महामार्गालगत असलेली गांधारपाले लेणी

मुंबई-गोवा महामार्गाने कोकणात स्वतःच्या वाहनाने किंवा एसटीने जाताना महाडच्या आधी ३ कि.मीवर डावीकडे असलेल्या डोंगरात कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. हीच ती गांधारपाले लेणी.

पण गावाला जायची असलेली घाई किंवा महाडला उतरून पुन्हा पाठी कोण येणार असा विचार करत आपण ह्या लेण्यांना भेट द्यायचा विचार सोडून देतो. त्यामुळे गावकरी, लेण्यांचे अभ्यासक, बौध्द भिक्षुक, सह्याद्रीत भटकंती करणारे किंवा चुकून स्वतःचे वाहन असल्यास येणारे पर्यटक यांच्याशिवाय ह्या लेण्यांना भेट देण्यास कोणी येत नाही. पुरातत्व विभागाने फक्त महामार्गावर लेण्यांचा फलक लावला आहे. पण लेण्यांच्याजवळ माहिती देणारे फलक आणि एखादा मार्गदर्शक या दोघांचाही अभाव आहे आणि याचमुळे की काय ज्यांना या लेण्यांबद्दल माहिती नसते ते फक्त लेणी बघतात, स्वतःचे त्याचबरोबर लेण्यांचे फोटो घेतात आणि आल्या पावली निघून जातात. ग्रामस्थांना ह्या लेण्यांबद्दल विचारले असता ते सांगतात ही सगळी लेणी पांडवानी वनवासात असताना एका रात्रीत कोरली. सह्याद्रीत असलेल्या बहुसंख्य लेण्यांच्या मागे पांडवांचे नाव चिकटले आहे. पण असे करत असताना आपण नकळतपणे ज्या अनामिक हातानी सह्याद्रीतील लेणी कोरली त्यांचा अपमान करत असतो. तर आज आपण जाणार आहोत ह्याच गांधारपाले लेण्यांच्या भेटीला.

गांधारपाले लेण्यात असलेल्या दोन्ही शिलालेखात राजा, राजवंश आणि काळ यांचा अजिबात उल्लेख नाही आहे. त्यामुळे येथील लेण्यांचा काळ स्तंभ, अक्षरवाटिका आणि शिल्प यांच्यावरून ठरवावा लागतो.

गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर पूर्वाभिमुखी लेणी आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनीटे लागतात.

लेण्यांच्या परिसरातून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी, पायथ्याचे पाल गांधारपाले गाव, मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारी वाहने असा सुंदर देखावा बघावयास मिळतो. येथील लेणी तीन थरांमध्ये कोरलेली आहेत. दुरून हा लेणीसमूह तीनमजली इमारतीसारखा वाटतो. येथे लेण्यांबरोबर अनेक पाण्याची टाकीही कोरलेली आहेत.

पायऱ्या चढून जात असताना पहिल्यांदा आपल्याला २८ क्रमांकाचे लेणे दिसते. पण आपल्याला जायचे आहे १ क्रमांकाच्या लेण्यात. जे आहे एकदम डावीकडे व दुसऱ्या स्तरावर. येथील लेण्यांना डावीकडून क्रमांक दिलेले असल्यामुळे १ क्रमांकाच्या लेण्यापासून आपली भटकंती सुरु करायची.

लेणी क्र. १ – चैत्यगृह आणि विहार अशा पद्धतीचे हे लेणे आहे. लेण्याच्या दर्शनी भागात सहा स्तंभ आहे. सहा स्तंभांपैकी फक्त एकच स्तंभ पूर्णपणे कोरलेला असून, बाकीचे पाच अर्धवट आहेत. लेण्याच्या समोर प्रांगण आहे. मुख्य दालन आणि स्तंभ यांच्यादरम्यान व्हरांडा/दीर्घिका आहे. दालनात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आणि उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. मुख्य दालनात असलेल्या नऊ खोल्यांपैकी चार खोल्या डाव्या बाजूच्या भिंतीत, तर पाच खोल्या पाठीमागील भिंतीत कोरलेल्या आहेत. या भव्य दालनाच्या आतील बाजूला चारी बाजूनी ओटा आहे. पाठीमागील भिंतीत असलेल्या विहारात मध्यभागी दगडावर भगवान बुद्धांची प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेली आणि धम्मचक्रमुद्रेतील बुद्धमूर्ती कोरलेली आहे. मूर्तीची बरीच नासधूस झालेली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धर्मचक्र व हरणे आणि वरील बाजूला चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. ही मूर्ती ज्या प्रस्तरात कोरली आहे त्याच्या मागील बाजुस आसनस्थ बुद्धमूर्तीचा आराखडा दिसतो. मूर्ती खोदण्यापूर्वी तिचा आराखडा कोरण्याची पद्धत महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघावयास मिळत नाही. तसेच प्रस्ताराच्या दोन्ही बाजूला वज्रपाणी आणि पद्मपाणी यांची ओबडधोबड शिल्प दिसून येतात.

हा प्रस्तर बहुदा स्तूपासाठी राखीव ठेवेलेला असावा. परंतु काही कारणास्तव प्रस्तरावर स्तूपाऐवजी बुद्धमूर्ती कोरण्यात आल्या. पण ह्या मूर्तीचे खोदकाम आणि बाहेरील खांब अर्धवट का ठेवले याचे उत्तर मिळत नाही.

लेणी क्र. २ – ह्या लेण्याचे खोदकाम अर्धवट आहे. प्रांगण, दोन दर्शनी खांब, व्हरांडा आणि खोलीअशी लेण्याची रचना आहे. ओसरीच्या उजव्या बाजूच्या भिंतीत ओबडधोबड कोरलेला बाक असून खोलीच्या आतसुद्धा बाक कोरलेला आहे.

लेणी क्र. ३ – लेण्याच्या उजवीकडील भिंतीत दगडी बाक कोरलेला आहे. दर्शनी भागात २ खांब आणि खांबांच्या मागे दगडी ओटे आहेत. स्तंभ खाली चौकोनी आणि शीर्षस्थानी अष्टकोनी आहेत. ओसरीच्या उजवीकडील भिंतीत तळाशी छोटी पायरी असलेला बाक आहे. व्हरांड्याच्या भिंतीना गिलावा देण्यात आलेला आहे. खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या लेणी क्र. ४ कडे जातात.

लेणी क्र. ४ – दर्शनी भागात दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ असून त्यांची अवस्था फार वाईट आहे. व्हरांडा, दालन आणि खोली अशी या लेण्याची रचना आहे. खोलीच्या पाठीमागील भिंतीत बाक कोरलेला आहे. दालन हे खोलीपेक्षा मोठे असून दालनाच्या उजव्या बाजूच्या भिंतीत बाक कोरलेला आहे. व्हरांड्याच्या  उजव्या भिंतीवर ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. पण अक्षरांची झीज झालेली असल्यामुळे हा लेख वाचता येत नाही.

लेणी क्र. ५ – या लेण्याची रचना मंडपासारखी आहे. ओसरीच्या आत दालन आहे. दर्शनी भागात दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. स्तंभ तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी, तर अर्धस्तंभ चौकोनी असून त्यांच्यावर वाळूच्या घड्याळ्याच्या आकाराची नक्षी आहे. दालनाच्या आतील तिन्ही बाजूना बाक आहे. या लेण्याची निर्मिती चौथ्या लेण्यानंतर झाली असावी असे लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवरून वाटते. डाव्या बाजूच्या भिंतीवर जास्त खोदकाम केले असते तर भिंत पडून हे लेणे चौथ्या लेण्यात समाविष्ट झाले असते. ही भिंत ओबडधोबड आहे असण्याचे हे कारण असावे.

लेणी क्र. ६ – ४ थ्या आणि ५ व्या लेण्यांपेक्षा हे लेणे खालच्या थरावर आहे. याचे खोदकाम अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे. लेण्याजवळ दोन पाण्याची टाकी असून त्यापैकी फक्त एकच टाके व्यवस्थित कोरलेले आहे.

लेणी क्र. ७ – हे लेणे ६व्या लेण्याच्या पातळीत आहे. व्हरांडा आणि मागे खोली अशी या लेण्याची रचना आहे. व्हरांडा आणि खोलीत कोनाड्यासारखे खोदकाम केलेले ओटे/बाक आहेत. व्हरांड्याचा दर्शनी भाग कोसळला आहे.

लेणी क्र. ८ – लेणी क्र. १ सारखेच या लेण्यातसुद्धा चैत्यगृह आणि विहार यांची एकत्रित निर्मिती केली आहे. दर्शनी भागात दोन उद्धवस्त खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. दोन्ही अर्धस्तंभ चौकोनी आकाराचे आहे. अर्धस्तंभावरती वाळूच्या घड्याळ्याच्या आकाराची नक्षी कोरलेली आहे. स्तंभ नष्ट झालेले असल्यामुळे ते कशे होते हे सांगता येत नाही. पण स्तंभांच्या शीर्षाजवळ असणारा घट आणि त्याच्यावरील हर्मिका अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. लेण्याच्या अंतर्गत भागात डाव्या आणि उजव्या बाजूला दगडी बाक असलेल्या तीन-तीन खोल्या आहेत. पाठीमागील मध्यभागी असलेल्या खोलीत आता स्तूप नसला तरी स्तूपाची दगडी छत्रावली अजूनही छताशी आहे व तळाशी स्तूपाचा गोलाकारही दिसून येतो. खोलीतील स्तूप नैसर्गिकरीत्या नष्ट झाली की मुद्दाम नष्ट केला हे सांगता येत नाही. मध्यवर्ती खोलीच्या दोन्ही बाजूना दगडी बाक असलेल्या लहान खोल्या आहेत. ह्या लेण्याला व्हरांडा नसला तरी प्रांगण आहे.

उजव्या बाजूच्या भिंतीवर अर्धस्तंभाच्या बाजूला प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे.

वाचन

सिधं कुमारस काणभोअस व्हेणुपालितस
(ए)स लेण चेतिएघर ओवरका च अठ ८ विकमं नियु
तं ले(ण)स च उभतो पसेसु पोढियो बे २ लेणस
अलिगणके पथो च दतो एतस कुमारस देय

भाषांतर

सिद्धी असो. कुमार कानभोज विष्णुपालित याने लेणे, चैत्यगृह, आठ ओवऱ्या, लेण्याच्या दोन्ही बाजूस एक एक टाके व लेण्याचा मार्ग यांची दिलेली देणगी दिली.

प्रस्तुत लेखात राजा, राजवंश आणि काळ यांचा अजिबात उल्लेख नाही आहे. त्यामुळे कुमार कानभोज कोणत्या राजवंशातील होता आणि त्याचा काळ याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही.

लेणी क्र. ९ – ८व्या लेण्यापेक्षा वरच्या पातळीवर लेणी हे लेणे आहे. या लेण्यात असलेल्या खोलीत बैठकीसाठी दगडी बाक नाही आहे. पण दालनात उजव्या भिंतीत कमी उंचीचा बाक आहे. या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे दालनाला असलेला दरवाजा आणि दोन खिडक्या. ओसरीत उजव्या भिंतीत दगडी खोदीव बाक असून ओसरीला इतर लेण्यांप्रमाणेच खांब आणि अर्धस्तंभ आहेत.

लेणी क्र. १० – या लेण्याची रचना ९व्या लेण्यासारखीच आहे. या लेण्याच्या दर्शनी भागाची भरपूर पडझड झालेली आहे. या लेण्याच्या पायऱ्या काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. लेण्याचे खांब तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी आहेत. खांबांवरती वाळूच्या घड्याळासारखी नक्षी आहे. या लेण्याला खिडकी नसून दगडी बाकांच्यामागे कोरीव काम आहे.

लेणी क्र. ११ आणि १२ – दोन्ही लेणी एकाच पातळीवर आहेत. व्हरांडा आणि दालन अशी या दोन्ही लेण्यांची रचना आहे. दोन्ही लेण्यांच्या भिंतीमध्ये दगडी बाक आहेत. दोन्ही लेण्यांच्या दर्शनी भागात दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. १२व्या लेण्याच्या प्रवेशद्वाराबाहेर ओटा व डाव्या बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत.

लेणी क्र. १३ – हे लेण थोडेसे खालच्या पातळीवर आहे. लेण्याला आयताकृती दरवाजा आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूला खिडक्या खोदलेल्या आहेत. लेण्याला दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. स्तंभ तळाशी चौकोनी आणि वरती अष्टकोनी असून अर्धस्तंभ चौकोनी आहेत. अर्धस्तंभांवर वाळूच्या घड्याळासारखी नक्षी कोरलेली आहे. या लेण्याच्या दरवाज्यापुढे पायऱ्या आहेत. लेण्यासमोर चौकोनी आकाराचे टाके आहे.

लेणी क्र. १४ – हे लेणे १३व्या लेण्याशेजारी असून याची रचना व्हरांडा आणि खोली अशी आहे.

लेणी क्र. १५ – हे एक चैत्यगृह असून १४व्या लेण्यानंतर एक कोनाड्यात खोदले आहे. स्तूप पाठभिंतीत कोरलेला आहे. स्तूपाच्या दंडाकृती गोलावर वेदिकापट्टी, वरच्या अर्धगोलाकृती भागावर छतापर्यंत जाणारी हर्मिका आहे.

लेणी क्र. १६ – व्हरांडा, दालन आणि खोली अशी या लेण्याची रचना असून दालनात तिन्ही भिंतीना ओटा खोदलेला आहे. डाव्या हाताच्या भिंतीला दरवाजा आहे. या दरवाज्यातून आत असलेल्या खोलीत प्रवेश करत येतो. दालनाला दरवाजा असून दरवाज्याच्या दोन्ही बाजूना खिडक्या आहेत. दालनाच्या पुढे स्तंभ आहेत, पण त्यांची अवस्था फार दयनीय झाली आहे. स्तंभांची रचना इतर लेण्यांप्रमाणे खालती चौकोनी आणि वर अष्टकोनी आहे. ओसरीच्या डाव्या हातास दगडी बाक नसलेली खोली आहे. ह्या खोलीत प्रांगणात असलेल्या दरवाज्यातून प्रवेश करता येतो.

लेणी क्र. १७ – या लेण्याच्या खोदकाम अर्धवट सोडून दिलेले आहे. व्हरांडा आणि दालन अशी रचना आहे.

लेणी क्र. १८ आणि १९ – या दोन्ही लेण्यातील व्हरांडा व दालनांचे खोदकाम पूर्ण झाले असले तरी खोल्यांचे खोदकाम अर्धवट आहे. १८ व्या लेण्याच्या दालनाला दरवाजा आणि दोन बाजूना एक-एक खिडक्या आहे. १९व्या लेण्याला अशी रचना नाही आहे. दोन्ही लेण्यांच्या व्हरांड्यात बाक खोदलेले आहेत आणि खांबांवर वाळूच्या घड्याळाची नक्षी कोरली आहे.

लेणी क्र. २० – ह्या लेण्याच्या खोदकामाला सुरवात केल्यानंतर काही कारणास्तव काम लगेचच सोडून दिलेले दिसते.

२१ ते २८ ही सर्व लेणी खालच्या पातळीवर कोरलेली आहेत.

लेणी क्र. २१ – हे एक चैत्यगृह असून ते समोरच्या बाजूने खुले आहे. या लेण्यात स्तूप आहे. स्तूपावर वेदिकापट्टी आणि हर्मिका आहे. चैत्यगृहाच्या उजव्या भिंतीवर आसनस्थ बुद्धाची प्रतिमा आहे. धर्मचक्रपरिवर्तन मुद्रा आणि प्रलंबपादासनातील भगवान बुद्धांच्या शेजारी चवरीधारी आणि बुद्धांच्या डोक्यावर विद्याधरांनी मुकुट धरला आहे. शिल्पाच्या वरील भागात मकरतोरण आहे. बुद्धमूर्तीचे शिल्पांकन महायान पंथीयांनी केले असून ह्या शिल्पाचा काळ साधारणपणे ५वे-६वे शतक असावे.

लेणी क्र. २२ – व्हरांडा आणि खोली अशी या लेण्याची रचना आहे. व्हरांडा आणि खोलीत दगडी बाक खोदलेला आहे. या लेण्याचा दर्शनी भाग कोसळलेला आहे.

लेणी क्र. २३ – व्हरांडा आणि त्याच्यामागे दालन अशी या लेण्याची रचना. दालनाला दरवाजा आणि दोन्ही बाजूंना एक-एक खिडक्या आहेत. व्हरांड्याला खांब आणि अर्धस्तंभ असून दगडी बाक खोदलेला आहे. स्तंभ तळापासून छतापर्यंत अष्टकोनी आणि अर्धस्तंभ चौकोनी आहेत. लेण्याजवळ फुटलेले टाके आहे.

लेणी क्र. २४ – या लेण्याला व्हरांड्याच्या मागे दोन खोल्या आहेत. व्हरांड्याच्या डाव्या भिंतीत दगडी बाक कोरलेला आहे. दर्शनी भागात असलेले अष्टकोनी खांब नष्ट झाले आहेत.

लेणी क्र. २५ – ओसरीमागे एकाच खोली असून खोलीचा दरवाजा तळापासून ते अगदी छतापर्यंत कोरलेला आहे. दरवाज्याच्या डाव्या बाजूला खिडकी आहे. या लेण्याच्या दर्शनी भागाची भरपूर पडझड झाली आहे.

लेणी क्र. २६ – व्हरांडा, दालन आणि खोली अशी सर्वसाधारण रचना. खोलीत उजव्या बाजूच्या भिंतीत बाक कोरलेला आहे. ओसरीतसुद्धा बाक कोरलेला आहे. या लेण्याच्या स्तंभाची पडझड झाली आहे.

लेणी क्र. २७ – व्हरांडा, दालन आणि खोली अशी रचना या लेण्याची आहे. ओसरीला दर्शनी भागात दोन खांब आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. खांब अष्टकोनी आणि अर्धस्तंभ चौकोनी आहेत. अर्धस्तंभांवर वाळूच्या घड्याळ्यासारखी नक्षी कोरली आहे. ओसरीच्या उजव्या भिंतीत कोनाड्यात स्तूपाचे शिल्प उठावात कोरले आहे. स्तूप गोलाकृती असून त्याला हर्मिका आणि वेदिकासुद्धा आहे. वेदिकेवर स्तंभ आणि त्यावर दगडातच कोरलेली छत्रावली आहे. दालनाच्या मध्यभागी दरवाजा असून दरवाज्याच्या दोन्ही बाजूला एक-एक खिडक्या आहेत. दालनाच्या मागे असलेली खोली मध्यवर्ती नसून उजव्या बाजूला आहे. खोलीत दगडी बाक आहे.

लेण्याच्या प्रांगणातील उजव्या भिंतीवर हा शिलालेख कोरलेला आहे. या लेखाची लिपी ब्राह्मी आणि भाषा प्राकृत आहे. या लेखात राजा, राजवंश आणि काळ याचा उल्लेख नाही आहे. लेखाच्या उजव्या बाजूचा भाग खराब झालेला असल्यामुळे लेख वाचताना अडचणी येतात.

वाचन

सिधं गहपतिस सेठिस संघरखितस पुतस वि —–
वादसिरिय देयधमं लेनं चेतियकोठि पा ——
छेतानि यानि लेणस पेठा गोराव —- नं —-
ति  छेतेहि करे ततो चेतिआस गध —-
अठ ८ भतकंमानिका अठ ८ कोढिपुर —-
कारणकारणे च लेणस सवेणा क—-

भाषांतर

या लेखात वादसिरिने (वादीश्री) लेणे, चैत्यकोठी (चैत्यगृह) व लेण्याच्या खालच्या बाजूस असलेली शेती दान दिल्याचा उल्लेख आहे. लेखात उल्लेखलेली वादसिरि बहुधा स्त्री असावी. त्याचबरोबर गहपति (गृहपती) श्रेष्ठी (उच्चपदी विराजित) संघरखितच्या (संघरक्षित) मुलाचा उल्लेख लेखात असला तरी त्याचे लेखात नाव दिलेले नाही. तसेच दिलेले दान संघरखितचा मुलगा आणि वादसिरि या दोघांनी मिळून दिले का हेसुद्धा ठामपणे सांगता येत नाही. तसेच वादसिरि ही गृहपती संघरक्षित याच्या मुलाची पत्नी असावी.

लेणी क्र. २८ – ओसरी, दालन, खोली आणि खोलीचा आत असलेला साधा दगडी बाक अशी सर्वसाधारण रचना. दालनात उजव्या भिंतीत बाक कोरलेला आहे. दालनातील दरवाजा मोडलेला आहे, याच भिंतीवर चौकोनी खिडकी आहे. या लेण्याची अवस्था फार वाईट आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना थोडा वेळ काढून आणि वेगळे काहीतरी बघायचे असेल तर गांधारपाले लेणी चांगला पर्याय आहे.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.