अपरादित्य दुसरा याचा नांदुई शिलालेख

उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजघराण्याचा अभ्यास करण्यासाठी शिलालेख आणि ताम्रपट मोलाची भूमिका पार पाडतात. शिलाहार राजा अपरादित्य दुसरा याचा शके १११९ (सन ११९७) मधील शिलालेख असलेली गध्देगळ छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या प्रांगणात ठेवली आहे.

उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजघराण्याचा अभ्यास करण्यासाठी शिलालेख आणि ताम्रपट मोलाची भूमिका पार पाडतात. शिलाहार राजा अपरादित्य दुसरा याचा शके १११९ (सन ११९७) मधील शिलालेख असलेली गध्देगळ छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या प्रांगणात ठेवली आहे.

अपरादित्य दुसरा याचा शिलालेख असलेली गध्देगळ पालघर जिल्ह्यातील वाडा या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे १८-१९ किमीवर असलेल्या नांदुई गावात सापडली. नांदुई येथून ही शिळा वसई जवळील माणिकपूर येथील दुमजली इमारतीत हलवली. नंतरच्या काळात सदर गध्देगळ माणिकपूर येथून छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय) हलवण्यात आली. परंतु, संग्रहालयात कोणत्या वर्षी आणण्यात आली याची काहीही माहिती उपलब्ध नाही आहे. बॉम्बे गॅझेटीयर (जुनी आवृत्ती), खंड १४  (पान क्रमांक ३८७) आणि डॉ. दीक्षित यांनी महाराष्ट्रांतील कांही प्राचीन ताम्रपट व शिलालेख या दोन पुस्तकांमध्ये वरील शिलालेखाची नोंद करण्यात आलेली आहे.

उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजघराण्याचा अभ्यास करण्यासाठी शिलालेख आणि ताम्रपट मोलाची भूमिका पार पाडतात.

गध्देगळ अंदाजे ५ फूट उंच आणि २.६ फूट रुंद आहे. वरील भागात चंद्र व सूर्य कोरले असून दोघांच्या मध्ये संन्यासाची मूर्ती कोरली. संन्यासी अंदाजे एक फूट उंच असून तो पद्मासनात बसलेला असून हात जोडलेले आहेत. त्याच्या डाव्या खांद्याजवळ कमंडलू कोरलेला आहे. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. लेखातील शेवटच्या तीन ओळीतील सोडल्यास, संपूर्ण शिलालेख गद्यात आहे. लेखाच्या शेवटी स्त्री-गाढव यांचे शिल्प कोरण्यात आलेले आहे.

मल्लिकार्जुननंतर अपरादित्य दुसरा सत्तेवर आला. नांदुई व्यतिरिक्त अपरादित्य दुसरा याचे लोणाड (शके ११०६, सन ११८४), ठाणे (शके ११०७, सन ११८५), परळ (शके ११०८, सन ११८७) हे शिलालेख उपलब्ध आहेत. शिलाहार राजघराण्यात एकूण दोन अपरादित्य राजे होऊन गेले. अपरादित्य पहिला याचे वडवली (शके १०४९), सिंत्रा-पोर्तुगाल (शके १०५९) आणि चांजे (शके १०६०) हे तीन शिलालेख उपलब्ध आहेत.

वाचन

सिध्दम् | (स्वस्ति) | (जयश्चा) भ्युदयश्च | सकनृपकालातीत(संवत्सरे)षु नवत्यधिके-
ष्वेकादससतेषु (यत्रांकतोपि) सकसंवतु ११(१)९ प्रवर्त्तमानेषु कार्त्तिक वदि १० गुरौ
अस्यां संवत्सरमासपक्षदिवसपूर्व्वायां तिथौ अद्येह समधिगत(पंच)महासब्दामहा-
सामंताधिपतितगरपुरपरमेस्वरश्रीसेलहारनरेंद्रजीमूतवा(हनान्वय)प्रसूतसुवर्ण्णगरुड- (ध्वजाभि)मानमहोदधित्यागजगझंपझंपडाचार्यानि:संकलंकेस्वर….(म)हाजिभूमिमार्त –
ड …… पस्चिमसमुद्राधिपतिसरणागतवज्ज्रपं(ज)रेत्यादिसम-
(स्तराजावलिविरा)जितमहाराजाधिराजकोंकणचक्रवर्तिश्रीमदपरादित्यदेवकल्याण-
विजयराज्ये | तथैतत्प्रसादावाप्तसमस्तराजमंडलचिताभारं समुद्वहति | महामात्यश्री-
अमुक नायकश्री(करण)साहामल्ल प्रथमछेपाटी द्वितीयछेपाटी तृतीय –
छेपाटी चतुर्थछेपाटी इत्यादिश्रीकरणे सत्येतस्मिनु काले प्रवर्त्तमाने सा(तु)-
(लीग्रामशासनं) समभिलिक्षते यथा श्रीजोघुनायकप्रभु ब्रा(मा)नायक श्री-
….. नायक …. सतृणकाष्ठोदकोपेतं पूर्वदत्तदेवदा –
यविवर्जितं (क्षेत्रं) …. श्रीसोमेश्वरदेवपादाभियाजकश्रीवेदांगरासिका-
य उदकाति(सर्गेण प्रदत्तं|) वहुभिर्व्वसुधा भुक्ता राजभि: सगरादिभि: | जस्य ज-
(स्य जदा भूमिस्तस्य तस्य) तदा (फ)लं || लुप्यति लोपाय(ति) वा | तस्य मातरं गर्द्दभो
ज …… (|) (यदत्र ऊनाक्षरमधि)काक्षरं वा तत्सर्व प्रमाणमिति (|) मंग(लं) महाश्री || छ छ ||

भाषांतर

सिध्दी असो. शके अकराशे अधिक नव्वद, शके १११९ कार्तिक वद्य १० गुरुवार – वर्ष, मास, पक्ष, दिवस, तिथी आधी नमूद केल्याप्रमाणे आजच्या तिथीला –
महाराजाधिराज, कोकणचक्रवर्ती, पराक्रमी अपरादित्य (दुसरा), ज्याने पंचमहाशब्द, महासामंताधिपती आणि इतर बिरुदे धारण केली आहेत त्याच्या राज्यकाळात आणि त्याच्या कृपेने राज्याच्या कारभारावर लक्ष ठेवणारे महामात्य अमुक नायक, सचिव साहामल्ल, प्रथम छेपाटी (कोषाध्यक्ष), द्वितीय छेपाटी, तृतीय छेपाटी आणि चतुर्थ छेपाटी हे अधिकारी असताना –
सातुली गावासंदर्भात ही आज्ञा खालीलप्रमाणे देण्यात येत आहे –
जोघुनायक, ब्रामानायक, …. नायक (यांच्या उपस्थितीत) वर नमूद केलेले गाव आणि त्यातील गवत, लाकुड आणि पाणी यांच्यासहित, पण पूर्वी देवाला दिलेले दान सोडून, सोमेश्वर देवाचे पुजारी वेदांगराशिका यांना दान देण्यात आले.
दानाच्या उल्लेखानंतर आशीर्वाद देण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर या आज्ञेचा भंग केल्यास किंवा तसा प्रयत्न केल्यास त्यांच्या आईला गाढव झवेल असा सुध्दा शाप (शिल्परुपात) देण्यात आलेला आहे.

शिलालेखाच्या सुरुवातीला लेखाचा काल अक्षरात आणि आकड्यात सांगितला आहे. परंतु ह्या दानपत्राच्या लेखकाकडून शकाच्या बाबतीत चूक झाली आहे. अक्षरी कालगणनेत शके ११९० आणि आकडी कालगणनेत शके १११९ असे लेखात कोरलेले आहे. लेखात नोंद केलेली तिथी, महिना आणि पक्ष हे सर्व शके १११९ शी जुळून येतात. तसेच अपरादित्य (दुसरा) याच्या इतर शिलालेखांचा काळ बघता आकड्यात नोंद केलेले शके १११९ बरोबर आहे. नोंद केलेली तिथीशके १११९ शिलालेखाचा उद्देश सोमेश्वर मंदिराचे पुजारी वेदांगराशी यांना सातुली गावातील दिलेल्या जमिनीच्या संदर्भात आहे. लेखात उल्लेखलेले वेदांगराशी पाशुपत पंथाशी निगडीत असावे आणि त्यांचीच मूर्ती शिलालेखाच्या वरील भागात कोरलेली असावी. शिलालेखात नमूद केलेले सातुली म्हणजे म्हणजेच वसई-माणिकपूरपासून अंदाजे ५ किमीवर अंतरावर असलेले सातिवली गाव. हे दान अपरादित्य (दुसरा) सत्तेवर असताना दिलेले आहे. त्याचबरोबर अपरादित्य (दुसरा) याच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या नावांची नोंद लेखात केली आहे.

अपरादित्य (दुसरा) याने श्रीशिलाहारनरेंद्रजीमूतवाहनान्वयप्रसूत (जीमूतवाहन याच्या वंशात जन्मलेला), पंचमहाशब्द, महासामंताधिपती, तगरपुरपरमेश्वर, सुवर्णगरुडध्वजाभिमान, झंपडाचार्य, महाराजाधिराज, पश्चिमसमुद्रधिपती, कोंकणचक्रवर्ती इ. बिरुदे धारण केली आहेत. उत्तर शिलाहारांच्या शिलालेखात नेहमी दोन छेपाटी (महसूल अधिकारी) यांचा उल्लेख असतो. पण नांदुई शिलालेखात चार छेपाटी यांचा उल्लेख आहे. शिलालेखात जोघुनायक, ब्रामानायक यांच्याशिवाय अजून एक नायकाचा उल्लेख आहे. पण त्याचे नाव असलेला शिलालेखातील भाग वाचता येत नाही आहे.

अपरादित्य (दुसरा) याचा नांदुई शिलालेख हा शेवटचा शिलालेख आहे. अपरादित्य (दुसरा) याच्यानंतर अनंतदेव (दुसरा) सत्तेवर आला. शके ११२० मधील वसई शिलालेख अनंतदेव (दुसरा) याचा एकमेव शिलालेख आहे.

संदर्भ

  • Corpus Inscriptinum Indicarum Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.