थरारक चंदेरी

आक्रमकांपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरांवर किल्ल्यांच्या रुपात तटबंदीचे कोंदण चढवले. काही दुर्ग, तर काही फक्त चौकीची ठिकाणे. काही गडांवर जाणारे मार्ग सोपे, तर काही गडांवर जाणारे मार्ग कठीण. चौकीचे ठिकाण आणि अवघड मार्ग यांचे मिश्रण म्हणजे रायगड जिल्ह्यातील चंदेरी किल्ला.

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरून बदलापूर सोडल्यानंतर वांगणीकडे जाताना सह्याद्रीची रांग नजरेस पडते. यात रांगेत चंदेरी किल्ला आहे. नाखिंद, म्हैसमाळ, पेबचा किल्ला (उर्फ विकटगड), माथेरान इ. किल्ले-शिखरे चंदेरीचे सगेसोयरे.

चंदेरीवर जाण्यासाठी चिंचोलीमार्गे जाणारा रस्ता सोयीस्कर पडतो. बदलापूर व वांगणी येथून चिंचोलीला जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले जंगल, धबधब्यातून जाणारी वाट, किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी सुरुवातीला करावे लागणारे प्रस्तरारोहण, नंतर माथ्यावर जाणारी घसारा असलेली वाट ह्या सगळ्या गोष्टींमुळे चंदेरीवर आरोहण करणे आव्हानात्मक आहे.

चिंचोलीच्या मागे असलेल्या डोंगरधारेवर जाण्यासाठी खडकाळ व दगडधोंड्यातून जाणारी वाट आहे. ह्या वाटेने साधारणपणे १५-२० मिनिटांमध्ये वरच्या पठारावर पोहोचतो. या पठारावर भरपूर ढोरवाटा आहेत. पठारावरून चंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ यांच्यामध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेला जाणारी ठळक पायवाट पकडायची. मुख्य वाटेवरून मार्गक्रमण सुरु केल्यानंतर सुरुवातीला पाण्याचे ओहोळ लागतात. या ओहोळानंतर मुख्य वाट सुरुवातीला पावसाळा सोडून कोरडा असलेला धबधबा ओलांडून त्याच्या डाव्या बाजूने चढणीला लागते. ह्या संपूर्ण वाटेवर खिंडीत पोहोचेपर्यंत मार्गदर्शक खुणा केलेल्या आहेत. ह्या वाटेने खिंडीत पोहोचण्यासाठी साधारणपणे तास-दीड तास लागतात.

चंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ सुळका

खिंडीतून उजवीकडे जाणारी वाट म्हैसमाळ सुळक्याकडे, तर डावीकडील वाट किल्ल्यावर जाते. खिंडीत गाढेश्वर धरण-ठाकूरवाडी मार्गे येणारी वाट येऊन मिळते. किल्ल्याकडे जाणारी वाट चढायला सुरुवात केल्यानंतर साधारणपणे ३०-४० मिनिटांमध्ये आपण चंदेरी किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या गुहेत पोहोचतो. ह्या गुहेकडे जात असतानाच किल्लेपणाची एकमेव खुण असलेल्या तटबंदीचे अवशेष दिसतात. गुहेच्या अलीकडे पाण्याचे टाके आहे. ह्यातील पाणी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पिण्यायोग्य असते. गुहेत शिवलिंग आणि नंदी आहे.

चंदेरीच्या माथ्यावर जाण्यासाठी गुहा डावीकडे ठेवून सरळ जायचे. थोडेस पुढे गेल्यानंतर घसरडी वाट उतरणीला लागते. साधारणपणे ३०-३५ फुटांची घसरण नवख्यांनी दोरीच्या सहाय्याशिवाय उतरू नये. घसरण उतरल्यानंतर कडा डावीकडे ठेवत आणि काळजी घेत सरळ चालायचे. ह्या वाटेने जात असताना उजव्या हाताला कायम दरी दिसत असल्यामुळे ज्यांना उंचीची भीती वाटते व तसेच ज्यांच्याकडे प्रस्तरारोहणाची साधने नसतील त्यांनी किल्ल्याच्या माथ्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये. अंदाजे पाच-दहा मिनिटात ही वाट संपते आणि सपाटीवर येतो. ह्याच सपाटीवर उजवीकडे खालच्या बाजूला पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे.

प्रस्तरारोहणाचा पूर्वानुभव आणि साहित्य नसल्यास माथ्यावर जाण्याच्या प्रयत्न करू नये

सपाटीवरून कड्याकडे बघितल्यास खोदलेल्या पायऱ्या दिसतात. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्या आणि नंतर घसरडी माती यांच्यातून चढाई करत खिंडीसारख्या भागात पोहोचायचे. याच भागात उजवीकडे खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यापासून किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यारी जाणारी वाट निसरडी आहे. दोन्ही बाजूला कडा आणि पाठीमागे खोल दरी अशी वाट असल्यामुळे चढाई जपून करायची.

किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट

चंदेरी किल्ल्याचा माथा चिंचोळा आहे. तसेच येथे कोणतेही बांधकाम दिसून येत नाही. गडाचे कडे बऱ्याच ठिकाणी तुटलेले असल्यामुळे चिंचोळ्या वाटेवरून जपून पावले टाकत माथ्याचे दुसरे टोक गाठायचे. या टोकावर शिवाजीमहाराजांचा पुतळा व भगवा ध्वज आहे. या टोकाच्या बरोबर खाली शिवलिंग असलेली गुहा आहे. माथ्यावरून म्हैसमाळ, बदलापूर डोंगररांग, मलंगगड, माथेरान, पेबचा किल्ला, प्रबळची डोंगररांग, भीमाशंकर, सिध्दगड, गोरखगड, पेठचा किल्ला एवढा मोठा परिसर नजरेस पडतो. माथ्यावर बघण्यासारखे काही नसल्यामुळे आजूबाजूचा परिसर न्याहाळून आल्यावाटेने काळजीपूर्वक उतरत पुन्हा मुख्य गुहेत पोहोचायचे.

जागेचा अभाव, पाण्याची कमी टाकी, बांधकामाअभावी मर्यादित लोकांची सोय आणि अतिशय अवघड वाट इ. गोष्टींमुळे चंदेरीला किल्ल्याऐवजी चौकीचे ठाणे म्हणणे योग्य ठरेल. हा किल्ला कोणी व कधी बांधला ह्याचे काहीही संदर्भ उपलब्ध नाही आहेत. शिवाजीमहाराजांच्या सन १६५६ मधील कोकण मोहिमेच्यावेळी हा किल्ला स्वराज्यात सामील झाला असावा असा अंदाज आहे.

किल्ल्याचा कातळकडा आणि खालच्या भागात किल्ल्यावरील गुहा

किल्ल्याच्या वाटेवर दिसलेली फुले

किल्ला उतरताना दुसरी वाट अनुभवायची असेल तर खिंडीतून ठाकूरवाडीला जाण्याऱ्या वाटेने किंवा ठाकूरवाडीमार्गे चढाई केली असेल तर चिंचोलीमार्गे उतराई करावी.

सूचना

  • प्रस्तरारोहणाचा पूर्वानुभव नसल्यास, तसेच प्रस्तरारोहणाची साधने नसल्यास माथ्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये.
  • पावसाळ्यात दगड पडल्यामुळे अपघात झाले आहेत, क्वचितप्रसंगी मृत्यूसुध्दा झाले आहेत. त्यामुळे काळजी घेणे. शक्यतो पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे.
  • सुरक्षित भटकंती करा.
  • एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका.
  • ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा.
  • ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरात सांगून ठेवा.
  • वाट माहिती नसल्यास गांवातून वाटाड्या बरोबर घ्या.
  • मळलेल्या वाटेवरूनच जा, अनोळखी वाटेने जाण्याचे धाडस करू नका.
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.