SmarakShilp

जंगल सत्याग्रह करणारे चिरनेर

उरण तालुक्यातील चिरनेर हे छोटेसे गाव क्ष्री क्षेत्र महागणपती आणि १९३० साली झालेला जंगल सत्याग्रह या दोन गोष्टींमुळे प्रसिध्द आहे.

जंगल सत्याग्रहाच्यावेळी झालेल्या गोळीबाराचे महागणपती मंदिर साक्षीदार आहे.

श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप गेल्या काही वर्षात बांधलेला असला तरी गर्भगृह आपले जुनेपण टिकवून आहे. गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती साधारणपणे २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद आहे. या गणपतीच्या पायात असलेले तोडे हे या गणपतीचे वैशिष्ट्य. महागणपतीची मूर्ती अंदाजे ३००-४०० वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जुनी असावी.

श्रींची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आलेली असून नंतरच्या काळात मूर्तिभंजकांपासून रक्षण करण्यासाठी मंदिरासमोर असलेल्या तलावात मूर्ती लपवून ठेवण्यात आली. कालांतराने पेशव्यांचे कल्याण येथील सुभेदार रामजी महादेव फडके चिरनेर येथे वास्तव्यास असताना त्यांना गणपतीने दृष्टांत झाला. दृष्टांतानुसार तलावातून गणपतीची चतुर्भुज मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि तलावाशेजारी या महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली अशी आख्यायिका महागणपतीच्या मूर्तीबद्दल सांगण्यात येते.

महागणपती मंदिरासमोरील तलाव

१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे चिरनेर गाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे ह्या परिसरात प्राबल्य असून त्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय होता. चिरनेर आणि परिसरातील कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांनी २५ सप्टेंबर १९३० इंग्रजांनी ना जंगलातील लाकडे तोडण्यास २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रजांनी विरोध केला. परंतु गावकऱ्यांनी काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहासाठी परिसरातील अनेक लोक रस्त्यावर आली. महात्मा गांधीनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठींबा देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढून घेतला.

सत्याग्रह चालू असताना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना अपंगत्व आले, तर धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), हे सत्याग्रही हुतात्मा झाले. या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते.

या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरनेर गावात दोन हुतात्मा स्मारक बांधलेली आहेत. या स्मारकाच्या शेजारी हुतात्मा स्मारक शिल्प उभारण्यात आलेले असून या स्मारक शिल्पात हुतात्म्यांची शिल्प उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर १९३२ साली पाडलेल्या स्मृतिस्तंभाचा कळस ह्या स्मारक शिल्पात जतन करून ठेवला आहे. त्याचबरोबर सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी महागणपती मंदिराच्या गजाला लागली. तो गज सत्याग्रहाची आठवण म्हणून मंदिरात अजूनही जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

मंदिरातील गोळी लागलेला गज

महागणपती मंदिराच्या शेजारी शंकराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर आधुनिक दिसत असले तरी या ठिकाणी एखादे जुने मंदिर असावे असे तेथील विविध शिल्पावरून वाटते. सभामंडपातील असलेली नंदीची मूर्ती, गर्भगृहाच्या देवकोष्टकात असलेली गणपती आणि अजून एका देवतेची मूर्ती, गर्भगृहाच्या ललाटबिंबावरील गणेशमूर्ती, गाभाऱ्यात असलेले शिवलिंग आणि मुळची भैरवाची पण आता देवीची मूर्ती इ. अनेक शिल्प मंदिराचे प्राचीनत्व सिध्द करतात. त्याचबरोबर मंदिराचे प्राचीनत्व सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे म्हणजे मंदिरपरिसरातील दोन गध्देगाळ. गध्देगाळावर शिलालेख कोरलेले असतात. वरील भागात सूर्यचंद्र आणि त्यांच्या मध्ये मंगलकलश, मधल्या भागात शिलालेख अर्थात राजाने दिलेले दानपत्र (लेख) आणि सर्वात खाली गाढव व स्त्री यांचा संकर असे गध्देगाळाचे तीन भाग असतात. महाराष्ट्रात शिलाहार, चालुक्य, यादव इ. राजघराण्यांबरोबर मुसलमान शासकांनी कोरलेले गध्देगाळ सापडतात. स्थानिक लोकांना गध्देगाळांचे महत्त्व माहिती नसल्यामुळे आणि त्यावरील शिल्पामुळे गध्देगाळांची निगा राखली जात नाही. तसेच अनेक शतके उघड्यावर राहिल्यामुळे किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसल्यामुळे लेखाची झीज होऊन लेख अवाचनीय बनतो.

शंकर मंदिर मंदिरपरिसरात असलेल्या छोट्या मंदिरात एक गध्देगाळ आहे. मात्र शेंदूर फासल्यामुळे शिलालेख नष्ट झाला आहे. मंदिरात स्थानिक देवतेची मूर्ती पण आहे. दुसरी गध्देगाळ मंदिराच्या शेजारी उघड्यावर आहे. या गध्देगाळालासुध्दा शेंदूर लावल्यामुळे त्यावरील शिलालेख नष्ट झाला आहे. ह्या दोन्ही गध्देगाळांच्या वैशिष्ट्यांवरून त्या शिलाहारकालातील म्हणजेच अंदाजे १०००-१२०० वर्ष जुन्या असाव्यात.

श्री क्षेत्र महागणपती मंदिरात जाताना एका घराच्या अंगणात घुमटी प्रकारातील दोन समाधी आहेत. एका घुमटीवर स्त्री-पुरुष तर दुसरीवर फक्त पुरुषाचे चित्र आहे. या दोन्ही घुमट्यांवर लेख नाही आहे.

चिरनेर गावापासून साधारणपणे ५-६ किमी अंतरावर कर्नाळा किल्ला व अभयारण्य आहे. त्यामुळे चिरनेर गावाला भेट दिल्यानंतर कर्नाळा किल्ल्याला भेट द्यायला काहीच हरकत नाही.­

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.