छत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. त्याच्यावरून तत्कालीन राज्यपद्धती, करपद्धती, शासनव्यवस्था इ. अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळते. या काळात कारकुनीच्या कामासाठी कागदाचा वापर होत असल्यामुळे शिलालेखांचे प्रमाण नगण्य आहे आणि जे शिलालेख उपलब्ध आहेत ते इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील असाच महत्त्वाचा शिलालेख म्हणजे हडकोळण शिलालेख. या शिलालेखात हडकोळण या गावाचा कोणताही उल्लेख नाही आहे. फक्त हडकोळण येथे होता म्हणून याचा उल्लेख हडकोळण शिलालेख असा केला जातो.

गोव्यातील हडकोळण गावात असलेल्या देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शिलालेखाची शिळा होती. पण सद्यस्थितीत हा शिलालेख गोवा राज्य संग्रहालयात आहे. हा शिलालेख कोणत्या वर्षी मूळ ठिकाणावरून काढून संग्रहालयात आणला याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. शिलालेखाच्या शेजारी “अडकोना, तालुका फोंडा येथे मिळालेला सन १६८८ मधील शिलालेख” एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे हा शिलालेख कोणाचा आहे पटकन कळून येत नाही.

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वेगवेगळे कर होते. उदा. लग्न करणाऱ्यास ‘लग्नटका’ किंवा ‘वरातटका’, पुनर्विवाह करणाऱ्यास ‘पाटदाम’, घरमालकास ‘घरटका’, खेळणी विक्रेत्यास ‘भूतफरोसी’ इ. या करांबरोबर गोमंतक (गोवा) प्रांतात वाटसरूंकडून ‘अंगभाडे’ नावाच्या कराची वसुली करण्यात येत असे. मार्च १६८८ पर्यंत अंत्रुज येथे हा कर वसूल करण्यात येत होता. नंतर तो छत्रपती संभाजी महाराजांनी माफ केला व त्याचे आज्ञापत्र २२ मार्च, १६८८ ला दिलेले आहे. हेच आज्ञापत्र या शिलालेखात कोरले आहे.

शिळेची लांबी ३६ इंच व रुंदी अंदाजे १२ इंच आहे. शिळेच्या चारी बाजूंना समास सोडलेला आहे. समासाच्या आत साधारणपणे अर्धा इंच खोल शिलालेख खोदलेला आहे. शिलालेखाची भाषा मराठी आहे. शिलालेखाच्या वरील भागात चंद्रसूर्य आणि आठ पाकळ्यांचे कमळ कोरलेले आहे. चंद्रसूर्याच्या वर “श्रीरामाय” असे कोरलेले आहे. परंतु याची अक्षरवाटिका मुख्य शिलालेखाच्या अक्षरवाटिकेपेक्षा वेगळी आहे. त्यावरून “श्रीरामाय” हे नंतरच्या काळात दुसऱ्या व्यक्तीने कोरले असावे. शिलालेख २२ ओळींचा असून शेवटच्या दोन ओळी समासावर कोरलेल्या आहेत. या दोन ओळींच्या खाली दोन्ही बाजूस गाईचे शिल्प कोरलेले आहे. पण ही दोन्ही शिल्प बरीच अस्पष्ट झालेली आहेत.

देवनागरी लिपी आणि मराठी व संस्कृत भाषांमध्ये हा लेख कोरलेला आहे. आज्ञापत्राचा भाग मराठीत, तर शापवाणी संस्कृतमध्ये आहे.

वाचन

श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न|| स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके||
१६१० वर्ष | वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं
हासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ||श्लोक||श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर:|| यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ||१|| लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक:|| यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि||२||
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं|| दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं|| या धर्मकार्या समस्तिं मान देवावे

श्री गणेशाय नम. श्री लक्ष्मी प्रसन्न. शालिवाहन शक १६१० विभवनाम संवत्सर गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा. गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश. क्षत्रियकुळावतंस छत्रपती शंभु महाराज यांचे मामले प्रांत फोंडा येथील मुख्यदेशाधिकारी धर्माजी नागनाथ. तिमनायकाचे पुत्र सामनायक यांनी विनंती केली मुसलमानांच्या राज्यात अनंतउर्ज येथे नदीवरील अंगभाडे घेत नव्हते. त्यामुळे व्यापारी लोक मालाची ने-आण जास्त करत होते. परंतु हिंदुराज्य झाल्यापासून आंगभाडे घेण्यास सुरुवात केल्यामुळे मालाची ने-आण कमी झाली आहे, त्यामुळे तो कर घेऊ नये. त्याप्रमाणे भाणस्तरि, पारगाव, मांदुस येथील दुडुवा अर्ध कोसी, चौदा दुडु घेत होत ते माफ केले. सहस धर्मकृत्यास नाश करू नये. जो धर्मकृत्याचा नाश करेल त्याला पाप लागेल. तसेच धर्मकृत्याचा नाश करणारा नरकात जाईल, विष्ठेमधील कृमि होईल. या धर्मकृत्याचा मान ठेवावा.

वरील शिलालेखात गोमंतक, अनंतउर्ज, फोंडा, भाणस्तरि, पारगाव आणि मांदुस या स्थळांचा उल्लेख आला आहे. अंत्रुज (शिलालेखातील अनंतउर्ज), फोंडा, भाणस्तरि ही सध्याच्या गोवा राज्यातील (शिलालेखातील गोमंतक) शहरे आहेत.

कर माफ केल्यामुळे लोकांना दिलासा मिळतो आणि मालाची ने-आण करण्यसाठी प्रोत्साहन मिळते. तसेच “धर्मकृत्यास नाश करू नये” व “हे हिंदू राज्य जाहाले” याच्यावरून छत्रपती संभाजी महाराजांची स्वधर्मावरील निष्ठा दिसून येते.

संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची, छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा मोहिमेची जास्त माहिती नसल्यामुळे आणि शिलालेखाजवळ योग्य ती माहिती नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज दुर्लक्षित आहे.

संदर्भ

  • ज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा, ले. सदाशिव शिवदे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २००८
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स