अर्धराधामुरलीधर

भटकंतीच्या दरम्यान एखाद्या अपरिचित ठिकाणी भटकत असतांना अनपेक्षितरीत्या प्राचीन वास्तू किंवा मूर्ती बघायला मिळाल्यास भटकंतीचा उद्देश सफल झाला असे वाटते. तसेच काहीसे चौल भटकंतीच्या वेळी झाले.

चौल गावातील प्राचीन मंदिर बघत असताना, मंदिरातल्या ग्रामस्थानी मला एका मुर्तीची माहिती दिली. त्यांनी ती मुर्ती प्रत्यक्ष बघितली नसल्यामुळे, ती मुर्ती कोणाची आहे ह्याची त्यांना काहीच माहिती नव्हती. एवढ्याश्या माहितीवर ती मूर्ती शोधणे तसे कठीण होते, परंतु एवढे जवळ आलो आहोत तर ती मुर्ती बघायचीच हा ठाम निश्चय केला. ज्यांच्याकडे ती मुर्ती आहे त्यांच्याशी ओळखपाळख झाल्यानंतर मी त्यांना माझ्या भेटीमागचा उद्देश सांगितला आणि त्यांनीसुध्दा कोणतेही आढेवेढे न ती मला दाखवली. जेव्हा त्यांनी ती मुर्ती टेबलावर ठेवली, त्यावेळी त्या मुर्तीकडे मी नुसता बघत बसलो. मी तर त्या मुर्तीचे फोटो घेण्याचे पण विसरून गेलो. भानावर आल्यानंतर मी त्या मुर्तीच्या निरीक्षणाला आणि फोटो काढायला सुरुवात केली.

राधा आणि कृष्ण यांची संयुक्त अशी हि मुर्ती साधारणपणे १६व्या शतकात बनवण्यात आली असावी. ही मुर्ती दोन धातूंपासून तयार केलेली आहे. कृष्णाची बाजू तांब्यात तर राधेची बाजू पितळेपासून बनवलेली आहे. मुर्ती साधारणपणे ६ ते ८ इंचाची आहे. मुर्तीला आठ हात आहेत. दोन हातांमध्ये बासरी धरलेली असून, उरलेल्या सहा हातांमध्ये विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. मुर्तीवर पुरुष अलंकार आणि स्त्री अलंकार असे दोन प्रकारचे अलंकार कोरलेले आहेत.

राधाकृष्णाची मुर्ती म्हणजे त्याकाळातील मुर्तीकलेचा आणि धातुकलेचा उत्तम नमुना आहे.

काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेज, पुणे येथील प्राध्यापक डॉ श्रीकांत प्रधान यांनी या मूर्तीवर ‘अर्धराधामुरलीधर मूर्ती’ या नावाने डेक्कन कॉलेज बुलेटीन मध्ये शोधनिबंध प्रकाशित केला आहे. त्या शोधनिबंधात डॉ प्रधान यांनी या मुर्तीबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.