जेम्स प्रिन्सेप – प्राचीन लिपी अभ्यासक

ब्राम्ही आणि खरोष्ठी ह्या भारतातील सर्वात जुन्या लिपी आहेत. खरोष्ठी लिपीतील शिलालेख उत्तर भारतात, तर ब्राम्ही लिपीतील शिलालेख भारतात सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी खरोष्ठी लिपी इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकात काही अक्षरांचा अभाव, उजवीकडून डावीकडे लिहिणे, ब्राम्ही लिपीचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर इ. कारणांमुळे, तर अनेक स्थानिक लिप्यांचा उगम झाल्यामुळे हळूहळू ब्राम्हीचा रोजच्या व्यवहारातील उपयोग पूर्णपणे थांबला. विस्मृतीत गेलेल्या या दोन्ही लिप्यांचा पुन्हा उलगडा करण्यात जेम्स प्रिन्सेप या ब्रिटीश अधिकाऱ्याचा मोलाचा सहभाग होता.

जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म इंग्लंडमधील इसेक्स येथे २० ऑगस्ट १७९९ साली झाला. इंग्लडमध्ये वास्तुशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर कलकत्ता टाकसाळीत सन १८१९ मध्ये रुजू झाले. पण वर्षभरातच त्यांची बनारस टाकसाळीत बदली झाली. तेथे त्यांनी तेथे नवीन टाकसाळीचा व चर्चचा आराखडा तयार केला. बनारस येथील वास्तव्यात प्रिन्सेप यांनी मंदिर स्थापत्यशैलीचा अभ्यास केला. बनारस येथील अनेक वास्तु व उत्सवांची लिथोग्राफ प्रकारामध्ये चित्र काढून बनारस इल्युस्ट्रेटेड नावाचे पुस्तक लंडन येथून प्रकाशित केले. सन १८३० मध्ये बनारस टाकसाळ बंद पडली आणि प्रिन्सेप पुन्हा कलकत्ता टाकसाळीत रुजू झाले. कलकत्ता टाकसाळीत काम करत असताना त्यांनी नाण्यांमध्ये सुसूत्रता आणली व त्याचबरोबर त्यांच्या वजनात योग्य ते बदल केले.

१८३२ साली जेम्स प्रिन्सेप यांची बंगालच्या एशियाटिक सोसायटीच्या सचिवपदी नेमणूक झाली. तेथे त्यांनी “जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी” या नियतकालिकाचे संपादकपद भूषवले. या नियतकालिकामध्ये त्यांनी धातुशास्त्र, रसायनशास्त्र, नाणकशास्त्र इ. विषयांवर लेख लिहिले. आजारपणामुळे १८३८ साली पुन्हा लंडनला जाईपर्यंत ते या नियतकालिकाचे संपादक होते. या नियतकालिकातील काही रेखाचित्रांचे रेखाटन स्वतः प्रिन्सेप यांनी केले आहे.

एशियाटिक सोसायटीच्या सचिवपदी असताना त्यांना संस्थेकडे असलेल्या प्राचीन नाण्यांचा अभ्यास व संशोधन करण्याची संधी मिळाली. १८३० साली होरास हेमन विल्सन यांच्या देखरेखीखाली त्यांनी भारतातील प्राचीन लिप्यांच्या अभ्यासाला सुरवात केली. नियतकालिकाचे संपादक असल्यामुळे शिलालेखांचे वाचन व भाषांतर करण्यासाठी त्यांच्याकडे नाणी व शिलालेखांचे ठसे येत होते. दरम्यानच्या काळात नॉर्वे येथील तज्ञ ख्रिस्तिअन लॅस्सेन यांनी इंडो-ग्रीक राजांची ब्राम्ही-ग्रीक अशा दोन लिप्या असलेल्या नाण्यांच्या सहाय्याने अनेक ब्राम्ही अक्षरांचा तक्ता तयार केला होता. उरलेल्या अक्षरांचा उलगडा जेम्स प्रिन्सेप यांनी मेजर कनिंगहॅम यांच्या सहाय्याने केला. सन १८३६-३८ या काळात प्रिन्सेप यांनी भारतातील अनेक ब्राम्ही शिलालेखांचे वाचन केले. त्यांना “देवानाप्रिय पियदसी” हे त्यांना अनेक शिलास्तंभावरील लेखात वाचायला मिळाले. सुरुवातीला हा श्रीलंकेतील राजा असावा अशी त्यांची धारणा होती. पण जॉर्ज टर्नर यांनी प्रिन्सेप यांना श्रीलंकेत उपलब्ध पाली भाषेतील साहित्याची माहिती दिली व त्याच्या आधारे “देवानाप्रिय पियदसी” म्हणजेच अशोक राजा हे सिद्ध केले. ब्राम्हीपाठोपाठ इंडो-ग्रीक नाण्यांवर असलेल्या खरोष्ठी लिपी वाचनाचे श्रेय सुद्धा प्रिन्सेप यांचेच.कॉर्पस इनस्क्रीप्शनम इंडीकेरम या ग्रंथमालेची मूळ संकल्पना प्रिन्सेप यांची होती. सन १८७७ मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले.

सांची स्तुपावरील लेखाबद्दल प्रिन्सेप यांचे मत: I was struck at their all terminating with the same two letters दानं (Bramhi Danam). Coupling this circumstance with their extreme brevity and insulated position, which proved that they could not be fragments of a continuous text, it immediately occurred that they must record either obituary notices, or more probably the offerings and presents of votaries, as is known to be the present custom in the Buddhist temples of Ava; where numerous dwajas or flag-staffs, images, and small chaityas are crowded within the enclosure, surrounding the chief cupola, each bearing the name of the donor. The next point noted was the frequent occurrence of the letter (Bramhi sa), already set down incontestably as s, before the final word:—now this I had learnt from the Saurashtra coins, deciphered only a day or two before, to be one sign of the genitive case singular, being the ssa of the Pali, or sya of the Sanscrit. “Of so and so the gift,” must then be the form of each brief sentence; and the vowel a and anuswara led to the speedy recognition of the word danam, (gift,) teaching me the very two letters, d and n, most different from known forms, and which had foiled me most in my former attempts. Since 1834 also my acquaintance with ancient alphabets had become so familiar that most of the remaining letters in the present examples could be named at once on reinspection. In the course of a few minutes I thus became possessed of the whole alphabet, which I tested by applying it to the inscription on the Delhi column.

इ. टॉमस यांनी प्रिन्सेप यांचे विविध लेख संपादित करून १८५८ साली एसेज ऑन इंडियन अँटिक्विटीज-हिस्टॉरिक, न्यूमिझ्‌मॅटिक अँड पॅलोग्राफिक (दोन खंड) प्रकाशित केले. ॲण्टिओकस व इतर ग्रीक राजांच्या संदर्भामुळे प्राचीन भारतातील विविध राजघराण्यांचा काळ ठरवणे त्यांना सोपे गेले. भारताबरोबरच त्यांनी अफगाणीस्तानाचा प्राचीन इतिहास आणि तेथील अनेक पुरातत्वीय जागांचा अभ्यास पण केला होता.

प्रकृती वारंवार बिघडू लागल्यामुळे नोव्हेंबर १८३८ आपला अभ्यास अर्धवट सोडून प्रिन्सेप यांना लंडनला पुन्हा रवाना व्हावे लागले. लंडनला पोहोचले तेव्हा त्यांची प्रकृती भरपूर ढासळली होती. आजारपणामुळे बहिण सोफिया हिच्या घरी २२ एप्रिल १८४० रोजी प्रिन्सेप यांचा मृत्यू झाला. प्रिन्सेप यांच्या कामाची दखल घेऊन वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन फोर्ब्स रॉयल यांनी एका झाडाच्या पोटजातीचे प्रिन्सेपिया असे नामकरण केले. प्रिन्सेप यांच्या मृत्यूनंतर भारतात त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके उभारण्यात आली. एशियाटिक सोसायटी, कलकत्ता येथे प्रिन्सेप यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला. सन १८४३ मध्ये कलकत्ता येथील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ हुगळी नदीच्या तीरावर प्रिन्सेप घाट बांधला. प्रिन्सेप यांच्या संग्रहातील काही नाणी आणि पुरावशेष ब्रिटीश संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स