वर्दळीपासून दूर असलेली ‘बेडसे लेणी’

सह्याद्रीत भटकंती करीत असताना अनेकदा कातळकोरीव लेणी नजरेस पडतात. काही लेणी धार्मिक स्थळांमुळे किंवा जाण्यायेण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे पर्यटकांनी कायम गजबजलेली असतात. पण सगळ्याच लेण्यांमध्ये पर्यटकांची अशी गजबज बघायला मिळत नाही. पर्यटकांच्या वर्दळीपासून असाच दूर राहिलेला लेणीसमूह म्हणजे पवना मावळातील बेडसे लेणीसमूह. बेडसे हे पायथ्याचे गाव म्हणून बेडसे लेणी, असे असले तरी ह्या लेण्यांचे मूळ नाव मारकुट (मारा याचा पर्वत) असे लेण्यातील शिलालेखावरून वाटते.

मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत येथून तिकोना किल्ला किंवा काळे कॉलनीकडे जाणारा रस्ता आहे. याच रस्तावर कामशेतपासून साधारणपणे आठ किमीवर असलेल्या करुंज गावातून बेडसे लेण्यांना जाणारी वाट आहे. करुंज गावात जाण्यासाठी कामशेतवरून पवनानगरकडे (काळे कॉलनी) जाणाऱ्या एसटी, जीप सोयीच्या पडतात. करुंज गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराच्या मध्यावर आहेत बेडसे लेणी. एसटी किंवा जीपने करुंज गावात उतरल्यानंतर बेडसे गावात जाण्यासाठी साधारणपणे १ किमीची पायपीट करावी लागते. स्वतःची गाडी असेल तर थेट बेडसे गावात जाता येते. काही वेळेला बेडसे लेण्यांचा उल्लेख बेडसा लेणी असा पण केला जातो. पण तो पूर्णपणे चुकीचा आहे.

बेडसे गावातून जाणारा रस्ता डोंगराच्या पायथ्याशी जिथे संपतो, तिथे लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पुरातत्व विभागाने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांनी साधारणपणे ३०-४० मिनिटांमध्ये आपण लेण्यांच्या भव्य प्रांगणात येतो. पूर्वाभिमुखी बेडसे लेणी दक्षिणोत्तर पसरलेल्या १००-२०० मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेली आहेत. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह (त्यापैकी एक अर्धवट), एक भव्य विहार, दोन छोटे विहार (एक अर्धवट), सहा पाण्याची कुंडे या लेण्यात कोरलेली आहेत. बेडसे लेण्यांचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे. येथील लेण्यांना दक्षिणोत्तर क्रमांक दिलेले आहेत. बेडसे लेणी बौध्दधर्मातील हीनयान पंथांची असून इ. स. पूर्व पहिले शतक ते इ. स. १ ले शतक या काळात लेण्यांचे खोदकाम चालू होते.

बेडसे लेण्यातील लेणी क्र. १ प्रांगणात डाव्या बाजूला कोपऱ्यात आहे. हे लेणे म्हणजे वर्तुळाकार विधान असलेले चैत्यगृह आहे. चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप आहे. स्तूपाचा व्यास १.८ मीटर आहे. ह्या लेण्यात कोणतेही कोरीवकाम केलेले दिसून येत नाही. तसेच ह्या लेण्याचे काम अर्धवट सोडून दिलेले असावे असे लेण्याच्या खडबडीत पृष्ठभागावरून वाटते. ह्या चैत्यगृहाच्या काळ निश्चितपणे सांगता येत नाही. ह्याच्या शेजारी खडकात खोदलेले पाण्याचे टाके (क्र. २) आहे.

पाण्याच्या टाक्याच्या शेजारी अजून एक वर्तुळाकार चैत्यगृह (लेणे क्र. ३) आहे. ह्या चैत्यगृहाचे छत आणि दर्शनी भाग उध्वस्त झालेला आहे. चैत्यगृहाची जमीन व्हरांड्यापेक्षा किंचित उंचावलेली आहे. चैत्यगृहाच्या मध्यभागी स्तूप असून त्याचा व्यास १.४ मीटर आहे. स्तूपावर वेदिका कोरलेली आहे. स्तूपाच्या वर हर्मिका असावी असे स्तूपाच्या वरील भागात असलेल्या चार खोदीव खळग्यांमुळे वाटते. स्तूपाच्या मागील भिंतीवर शिलालेख (शिलालेख क्र. १) आहे. ह्या शिलालेखामुळे ह्या लेण्यांचे मूळ नाव मारकुड आणि हा स्तूप भिखू गोभूती यांच्या स्मरणार्थ बांधला हे समजण्यास मदत होते. शिलालेखातील अक्षरांवरून हे चैत्यगृह इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोरले असा अंदाज आहे. ह्या चैत्यगृहाच्या शेजारी पाण्याचे कुंड (क्र. ४) आहे.

वरील पाण्याच्या कुंडाच्या शेजारी अजून एक पाण्याचे कुंड (क्र. ५) आहे. ह्या कुंडाच्या पाठीमागील भिंतीवर महारथीनीचे दान असा शिलालेख (शिलालेख क्र. २) आहे. अक्षरवाटीकेवरून हा शिलालेख इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. कुंडाच्या जवळच दगडी बाकासारखे खोदकाम (क्र. ६) केले आहे. दगडी बाकाच्या शेजारी मुख्य चैत्यगृहात (लेणे क्र. ७) जाण्यासाठी दगड कोरून वाट केली आहे.

बेडसे लेणीसंकुलातील चैत्यगृह हे अप्रतिम आहे. बाहेरून हे चैत्यगृह पटकन लक्षात येत नाही. पण जेव्हा प्रचंड मोठा कातळ खोदून तयार केलेल्या चिंचोळ्या वाटेने चैत्यगृहाच्या प्रांगणात उभे राहतो, तेव्हा चैत्यगृहाची भव्यता बघून मन थक्क होते. दर्शनी भागात असलेला कातळ हे लेणे खोदत असताना तसाच फक्त जाण्यायेण्यासाठी चिंचोळी वाट खोदून तसाच ठेवलेला आहे. असे केल्यामुळे चैत्यगृहाच्या दर्शनी भागाचे ऊनपावसापासून संरक्षण झालेले आहे आणि त्याचबरोबर शिल्पकारांना छताजवळील काम करण्यास आधार मिळावा असे वाटते. आजही ह्या दगडावर असलेल्या छोट्याछोट्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण चैत्यगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या स्तंभांच्या जवळ जाता येते. चैत्यगृहाची उंची अंदाजे २८ फुट आहे. दर्शनी भागात असलेले चार प्रचंड स्तंभ, व्हरांडा, उजव्या बाजूला असलेले विहार आणि व्हरांड्यामागे कातळात कोरलेले गजपृष्ठाकार चैत्यगृह. व्हरांडा अंदाजे ३० फुट लांब आणि १२ फुट रुंद आहे. व्हरांड्यात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन्ही कोपऱ्यात एकएक अर्धस्तंभ आहेत. हर्मिकेसारखा चौथरा, त्याच्यावर कुंभ, त्यातून बाहेर आलेला अष्टकोनी स्तंभ, स्तंभाच्या शिर्षभागी उमललेले उलटे कमळ, त्यावर आरपार खोदलेल्या चौरंगात कोरलेला आमलक आणि छताकडे असलेल्या हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा व बैल या प्राण्यांवर स्वार स्त्री-पुरुष जोड्या अशी या स्तंभांची रचना आहे. कुंभाना घोटून गोलाई दिली आहे. फक्त छिन्नी व हातोडा यांनी गोलाकार कसा दिला असेल हा मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे.

स्तंभशीर्षावर असलेले प्राणी आणि त्यांच्यावर स्वार स्त्री-पुरुष जोड्या अतिशय रेखीव, प्रमाणबध्द आणि सुंदर आहेत. घोड्यांच्या अंगावरील जीन आणि तोंडातील लगाम रंगकामातून दाखवलेले असावे. हत्तींच्या सुळ्यांच्या जागी नुसत्याच खोबणी आहेत. या खोबण्यांमध्ये खरे हस्तीदंत बसवलेले असावे असे वाटते. स्त्री-पुरुषांची वेगळी वेशभूषा, अंगावर परिधान केलेले मोजकेच पण उठावदार दागिने, त्यांचे सौष्ठव हे सारे प्रत्यक्ष जाऊन अनुभवयाचे. स्त्री-पुरुषांचे हात छताला टेकलेले आहेत. बेडसे लेण्यांचे संपूर्ण सौंदर्य या स्तंभांमध्ये आहे. व्हरांड्याच्या अन्य भागावर वेदिकापट्टी व चैत्यकमानी यांचे नक्षीकाम केला आहे. व्हरांड्याच्या दोन्ही बाजूस दोन छोट्या खोल्या खोदलेल्या आहेत. डावीकडील एका खोलीचे काम अर्धवट सोडून दिलेले असले आहे. उर्वरित खोल्यांचे खोदकाम ओट्यासह पूर्ण झालेले आहे. उजवीकडच्या एका खोलीच्या द्वारपट्टीवर नाशिक येथील रहिवासी असलेल्या पुसणक याचे दान (शिलालेख क्र. ३) कोरलेले आहे. हा शिलालेख इ. स. पूर्व पहिल्या शतकातील आहे.

चैत्यगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या भिंतींच्यावर पिंपळपानाकर कमान कोरलेली आहे. चैत्यगृहात प्रवेश करण्यासाठी मध्यभागी आणि डाव्या बाजूला प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारांच्यावर चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजव्या बाजुला असलेल्या चैत्यकमानीखाली छोट्या दरवाज्याच्या आकाराचे जालवातायन आहे. या तिन्ही चैत्यकमानीमध्ये फुला-पानांची सुंदर नक्षी कोरलेली आहे. मुख्यप्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर नजरेस पडते गजपृष्ठाकार छत आणि त्याला तोलून धरणारे २६ खांब. चैत्यगृह १३.५४ मीटर लांब आणि ६.२५ मीटर रुंद असून दर्शनी भागात आयताकार आणि मागील बाजूस अर्धवर्तुळाकार आहे. सुरुवातीचे दोन स्तंभ सोडल्यास उर्वरित सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. स्तूपाजवळ असलेल्या उजव्या बाजूच्या स्तंभांवर धर्मचक्र, श्रीवत्स, त्रिरत्न, कमळ इ. शुभचिन्हे कोरलेली आहेत.

२६ स्तंभांच्या बरोबर मध्यभागी पण पाठीमागील बाजूस आहे मुख्य पूजेचा स्तूप. हा स्तूप इतर लेण्यातील स्तूपापेक्षा वेगळा आहे. या स्तूपावर तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेदिकापट्टी कोरलेल्या आहेत. पायथ्याशी ह्या स्तूपाचा व्यास २.०८ मीटर आहे आणि संपूर्ण स्तूपाची उंची अंदाजे १.५ मीटर आहे. हा संपूर्ण स्तूप आणि त्याच्यावर असलेली हर्मिका दगडात कोरलेली आहे. हर्मिकेवर असलेले लाकडी छत्र नष्ट झालेले आहे, पण हर्मिकेच्या वर छत्राला आधार देणारी यष्टी अजूनही शाबूत आहे. चैत्यगृहाच्या छताला असलेल्या खोबण्यांवरून तेथे पूर्वी लाकडी तुळया होत्या हे कळायला मदत होते. पण काळाच्या ओघात तुळया नष्ट झाल्या आहेत.

चैत्यगृह प्रवेशद्वाराच्या उत्तरेला पाण्याचे कुंड (क्र. ८) आहे. या कुंडाच्या शेजारी ३ दगडी बाक खोदले आहेत. शेवटच्या दगडी बाकाजवळ पाण्याचे अजून एक खोदीव कुंड (क्र. ९) आहे. ह्या पाण्याच्या कुंडाशेजारी थोडे वरच्या बाजूला दोन खोल्या असलेले लेणे (लेणे क्र. १०) आहे. परंतु, ह्या लेण्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. लेण्याच्या बाह्यभागात आणि अंतर्भागात एकएक खोली आहे.

अर्धवट सोडून दिलेल्या लेण्याच्या शेजारी बेडसे लेणीसंकुलातील सर्वात मोठा विहार (लेणे क्र. ११) आहे. गजपृष्ठाकार छत आणि चापाकार विधान हे ह्या विहाराचे मुख्य वैशिष्ट्य. हा विहार ५.५ मीटर रुंद आणि लांबीला ९.९ मीटर आहे. अश्या प्रकारचा विहार महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघायला मिळत नाही. विहारात एकूण नऊ खोल्या असून प्रत्येक खोलीत झोपण्यासाठी बाक आहेत. या खोल्यांच्या दर्शनी भागात वेदिकापट्टी व चैत्याकार कमानी कोरलेल्या आहेत. ह्या विहारात छताला आधार देण्यासाठी एकही खांब खोदलेला नाही आहे.

ह्या विहाराच्या पुढे साधारणपणे ६ मीटर अंतरावर छोटेसे लेणे (लेणे क्र. १२) आहे. ह्या लेण्याचा दर्शनी भाग खुला आहे. ह्या लेण्याच्या जवळच पाण्याचे टाके (क्र. १३) आहे.

शिलालेख

शिलालेख क्र. १

हा शिलालेख लेणी क्र. ३ मध्ये असलेल्या स्तूपाच्या मागे दोन ओळीत कोरलेला आहे. ऊनपावसामुळे हा शिलालेख अस्पष्ट झालेला असून दोन्ही ओळींचा सुरुवातीचा भाग नष्ट झाला आहे. हा शिलालेख इ. स. पूर्व पहिल्या शतकात कोरलेला आहे.

वाचन

……य गोभूतिनं आरणकान पैण्डपातिकानं मारकुडवासिनं थुपो
……वासिना भतासाळमितेन कारित

भाषांतर

मारकुडावर राहणाऱ्या भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूती याचा स्तूप. ….. येथे राहणाऱ्या असाळमित भट याने केलेला स्तूप. असाळमित कुठे राहायचा त्या गावाचे नाव नष्ट झाले आहे.

एस. नागाराजू यांनी दुसऱ्या ओळीतील पहिल्या नष्ट झालेल्या शब्दाचे ‘अंतेवासिना’ असे वाचन केले. अंतेवासिना म्हणजे शिष्य. मारकुडावर राहणाऱ्या आणि भिक्षेवर उदरनिर्वाह करणाऱ्या आरण्यक गोभूती याचा शिष्य भट असाळमित याने हा स्तूप तयार केला असा दुसरा अर्थ पण ह्या शिलालेखाचा निघू शकतो.

पहिल्या ओळीतील सुरुवातीचा नष्ट झालेला शब्द (अचारी)य असा असावा. आचार्य म्हणजे गुरु.

शिलालेख क्र. २

पाण्याच्या खोदीव टाकीवर हा शिलालेख कोरला आहे. ह्या लेखाचा काळ इ. स. पहिले शतक हा असावा. एकूण तीन ओळींचा हा शिलालेख चांगल्या स्थितीत असून वाचता येतो.

वाचन

महाभोयबालिकाय म(हा)देवि-
य महारठिनिय सामडिनिकाय
(दे)यधम आपदेवणकस बितियिकाय-

भाषांतर

महाभोयाची मुलगी (बालिका), आपदेवणक याची (दुसरी?) पत्नी महादेवी महारथीनी सामदिनिका हिची पुण्यकारक देणगी.

शिलालेख क्र.

चैत्यगृहाच्या व्हरांड्यातील उजव्या बाजूला असलेल्या खोलीच्या द्वारपट्टीवर हा आहे. इ. स. पूर्व पहिल्या शतकातील हा लेख आहे.

वाचन

नासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दानं

भाषांतर

नाशिक येथील श्रेष्ठी आनंद याचा मुलगा पुसणक याचे दान. श्रेष्ठी म्हणजे व्यापारी आणि त्यावरूनच ‘शेठ’ हा आधुनिक शब्द तयार झाला आहे.

निरव शांतता, निसर्गरम्य परिसर आणि अभावानेच आढळणारे पर्यटक त्यामुळे लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी बेडसे लेणी अगदी योग्य जागा आहे. पावसाळ्यात तर ह्या संपूर्ण परिसरात हिरवाई पसरलेली असते. बेडसे लेण्यांचे सौंदर्य, तेथील शांतता अनुभवण्यासाठी ह्या लेण्यांना भेट देणे अनिवार्य आहे.

संदर्भ

  • Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society (Vol. 4, 1888)
  • Inscriptions from the Cave-temples of Western India (by J. Burgess and Bhagwanlal Indraji Pandit, 1881)
  • Buddhist Architecture of Western India (S. Nagaraju, Agam Kala Prakashan, New Delhi, 1981)
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.