सर अलेक्झांडर कनिंगहॅम – पुरातत्व खात्याचे पहिले महानिदेशक

भारतात मोठ्या प्रमाणात पुरावशेष पसरलेले होते, पण भारतीयांना पुरातत्वविद्येचे ज्ञान अवगत नसल्यामुळे अनेक पुरावाशेष नष्ट होत होते. ब्रिटीश भारतात आल्यानंतर येथील पुरावशेष बघून अनेक ब्रिटीश अभ्यासकांनी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. ग्रीक इतिहासकारांनी उल्लेखलेला सॅन्ड्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे सिद्ध करणारे सर विलियम जोन्स, सांचीच्या स्तूपाचा शोध लावणारे कॅप्टन फेल, साष्टी बेटावर असलेल्या जोगेश्वरी, मागठाणे, मंडपेश्वर आणि कान्हेरी लेण्यांवर पहिल्यांदा लिखाण करणारे हेन्री सॉल्ट, ब्राम्ही व खरोष्टी या दोन प्राचीन लिपींचा उलगडा करणारे जेम्स प्रिन्सेप इ. तज्ञांकडून वैयक्तिकरित्या संशोधन होत होते. परंतु, भारतीय पुरातन क्षेत्रात संस्थात्मक कार्य व्हायला पाहिजे याची जाणीव पहिल्यांदा अलेक्झांडर कनिंगहॅम यांना झाली. तसेच पुरातत्वविषयक विविध शाखांचा पाया घालण्याचे श्रेय पण कनिंगहॅम यांचेच.

अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म २३ जानेवारी १८१४ रोजी इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर येथे झाला. सैनिकी शिक्षण घेतलेल्या अलेक्झांडर यांनी बंगालमध्ये अभियंत्यांच्या तुकडीतून वयाच्या एकोणीसाव्या वर्षी कमिशन घेतले. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भूसेनेत विविध हुद्द्यांवर सन १८३३ ते १८६२ पर्यंत म्हणजे सुमारे ३३ वर्ष कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाले तेव्हा ते मेजर जनरल होते. सैन्यात कार्यरत असतानाच त्यांची ओळख कलकता टाकसाळीत कार्यरत असलेल्या आणि ब्राम्ही व खरोष्टी लिपींची उलगडा करणाऱ्या जेम्स प्रिन्सेप यांच्याशी झाली. प्रिन्सेप यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कनिंगहॅम यांना पुरातत्व विषयात रुची निर्माण झाली आणि नाणकशास्त्र व इतिहास यांच्या अभ्यासाला सुरुवात केली.

कनिंगहॅम यांनी १८३४-३५ साली सारनाथ येथील धामेक स्तूप आणि १८३५-३६ साली स्तूप परिसरात उत्खनन केले. धामेक स्तूपचे उत्खनन हे भारतातील पुरातत्वीय अभ्यासासाठी केलेले पहिले उत्खनन होते. २२ एप्रिल १८४० साली जेम्स प्रिन्सेप यांच्या अकाली निधनानंतर कनिंगहॅम यांनी प्रिन्सेप यांचे इंडो-ग्रीक आणि शक राजवटींचा अभ्यास हे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यास सुरुवात केली.

कनिंगहॅम यांनी सांची येथील भिल्सा स्तूपाचा सखोल अभ्यास केला आणि त्याचबरोबर संकीसा या बौद्धकालीन शहराचे स्थान निश्चित केले.

भारतातील पुरातत्व क्षेत्रात संस्थात्मक कार्य व्हायला पाहिजे यासाठी कनिंगहॅम पाठपुरावा करत होते. पण, त्यांना यश मिळत नव्हते. भारतात पुरातत्व सर्वेक्षण किती महत्त्वाचे आहे यावर आधारित ‘Proposed Archaeological Investigations’ हा लेख एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात सन १८४८ साली प्रकाशित झाला. संस्थात्मक कार्य व्हावे म्हणून बरीच वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना नोव्हेंबर १८६१ मध्ये लॉर्ड कॅनिंग यांच्यासमोर भारतातील पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करणे किती गरजेचे आहे हा विषय मांडण्याची संधी मिळाली. लॉर्ड कॅनिंग यांच्या भेटीत कनिंगहॅम यांनी ब्रिटीश सरकारने आपल्या शंभर वर्षांच्या काळात प्राचीन वास्तुंचे जतन करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही किंवा फार कमी प्रयत्न केल्याचे दाखवून दिले. तसेच या वास्तुंचे जतन न केल्यास त्या नष्ट होतील असे नमूद केले. प्राचीन वास्तुंचे जतन व त्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण संस्था किती महत्त्वाची आहे हे त्यांनी आपल्या भेटीत लॉर्ड कॅनिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत सिद्ध केले.

अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या सबळ पुराव्यामुळे पुरातत्वीय सर्वेक्षण संस्था स्थापन करण्यास लॉर्ड कॅनिंग यांनी तयारी दर्शवली. त्याप्रमाणे पुरातत्वीय स्थळांचे अचूक नकाशे, मोजमाप, आराखडे, शिलालेख आणि छायाचित्रांसाठी उत्तर भारतात सर्वेक्षण संस्था स्थापन करण्यास गव्हर्नर जनरल यांनी प्रस्ताव दिला. तसेच भारतातील इतर अधिकाऱ्यांच्या मानाने अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा या विषयातील सखोल अभ्यास असल्यामुळे हे काम त्यांच्या अधिपत्याखाली करण्यात यावे असे सांगितले. तसेच या कामासाठी त्यांना दरमहा ४५० रुपये पगार आणि विविध स्थळांच्या भेटीसाठी २५० रुपये देण्यात यावे असा प्रस्ताव सादर केला. या सर्व प्रस्तावांबरोबर कनिंगहॅम यांनी शोधलेल्या पुरावशेषांमध्ये भागीदारी द्यावी अशी अट सुद्धा प्रस्तावामध्ये टाकण्यात आली.

लॉर्ड कॅनिंग यांनी सादर केलेली योजना सरकारने मान्य केला. पण या योजनेअंतर्गत फक्त पुरावशेषांचे सर्वेक्षण, त्यांचे वर्णन व इतिहासाची नोंद करणे इ. बंधन घालण्यात आली होती. या योजनेत सरकारला जास्त खर्च करायचा नसल्यामुळे वास्तुंचे जतन किंवा उत्खनन करायचे नाही असे धोरण असे सरकारने निश्चित केले. त्याप्रमाणे सरकारने तयार केलेली पुरातत्व सर्वेक्षण खात्याची नियमावली १ डिसेंबर १८६१ साली अलेक्झांडर कनिंगहॅम यांना सोपवली. पदाचा कार्यभार स्वीकारताच सातव्या शतकात भारतात आलेल्या चीनी भिक्षुक हुएन-त्सांग याने आपल्या प्रवासवर्णनात नमूद केलेल्या विविध बौद्ध धर्मस्थळांची स्थाननिश्चिती करण्यास सुरुवात केली.

पहिल्या वर्षात कनिंगहॅम बोधगया येथील २४ अवशेषांचे आणि अशोककालीन बाराबर लेण्यांचे स्थान निश्चित केले. आगामी काळात त्यांनी फतेहगड, कनौज, रुरकी, कलसी आणि मथुरा ते दिल्ली या परिसराचे सर्वेक्षण केले. त्यांनी संकीसा येथील पुरावशेषांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर कलसी येथील अशोकाच्या शिलालेखाचा ठसा घेतला. तसेच पंजाब आणि परिसराचा अभ्यास करून अलेक्झांडर यांच्या मोहिमेत उल्लेखलेल्या जागांची स्थाननिश्चिती केली. त्याचबरोबर जमालगडी, युसुफझाई, तक्षशीला, सरहिंद इ. ठिकाणांची सखोल माहिती आपल्या रिपोर्टमध्ये दिली. सन १८६५ पर्यंत कनिंगहॅम यांनी गया ते सिंधू आणि कलसी ते धामनेर लेणी या भागांचे सर्वेक्षण करून तेथे असलेल्या पुरावशेषांची नोंद करून ठेवली.

सर चार्ल्स वूड यांनी २८ जून १८६४ साली लिहिलेल्या पत्रात कनिंगहॅम आणि संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे. परंतु लॉर्ड लॉरेन्स यांच्या सरकारने सर्वेक्षण खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आणि ९ फेब्रुवारी १८६६ साली कनिंगहॅम इंग्लंड साठी रवाना होताच या विभागाचे काम पूर्ण थांबले. सन १८६६ ते १८७१ या काळात सर्वेक्षणाचे काम फक्त स्थानिक पातळीवर चालू होते. पण ११ जानवारी १८७० साली ड्युक ऑफ आर्गिल यांच्या प्रस्तावामुळे पुरातत्व खात्याचे बंद पडलेले काम पुन्हा सुरु करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. ड्युक ऑफ आर्गिल यांच्या प्रस्तावाचे लॉर्ड मायो यांनी स्वागत केले. “प्राचीन अवशेषांचे जतन करणे, त्यांची नोंद ठेवणे हे देशाचे महत्त्वाचे कार्य आहे. इतर सर्व देशात अशा प्रकारे कार्य होत असताना भारतासारख्या देशात जिथे मोठ्या प्रमाणात पुरावशेष सापडत असूनही त्यांचे जतन व नोंद ठेवणे यांच्या दृष्टीने भारतात फार कमी काम झाले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीखाली पुरावशेषांचे उत्खनन, जतन, त्यांचा इतिहास आणि नोंद ठेवण्यासाठी एखादी संस्था असावी असे माझे ठाम मत आहे.” अशी नोंद लॉर्ड मायो यांनी ३० मे १८७० च्या पत्रात करून ठेवली आहे.

मायो यांच्या पत्रामुळे तातडीने केंद्र सरकारच्या अखत्यारीखाली महानिदेशक यांच्या अखत्यारीखाली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच या खात्याची धुरा पुन्हा जनरल कनिंगहॅम यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याचबरोबर खात्यात हुशार स्थानिकांची भरती करून त्यांना छायाचित्रे घेणे, वास्तुंचे सर्वेक्षण आणि मोजमाप, शिलालेखांचा अभ्यास आणि उत्खननासंदर्भात मार्गदर्शन इ. गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात यावे अशी इच्छा सरकारने व्यक्त केली.

इंग्लंडवरून कनिंगहॅम पुन्हा भारतात आले आणि त्यांनी आपल्या पदाचा भार फेब्रुवारी १८७१ साली स्वीकारला. सन १८७२ मध्ये त्यांनी राजपुताना, बुंदेलखंड, मथुरा, बोधगया आणि गौर या प्रांताचा दौरा केला. सन १८७३-७७ या काळात कनिंगहॅम यांनी संपूर्ण मध्य प्रांत, बुंदेलखंड आणि माळवा प्रांत पालथा घातला होता. तसेच पहिल्यांदा त्यांचे भरहुत या भव्य स्तुपाकडे लक्ष गेले. त्याचबरोबर त्यांनी अनेक अशोककालीन एकाश्म स्तंभ आणि इतर अवशेष, गुप्त आणि गुप्तोत्तर कालखंडातील पुरावशेष उजेडात आणले. सन १८७८-७९ मध्ये त्यांना तक्षशीला येथे अलेक्झांडरपूर्व काळातील भारतीय नाण्यांचा साठा मिळाला. बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यादरम्यान बंगाल येथील पाल राजघराण्याशी निगडीत धर्मपाल याचा शिलालेख मिळाला. सन १८८०-८१ मध्ये कनिंगहॅम यांनी बोधगया येथील मंदिर साफ केले आणि त्याचबरोबर चीनी भिक्षुकांनी त्यांच्या प्रवासवर्णनात नमूद केलेल्या अनेक स्थळांची स्थाननिश्चिती केली.

अनेक पुरावशेष उजेडात आणणाऱ्या कनिंगहॅम यांच्या मेहनतीचे सार त्यांनी त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे नमूद करून ठेवली आहे.

‘I have identified the sites of many of the chief cities and most famous places of ancient India, such as the rock of Aoronos, the city of Taxila, and the fortress of Sangala, all connected with the history of Alexander the Great. In India I have found the sites of the celebrated cities of Sankisa, Sravasti and Kausambi, all immediately connected with the history of Buddha. Amongst other discoveries I may mention the Great Stupa of Bharhut on which most of the principal events of Buddha’s life were sculptures and inscribed. I have found three dated inscriptions of King Asoka, and my assistants have brought to light a new pillar of Asoka, and a new text of his rock edicts in Bactrian characters, in which the whole of the 12th edict, which is wanting in the Shahbazgarhi text is complete.

 I have traced the Gupta style of architecture in the temples of the Gupta Kings at Tigowa, Bilsar, Bhitargaon, and Deogarh, and I have discovered new inscriptions of this powerful dynasty at Eran, Udaygiri and other places.’

कनिंगहॅम यांनी सन १८५३ आणि १८५६ मध्ये हरप्पा येथील अवशेषांकडे लक्ष आकर्षित झाले. पण प्रत्यक्ष उत्खननास सन १८६३ मध्ये सुरुवात झाली. या उत्खननात अनेक मृदभांड्यांचे अवशेष आणि बैलाचे चित्र असेलेली मुद्रा मिळाली. परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणात हरप्पा येथे उत्खनन केले नाही आणि त्यामुळे एका मोठ्या संस्कृतीचा शोधापासून त्यांना मुकावे लागले.

विविध ठिकाणांचे सर्वेक्षण करत असताना मिळणाऱ्या शिलालेखांच्या बाबतीत पद्धतशीर आणि नियोजनबद्ध काम व्हावे असे त्यांना वाटत होते आणि त्यादृष्टीने त्यांनी काम करायाला सुरुवात केली. सन १८७७ मध्ये मौर्य राजा अशोक आणि त्याचा नातू यांचे शिलालेख असलेला Corpus Inscriptionum Indicarumचा पहिला खंड प्रकाशित झाला. या खंडात शिलालेखाचे वाचन, त्यांचा इंग्लीश अर्थ, शिलालेखांचे ठसे आणि छायाचित्रे देण्यात आली आहेत.

सर्वेक्षणात शिलालेख मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे शिलालेखांचे वाचन करण्यासाठी, तसेच त्यांचे ठसे घेण्यासाठी पूर्णवेळ पुराभिलेखतज्ञाची गरज भासायला लागली आणि त्याप्रमाणे तसा प्रस्ताव कनिंगहॅम यांनी सरकारकडे पाठवून दिला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जे. एफ. फ्लिट यांची पुराभिलेखतज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच अरबी आणि फारशी शिलालेख वाचण्याची जबाबदारी हेन्री ब्लॉकमन यांच्याकडे सोपवली.

कनिंगहॅम यांनी १ ऑक्टोबर १८८५ साली आपली निवृत्ती पत्करली आणि लेखन व संशोधनाला वेळ देण्यासाठी पुन्हा लंडनल परत आले. पुरातत्व खात्याची त्यांनी सुमारे १८ वर्षे धुरा सांभाळली. या दीर्घ कारकि‍र्दीमध्ये त्यांनी बराच उत्तर भारत पालथा घातला आणि अनेक पुरावशेष उजेडामध्ये आणले. त्याचबरोबर नाणकशास्त्र, भूगोल, मंदिरे, स्तूप, शिलालेख इ. विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. तसेच पुरातत्वखात्यातर्फे केलेल्या संशोधनकार्याचे सुमारे २१ अहवाल प्रकाशित केले.

कनिंगहॅम यांच्या मते पुरातत्व म्हणजे स्थापत्य, शिल्प, नाणी आणि शिलालेख यांचा अभ्यास.तसेच त्यावेळी पुरावशेष मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे, त्यांचा शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्याकडे आणि कालनिश्चितीकडे कल नव्हता.

कनिंगहॅम यांची महत्त्वाची पुस्तके

१) LADĀK: Physical, Statistical, and Historical with Notices of the Surrounding Countries (1854), २) Bhilsa Topes (1854), a history of Buddhism, ३) The Ancient Geography of India (1871), ४) Archaeological Survey of India Vol. 1 (1871) Four Reports Made During the Years, 1862-63-64-65, Volume 1 (1871), ५) Archaeological Survey of India Vol. 2, ६) Archaeological Survey of India Vol. 3 (1873), ७) Corpus Inscriptionum Indicarum. Volume 1. (1877), ८) The Stupa of Bharhut: A Buddhist Monument Ornamented with Numerous Sculptures Illustrative of Buddhist Legend and History in the Third Century B.C. (1879), ९) The Book of Indian Eras (1883), १०) Coins of Ancient India (1891), ११) Mahâbodhi, or the great Buddhist temple under the Bodhi tree at Buddha-Gaya (1892), १२) Coins of Medieval India (1894), १३) Report of Tour In Eastern Rajputana

संदर्भ

  • कनिंगहॅम, सर अलेक्झांडर, https://vishwakosh.marathi.gov.in/16578/
  • Roy, Sourindranath, The story of Indian Archaeology, 1784-1947, New Delhi, 1961
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.