्याचे आगमन उशिरा झाले असले तरी फार कमी कालावधीत हिंदू धर्मातील मुख्य देवता होण्याचा मान गणपतीने मिळवला आहे. प्रत्येक शुभकार्य हे गणपतीच्या पूजेशिवाय अशक्य आहे. शैव, वैष्णव, शाक्त पंथाप्रमाणे गणपतीला पुजणारा गाणपत्य पंथ उदयाला आला. फक्त गणपती करिता “गणेशपुराण” आणि “मुद्गलपुराण” अशा दोन उपपुराणांची निर्मिती झाली. हिंदू धर्माबरोबर गणपतीचे अस्तित्व बौद्ध आणि जैन धर्मातसुद्धा दिसून येते. अनेक आशियाई देशांमध्ये गणेश देवतेचा प्रसार झाला आहे. दक्षिणेकडील राज्यात गणपती ब्रम्हचारी असतो, तर महाराष्ट्रात रिद्धीसिद्धी त्याच्या दोन पत्नी आहेत.

हिंदू धर्मात शक्ती संकल्पनेचा उदय झाल्यानंतर प्रत्येक देवतेची शक्ती म्हणून देवतांना स्त्रीरुपात दाखवण्यास सुरुवात झाली. उदा. ब्रह्मा-ब्रह्माणी, विष्णु-वैष्णवी, महेश्वर-माहेश्वरी इ. मध्यकाळात मुख्य देवता म्हणून विनायकाची पूजा सुरु झाली आणि लवकरच विनायकाची शक्ती म्हणून वैनायकीची सर्वत्र पूजा होऊ लागली. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते मुख्य देवता म्हणून गणेशाचे पूजन होऊ लागले, त्याचवेळी गणेशाची शक्ती म्हणू गणेशानी हिचे पूजन होण्यास सुरुवात झाली असावी. विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेस्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. वैनायकीची काही नावे आहेत.

सहाव्या शतकातील वराहमिहिरलिखित “बृहदसंहिता” ग्रंथात मातृकांच्या मूर्तीविषयी खालील श्लोक आहे.

मातृगण: कर्तव्य: स्वनामदेवानुरूपकृतचिन्ह:|
रेवन्तोश्वारूढो मृगयाक्रीडादिपरिवार॥
(बृहतसंहिता, अध्याय ५७, श्लोक ५६)

श्लोकानुसार मातृका ज्या देवाच्या आहेत, त्या देवाचे रूप ध्यानात ठेवून बनवल्या पाहिजेत. यात कुठेही मातृकांच्या नावाचा उल्लेख नाही आहे. श्लोकातील पहिला ओळ मातृकांविषयी, तर दुसरी ओळ सूर्यपुत्र रेवंतविषयी आहे. उत्पल (९वे-१०वे शतक) यांनी बृहदसंहितेवर टीकात्मक ग्रंथ लिहिला. उत्पल यांनी बृहतसंहितेतील मातृकांच्या श्लोकावर टिका करताना मातृकांना ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, यामी, वारुणी, कौबेरी ही नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर नारसिंही, वाराही आणि वैनायकी या इतर मातृका आहेत असे सांगितले आहे.

सोळाव्या शतकात केरळ येथील श्रीकुमार यांनी देवतांच्या मूर्तीविषयी “शिल्परत्न” हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शक्ती-गणपतीचे वर्णन करणारा पुढील श्लोक आहे.

द्वाभ्यां विभ्राजमानं द्रुतकनकमहाशृङ्खलाभ्यां कराभ्यां
बीजापूरादिशुम्भद्दशभुजललितं पञ्चबीजस्वरूपम् |
सन्ध्यासिन्दूरवर्णं स्तनभरनमितं तुन्दिलं सन्नितम्बं
कण्ठादूर्ध्वं करीन्द्रं युवतिमयमधो (तं?) नौमि देवं गणेशम् ॥
(शिल्परत्न – उत्तरार्ध, अध्याय २५, श्लोक ७४)

सारांश: त्याचा कंठाखालचा भाग युवतीसारखा आणि कंठावरचा भाग हत्तीसारखा आहे. शेंदुरासारखा लाल वर्ण आणि स्तनामुळे झुकलेला तुंदिलतनू असा तो शक्तीगणपती आहे.

पुराणातील वैनायकीचे संदर्भ

स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक नाव आहे. परंतु अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये गजानना किंवा वैनायकी नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण आणि मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकी एक मातृका म्हणजे वैनायकी. लिंगपुराणात विनायकीचा उल्लेख आलेला आहे.

जैन आणि बौद्ध धर्मातील वैनायकीचे स्वरूप

जैन धर्मात वैनायकीची योगिनी म्हणून उपासना केली जात होती. बडोदा येथील जैन मंदिररातील हंस विजय संग्रहात “चतुष्षष्टियोगिनी” (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे.

बौध्दधर्माच्या वज्रयान पंथात वैनायकीला गणपतीहृदया नावाने ओळखले जाते. अमृतानंदलिखित “धर्मकोशसंग्रह” ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन नृत्यस्थिती, एकमुख, द्विभुज, एक हात वरदमुद्रेत आणि दुसरा हात अभयमुद्रेत असे करण्यात आले आहे. जैन आणि बौद्ध धर्मानी वैनायकीला आपल्या देवतांमध्ये समाविष्ट केले याच्यावरून तिचे महत्त्व दिसून येते.

सप्तमातृका आणि गणेश

वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून मातृकांना गणेशाची माता असे मानले जाते आणि म्हणूनच सप्तमातृकापटांमध्ये गणपती दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक हिंदू लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सप्तमातृकापट दिसून येतात. परंतु, पाटेश्वर लेण्यातील मातृकापटात गणपतीला स्थान देण्यात आलेले नाही. “सुप्रभेद आगम” ग्रंथात सप्तमातृकांबरोबर गणेश दाखवावा असे लिहून ठेवले आहे. सुप्रभेदागमनुसार सप्तमातृका/अष्टमातृका शिल्पपटात पूर्वेला वीरभद्र आणि पश्चिमेला गणपतीची मूर्ती असते. मातृकापटात उजव्या बाजूला पहिला गणपती आणि वीरभद्र (भैरव) डाव्या बाजूला सर्वात शेवटी असला पाहिजे असे भुवनदेव लिखित अपराजित पृच्छा या ग्रंथात नमूद केले आहे.

चतुर्भुजास्तु सर्वाश्च नलिनास्ताश्च संस्थिता: |
वीरभद्रन्तु पूर्वे तु विघ्नेशं पश्चिमं दिशि ॥
(सुप्रभेद आगम – मातृस्थानविधिपटल, ४२-६)

मातृणां च ततो वक्ष्ये भैरवादिगणांस्तथा |
वीरेशं कारयेव्दत्स वीणाहस्तं सनर्त्तनम् ॥
गणनाथं तत: कुर्यात् गजवक्त्रं महोत्कटम्
आदौ तु गणनाथं च ह्यन्ते कुर्यात्तु भैरवम् ॥
(अपराजित पृच्छा – २२३, १२-१३)

वैनायकीची लघुचित्रे

काही मोजक्या लघुचित्रांमधून (Miniature Paintings) पण आपल्याला वैनायकीचे दर्शन होते. नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश (शंकर) तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. एशियाटीक सोसायटी, कोलकाता येथे “गणपतीहृदया” देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रातील देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे.

वैनायकीची मूर्तीवैशिष्ट्ये

गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिसा, आसाम आणि तामिळनाडू येथे वैनायकीची काही शिल्प उत्खननात, तर काही शिल्प मंदिरात बघावयास मिळतात. उपलब्ध शिल्पांनुसार वैनायकी आसनस्थ, वाहनावर आरूढ, उभी किंवा क्वचित नृत्यावस्थेत असते. वैनायकी शिल्प दोन किंवा चार हातांची आहेत. तसेच हातामध्ये परशु, पास, कमळ, दंड, सर्प, दात, मोदकपात्र, जपमाळ इ. विविध आयुधे किंवा वस्तू धारण केलेल्या आहेत. तसेच त्या अभयमुद्रा (संरक्षण) आणि वरदमुद्रेत (आशीर्वाद) असतात.

इतर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वैनायकी शिल्प

मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवातीचा आहे असे मानले जाते. ही मूर्ती द्विभुज असून डाव्या हातात कमळाचे फुल धरले आहे. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे. सतना (मध्य प्रदेश) येथे उत्खननात सापडलेली आणि सध्या कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात असलेली दहाव्या शतकातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. सिंहारूढ वृषभा मातृकेच्या मांडीवर बालगणेश बसलेला आहे. सिंहाच्या पायाजवळ आसनस्थ चतुर्भुज वैनायकी आहे. हिच्या हातात कमळाचे फुल आणि दुसऱ्या हातात पुष्प आहे. उजव्या हातात गदेसारखे शस्त्र आणि डावा हात नष्ट झाला आहे. बहुदा या हात मोदकपात्र असावे. वृषभा मातृकेच्या खालील भागात श्री वसभा (श्री वृषभा) असे कोरलेले आहे.. चिदंबरम, तामिळनाडू येथे नटराजाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेली वैनायकीची मूर्ती सोळाव्या शतकात विजयनगर राज्यकाळात तयार केली आहे. या मूर्तीचा कमरेच्या वरील भाग वैनायकीचा असून कमरेखालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. या वैनायकीची आजही तेथील स्थानिकांकडून पूजा केली जाते. व्याल आणि वैनायकी यांचे संयुक्त असे हे एकमेव शिल्पांकन आहे. याशिवाय चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये वैनायकीचे शिल्प बघायला मिळते.

महाराष्ट्रातील वैनायकी शिल्प

महाराष्ट्रात वैनायकीची शिल्प यादवकालीन भुलेश्वर मंदिर (पुणे), पाटेश्वर मंदिर (सातारा) आणि योगेश्वरी मंदिर (आंबेजोगाई) येथे बघायला मिळतात.

पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी

साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदू लेणीसमूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मूर्तीच्या हातात परशु, पाश(?), सुळा आणि लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. मस्तकावर असलेल्या किरीटमुकुटाभोवती प्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून आहे आणि उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे.

भुलेश्वर मंदिरातील वैनायकी

पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. मंदिराच्या  प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचीवर दोन वैनायकी मूर्ती आहेत. परंतु येथील वैनायकी इतर मातृकांबरोबर आहेत. हे दोन्ही मातृकापट आहेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. दुसऱ्या शिल्पपटात वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. दोन्ही वैनायकी सालंकृत (पायात वळे, हातात कंकणे, गळ्यात वक्षभूषण व कंठभूषण दागिने) आणि पद्मासनात बसलेल्या आहेत. एका वैनायकीने हातात अंकुश, पाश(?), दात आणि लाडूपात्र धारण केले. दुसऱ्या वैनायकी शिल्पाचा डावा हात नष्ट झालेला आहे. पण ह्या हातात लाडूपात्र असावे आणि इतर आयुधे आधीच्या वैनायकीप्रमाणे धारण केली आहेत. ­

योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील वैनायकी

आंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील कोनाड्यात वैनायकीची मूर्ती आहे. वैनायकीला सोळा हात असून मोदक, जपमाळ, तलवार, गदा आणि इतर आयुधे धारण केली आहेत. वैनायकीचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. सोंडेचे टोक डाव्या हातातील लाडूला स्पर्श करते आहे. मोरपिशी रंगाची साडी नेसलेली वैनायकी पद्मासनात बसलेली आहे. प्रत्येक हातात कंकण आणि डोक्यावर मुकुट याशिवाय इतर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत.

वैनायकीबद्दल मूर्तिशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये (अपवाद श्रीकुमाररचित शिल्परत्न) जास्त माहिती मिळत नसल्यामुळे तिच्याभोवती एक वेगळेच गूढवलय निर्माण झाले आहे. वैनायकीचे कोडे सोडवायचे असेल तर अजून संशोधन होणे गरजेचे आहे आणि ह्या संशोधनातूनच वैनायकीची नवीन माहिती उजेडात येईल.