थोडेसे ||महाराष्ट्र देशा|| बदल

आधुनिक भारतातील एक प्रगत राष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा इतिहास किती जुना आहे याचा अभ्यास करताना जाणवले, मराठी लोकांना आपल्या राज्याच्या इतिहासाबद्दल फार उदासीनता दिसून येते. महाराष्ट्राचे प्राचीन संदर्भ, राज्यकर्ते, प्राचीन स्थापत्यकला, मूर्तिशास्त्र, शिलालेख, वारसा स्थळे यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नसते.

रामायणकाळात वनवासात असताना राम-सीता-लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दंडकारण्य म्हणजे नासिक, महाभारतातील विराट राजाची नगरी म्हणजे वाई किंवा संगम-नेरजवळील जोर्वे म्हणजे पूर्वीची जरासंधनगरी. महाराष्ट्रात प्रागैतिहासिक संस्कृतींचे अवशेष जोर्वे (ताम्रपाषाणयुग-जोर्वे संस्कृती), प्रकाश (ताम्रपाषाणयुग), नेवासे (जोर्वे संस्कृती), दायमाबाद (ताम्रपाषाणयुग – तीन कालखंड) आणि इनामगाव (माळवा संस्कृती, पूर्व-जोर्वे संस्कृती आणि उत्तर-जोर्वे संस्कृती) येथे मिळाले आहेत. १६ महाजनपदांपैकी एक असलेले अश्मक महाजनपद म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या खोऱ्यातील काही भाग. सोपारा/सूर्पारक (नालासोपारा) येथील इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील स्तूप आणि तेथेच मिळालेला सम्राट अशोकाचा लेख हे फक्त ऐकून माहिती असते.

भारतात असलेल्या १२०० लेण्यांपैकी ८००-९०० लेणी फक्त महाराष्ट्रात पसरलेली आहेत. बौद्ध, जैन आणि हिंदू अशा वेगवेगळ्या धर्माची लेणी महाराष्ट्रात आहेत. लेणी म्हणजे काय, त्यांचा उपयोग, भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले लेणे कोणते, कोणी कोरले हे लेणे, कोणती राजसत्ता येथे राज्य करत होती, बौद्धलेण्यातील शिलालेख काय माहिती देतात हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही.

सातवाहन, शिलाहार, राष्ट्रकुट, वाकाटक, अभिर, चालुक्य, त्रैकुटक, यादव या महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या राजसत्ता. यांच्या काळात अनेक लेणी आणि मंदिरे निर्माण झाली. भाजे हे महाराष्ट्रातील पहिले लेणे आणि तेर येथील त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य मंदिर. महाराष्ट्रातील अनेक गावात कलाकुसरयुक्त मंदिरे बघायला मिळतात. त्यांच्यावर असल्या विविध देवता, सुरसुंदरी सारे काही अप्रतिम. पण आपल्याला मंदिरावरील मूर्तिशास्त्राबद्दल फार कमी माहित असते.

१२-१३ व्या शतकातील वीरगळ, सतीशिळा, गद्धेगाळ/गद्धेगळ यांच्याबद्दल आपण फारच अंधारात आहोत. कदाचित त्यामुळेच वीरगळ आणि गद्धेगाळ/गद्धेगळ यांचे देवतेत रुपांतरण कधी होते हे कळतच नाही.

महाराष्ट्र आणि किल्ले यांचे अतूट नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे आणि महाराष्ट्रातील किल्ले यांच्या सहाय्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्रात आजमितीस ३५० किल्ले आहेत. पण आपल्याला किल्ल्यावर गेल्यावर काय बघायचे, त्या वास्तूचे महत्त्व आणि इतिहास हेच मुळात माहिती नसते.

ब्रिटीशांच्या काळात महाराष्ट्रात अनेक इमारती बांधल्या गेल्या. आज ह्यातील अनेक इमारतींची वारसास्थळांमध्ये गणना होते. पण त्या स्थळाबद्दल आपल्याला काहीच नसते.

वरील सर्व विषयांची माहिती सर्वसामान्य लोकांना नसल्यामुळे लेणी, किल्ले, मंदिरांना फक्त भेट दिल्या जातात. ||महाराष्ट्र देशा|| या संकेतस्थळावर लेणी, शिलालेख, मंदिरांची स्थापत्यशैली, महाराष्ट्रातील अपरिचित ठिकाणे, मूर्तीकला, वीरगळ/गद्धेगळ या आणि इतर अनेक विषयांवर ससंदर्भ माहिती देण्याचा मानस आहे.

२००० साली सह्याद्रीतील भटकंतीला केली तेव्हा आपल्याकडे असलेल्या अमूल्य ठेव्याची किंमत कळाली. किल्ले बघत असताना लेणी आणि मंदिरांकडे लक्ष गेले. लेण्यांची ओळख करून घ्यायची असेल तर ब्राम्हीलिपीची ओळख महत्त्वाची. त्यातून ब्राम्ही, तेलगु, मोडी, शारदा, नेवारी इ. लिपींची माहिती करून घेतली.

संकेतस्थळाचे नाव जरी ||महाराष्ट्र देशा|| असले तरी येथे महाराष्ट्राबाहेरील आणि जमल्यास भारताबाहेरील वारसास्थळांची माहिती वाचायला मिळेल. नुसतीच माहिती दिली तर रटाळवाणे होऊ शकते, म्हणून माहितीबरोबर शक्य तेवढे फोटोसुध्दा बघायला मिळतील.

त्याचबरोबर तुमच्याकडे एखाद्या अपरिचित स्थळाची किंवा तुमच्या गावाकडील जत्रेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर आम्हाला संपर्क करा.

पंकज समेळ, ||महाराष्ट्र देशा||

ईमेल: maharashtradesha@outlook.com / info@maharashtradesha.in

Mobile: 7304689086 / 9820254601