ब्रह्मदेव – वारसा ठाण्याचा

हिंदूधर्मातील त्रिदेवांपैकी एक देव ब्रह्मा. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. एका कथेनुसार अनैसर्गिक बीज आणि विष्णुरूप योनी यांच्या संयोगाने एक सोन्याचे अंडे प्रगट झाले आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कूर्मपुराणानुसार विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळातून ब्रह्मा प्रकट झाला. कूर्मपुराणातील दुसऱ्या कथेनुसार जल आणि आकाश तत्वापासून वराहरुपात ब्रह्मा प्रगट झाला. नंतर त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतींनी सृष्टी निर्माण केली. म्हणून ब्रह्मदेवाला ‘पितामह’ या नावाने ओळखले जाते. धाता, प्रजापती, विधाता इ. त्याची इतर नावे आहेत. कूर्मपुराणात ब्रह्माची परामूर्ती प्रजापती, हिरण्यगर्भ, वेदार्थवेदी भगवान आणि रजोगुणमय अशी चाररूपे सांगितली आहेत.

या मूर्तीचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी मूर्ती अंदाजे ८००-१००० वर्ष जुनी आहे

ब्रह्मदेव हे रजोगुणांचे प्रतिक आहे. निर्मिती करणे हे मुख्य कार्य असल्यामुळे ब्रह्माने युध्द केल्याच्या, कोणाचा संहार केल्याच्या कथा ऐकायला मिळत नाहीत. देव आणि असुर या दोघांनाही ब्रह्मा वंदनीय होता. असुरांनी ब्रह्मदेवाची खडतर तपश्चर्या करून उत्तमोत्तम वर मिळवल्याच्या कथा पुराणात वाचायला मिळतात आणि यामुळेच ब्रह्मदेवाने असुरांना वर द्यायचे, वरामुळे असुर उन्मत्त होऊन सर्वत्र हाहाकार माजवायचे व नंतर मग त्या असुरांना रोखण्यासाठी वरातून पळवाट काढून विष्णु व शंकर असुराचा नाश करणार असा क्रम असलेल्या अनेक पुराणकथा वाचायला मिळतात. त्याचबरोबर त्रिपुरासुराबरोबरच्या युध्दात ब्रह्माने शंकराच्या रथाचे सारथ्य केले, तसेच शिव-पार्वती यांच्या विवाहात त्याने पुरोहिताची भूमिका पार पाडली होती.

विष्णु आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, कन्यासक्ती इ. कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. ललितविस्तार आणि दिव्यावदान या बौध्द ग्रंथात ब्रह्मदेवाचा उपास्य देवता म्हणून उल्लेख आलेला आहे.

ब्रह्मदेवाला पूर्वी पाच डोकी होती. पण ब्रह्माने शिवाचा विरोध केल्यामुळे भैरवाने त्यांचे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शिवाचे स्तवन करून शिवास प्रसन्न करू घेतले. ब्रह्महत्येचे प्रायश्चित म्हणून भैरव ते कपाल घेऊन भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.

मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. शरीर थोडे स्थूल असून पोट थोडे सुटलेले असते.

भारतात ब्रह्माची मंदिरे फार कमी आहेत. त्यापैकी पुष्कर (राजस्थान) आणि खेडब्रह्म (गुजरात) ही मुख्य ठिकाणे मानायला हरकत नाही.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि ठाण्याचा वारसा असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती काही वर्षांपूर्वी सिध्देश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्तीचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी मूर्ती साधारणपणे ८००-१००० वर्ष जुनी आहे. या संपूर्ण परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. एवढी सुंदर मूर्ती कोणत्याही राजाश्रयाशिवाय निर्माण करणे शक्यच नाही. त्यामुळे ही मूर्ती शिलाहारकालीन आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. पुरी येथील राष्ट्रकुट राजघराण्याचे “महामंडलेश्वर” अशी उपाधी लावून शिलाहारांनी उत्तर कोकणावर श्रीस्थानक (आताचे ठाणे) ह्या आपल्या राजधानीतून राज्य केले.

उत्तरकोकण वर राज्य करणारे शिलाहार राजे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक होते. कान्हेरी लेण्यात उत्तर शिलाहारांचा पहिला ज्ञात शिलालेख आहे. शके ७८५ मधील या लेखात पुल्लशक्तीने महासामंत हे बिरूद लावलेले आहे. तसेच आपले वडील कपर्दिन यांना महासामंत आणि कोकणवल्लभ ही बिरुदे राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्यामुळे प्राप्त झाली असे सांगतो.

शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळीजवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शके ९८२ मधील सुप्रसिद्ध शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले हे निश्चितपणे सांगता येते. तसेच शिलाहारांच्या शिलालेखातूनसुध्दा अनेक मंदिराचे उल्लेख वाचायला मिळतात (उदा. व्योमेश्वर, षोंपेश्वर). त्याचबरोबर आटगाव येथील भग्नशिवमंदिर पण शिलाहारकालातील असावे असे त्याच्या स्थापत्यशैलीवरून वाटते.

सिध्देश्वर राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत आणि कमळावर उभी आहे. समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी आणि शरीराला कोठेही बाक नसणारी मूर्ती. मूर्तिशास्त्रात मूर्तीच्या उभे राहण्याच्या स्थितीवरून समभंग, अभंग, त्रिभंग आणि अतिभंग असे चार प्रकार असतात.

मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे कोणत्या हातात काय धारण केले असावे हे सांगता येत नाही.मूर्तिशास्त्राप्रमाणे हातात अक्षमाला, वेद, कमंडलू व यज्ञपात्रे किंवा वेद, यज्ञपात्रे व दोन हात वरदअभय मुद्रावस्थेत असावेत. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मागच्या बाजूला आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर कोरीवकाम केलेला जटामुकुट आहे. कानात कुंडले, यज्ञोपवीत आणि कटीसूत्र धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीला कोरलेल्या भुवया नाजूक आणि एकमेकांना जोडलेल्या आहेत. मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोटथोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी मूर्ती तयार करताना ह्या गोष्टीला छेद दिलाआहे.

मुर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या बहुदा सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ असून तिच्यावर किर्तीमुखे कोरलेली आहेत.

सिध्देश्वर तलाव परिसरात ब्रह्मदेवाचे मंदिर असावे. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्ती वाचवण्यासाठी मंदिराजवळ असलेल्या तलावात (आताच्या सिध्देश्वर तलावात) लपवून ठेवली असावी. परंतु ही मूर्ती कोणत्या राजवटीच्या काळात तलावात लपवून ठेवली आणि महाराष्ट्रात ब्रह्मदेवाची पूजा कधी बंद झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. नालासोपारा येथील चक्रेश्वर मंदिरात असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची स्थानिकांकडून अजूनही नित्य पूजा केली जाते ही उल्लेखनीय गोष्ट आहे

ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या समोर असलेल्या राममंदिराच्या मागे ३-४ मूर्तींचे अवशेष पडलेले आहेत. पण त्या मूर्ती कोणाच्या आहेत हे काही कळून येत नाही. एका मूर्तीच्या गळ्यात कोरलेला हार अप्रतिम आहे. दुसऱ्या एका मूर्तीच्या आजूबाजूला जैन तीर्थंकरसदृश्य मुर्त्या कोरलेल्या आहेत. दुर्दैवाने ती मूर्ती कोणाची आहे हे समजून येत नाही.

सद्यस्थितीत ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या मूर्तीला संवर्धनाची गरज आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे खंडित झालेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. परंतु अजूनही काही भाविक ह्या मूर्तीची पूजा करतात. या मूर्तीला शेंदूर, फुले, हळदकुंकू इ. घटकांमुळे हानी पोचत आहे. त्यामुळे मूर्तीला आणि इतर अवशेषांना संग्रहालयात हलवणे ही काळाची गरज आहे किंवा सध्याच्या जागी त्यांचे योग्य संवर्धन करणे.

संदर्भ

  • भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
  • Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.