कान्हेरी लेणी आणि परदेशी यात्रेकरू

साधारणपणे २१०० वर्षापूर्वी कान्हेरी लेणी संकुलात लेणी खोदायला सुरुवात झाली. प्राचीन भारतातील महत्त्वाचे बंदर असलेल्या सोपारा किंवा सूर्पारक (आत्ताचे नालासोपारा) येथील बुद्ध भिक्षूसंघाने काण्हेरी लेण्यांचा पाया रचला आहे. सोपारा येथे बुरुड राजाचा कोट म्हणून ओळखला जाणारा स्तूप भगवान बुद्धांच्या सोपारा भेटीच्या स्मरणार्थ बांधला असे मानले जाते. भगवानलाल इंद्राजी यांना सोपारा येथे अशोकाच्या दोन राजाज्ञांचे अवशेष मिळाले आहेत. सोपारा येथून पैठण, तेर या शहरांकडे जाणारा व्यापारी मार्ग कान्हेरी लेण्यांच्या जवळून जात होता. त्यामुळेच कान्हेरी लेणीसंकुल बौद्धधर्माचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भरभराटीला आले होते. ही भरभराट अंदाजे ११व्या-१२व्या शतकापर्यंत टिकून होती. कान्हेरी लेण्यातील ब्राह्मी शिलालेखातून राजघराण्याची राजवट, दान काय दिले, दान दिलेली व्यक्ती कुठे राहत होती, तिचा व्यवसाय काय होता इ. अनेक गोष्टींची माहिती मिळते. चिनी प्रवासी आणि बौद्ध भिक्षू ह्यूएनत्संग या लेणी संकुलाला भेट देणाऱ्या अनेक देशी-परदेशी बौद्ध भिक्षूंपैकी एक.

ह्यूएनत्संग याने आपल्या प्रवासवर्णनात महाराष्ट्र आणि कान्हेरी लेण्यांचे सुंदर वर्णन केले आहे.

लेणी क्र ९० मधील पहलवी आणि जपानी लिपीतील शिलालेखांमुळे कान्हेरी लेणीसंघात परदेशी यात्रेकरू येऊन गेले होते हे कळायला मदत होते.

बौद्ध भिक्षूंची कान्हेरी लेणीसंघामध्ये वर्दळ चालू असताना ११व्या शतकाच्या पूर्वार्धात इराण येथून काही पारशी लोक कान्हेरीला आले होते आणि त्यांनी पहलवी लिपीत तीन शिलालेख या लेणीच्या व्हरांड्यातील स्तंभांवर कोरून ठेवलेले आहेत. या शिलालेखांमुळे त्या पारशी लोकांची नावे, ते कधी आले होते इ. महत्त्वाची माहिती मिळते. पहलवी लिपी वाचन उजवीकडून डावीकडे केले जाते. पण येथील सर्व लेख उभे कोरलेले आहेत. त्यामुळे हे लेख खालून वर वाचावे लागतात. हे लेख उजवीकडून डावे अशी नेहमीची पद्धत सोडून उभे का कोरले हे कळत नाही. तीन लेखांपैकी पहिला लेख अर्धवट आहे.

पहलवी शिलालेख क्र १

व्हरांड्याच्या दर्शनी भागातील उजव्या खांबावर आहे. हा लेख जास्त खोल कोरलेला नाही.

सारांश: यझ्दकर्द ३७८व्या वर्षाच्या मित्रो महिन्यात अहुरामझ्दा (अर्थ: बुद्धिमत्तेची देवता) या दिवशी (१० ऑक्टोबर १००९) या ठिकाणी मित्र-ऐयार याचे मुलगे यझदान-पानक आणि माह ऐयार, माह…. याचा मुलगा बेह-झाद आले होते.

ह्या लेखात बेह-झाद याच्या वडिलांचे नाव नष्ट झाले आहे.

पहलवी शिलालेख क्र २

हा लेख लेण्याच्या दर्शनी भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यावर कोरलेला आहे. या लेखातील तारीख पहिल्या शिलालेखातील तारखेनंतर ४५ दिवसांची आहे.

सारांश: यझ्दकर्द सन ३७८ अवान महिन्यात मित्र दिवशी (२४ नोव्हेंबर १००९) या ठिकाणी मित्र-ऐयार याचे मुलगे यझदान-पानक आणि माह-ऐयार, माह-ऐयार याचे मुलगे पंज-बुख्त आणि पदर-बुख्त, हिराद-बहराम याचा मुलगा मर्दन-शाद, मर्दन-शाद याचा मुलगा हिराद-बहराम, बहराम-पनाह याचा मुलगा मित्र-ऐयार, मित्र-ऐयार याचा मुलगा बहराम-पनाह, आतुर-माहान याचे मुलगे फलान-झाद आणि झाद-स्परहाम, माह-बाझाई याचे मुलगे नुक-माहान, दिन-बहराम, बजुर्ग-आतुर, हिराद-मर्द आणि बेह-झाद, मित्र-बंदाद याचा मुलगा बहराम-पनाह आले होते. आतुर महिन्यात आवान-बंदाद याचा मुलगा आहुरमझ्दा याचे निधन झाले.

मर्दन-शाद आणि मित्र-ऐयार यांनी आपल्या मुलांची आजोबांच्या नावावरून ठेवलेली आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पारशी समुदायात मुलाचे नाव आजोबांच्या नावावरून ठेवायची पद्धत रूढ आहे.

पहलवी शिलालेख क्र ३

हा लेख व्हरांड्यातील डाव्या हाताच्या अर्धस्तंभावर कोरलेला आहे.

सारांश: यझ्दकर्द ३९०व्या वर्षाच्या मित्र महिन्यात दिन दिवशी (३० ऑक्टोबर १०२१) या ठिकाणी इराण येथून मित्र-ऐयार याचे मुलगे माह-फ्रोबग आणि माह-ऐयार, माह-ऐयार याचा मुलगा पंज-बुख्त, हिराद-बहराम यांचा मुलगा मर्दन-शाद, मित्र-विंदाद यांचा मुलगा बेह-झाद, बहराम-गुशनास्प यांचा मुलगा जावीदान-बूद, माह-बाझाई यांचा मुलगा बजुर्ग-आतुर, हिराद-फारुखो यांचे मुलगे माह-ऐयार आणि बन्देश, गेहान-खास यांचा मुलगा माह-बंदाद येथे आले होते.

जपानी शिलालेख

व्हरांड्याच्या डाव्या भिंतीवर जपानी लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. बहुदा हा भारतातील एकमेव जपानी लिपीतील शिलालेख असावा. पण या लेखाच्या काळाबाबत अभ्यासकांमध्ये दुमत आहे.

वाचन

नम-म्योहो-रेंजे-क्यो
नम-म्यो-निचि-रेण-दाई-बो-सत्स

संस्कृत वाचन

नम: सद्धर्म-पुण्डरीक-सूत्राय
नमो निचिरेन महाबोधीसत्त्वाय

सारांश: सद्धर्म पुंडरिकसूत्राला प्रणाम. महान बोधिसत्त्व निचिरेन याला प्रणाम.

महायान पंथातील सद्धर्म पुंडरिक हे महत्त्वाचे सूत्र आहे. पुंडरिक म्हणजे कमळ. कमळ हे पूर्णत्वाचे आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. हे सूत्र पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात लिहिले गेले आहे असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत भाषेत लिहिलेल्या या सूत्राचे मूळ हस्तलिखित नष्ट झालेले आहे. ह्या सूत्राची चीनी भाषेतील प्रत तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. धर्मरक्ष यांनी सन २८६ मध्ये हे भाषांतर केले आहे. पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात भिक्षू कुमारजीव यांनी साधारणपणे सन ४०५ किंवा ४०६ मध्ये चीनी भाषेत केलेले भाषांतर विश्वासार्ह मानले जाते आणि ते भाषांतर जपान आणि चीन येथे प्रसिद्ध आहे. कुमारजीव यांचे भाषांतर विश्वासार्ह मानले जात असले तरी सुरुवातीला कुमारजीव यांच्या भाषांतरामध्ये देवदत्त, अवलोकितेश्वर आणि भैशाज्यराजा बोधिसत्त्व यांच्याबद्दल काहीही माहिती मिळत नाही. नंतरच्या काळामध्ये कुमारजीव यांच्या भाषांतरामध्ये देवदत आणि इतर माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे कुमारजीव याचे मूळ भाषांतर आणि सध्याचे प्रचलित भाषांतर यात फरक आहे.

निचिरेन (१२२२-१२८२) यांनी सद्धर्म पुंडरिकसूत्रावर आधारित निचिरेन पंथाची स्थापना जपानमध्ये केली. हा शिलालेख निचिरेन याच्या शिष्याने आपल्या भारतभेटीत कान्हेरी लेण्यांत वास्तव्य केले तेव्हा कोरलेला असावा असे मत या शिलालेखाचा पहिल्यांदा ठसा घेणारे सी. ए. मुछला यांनी १९३२ साली मांडले होते. परंतु, जेव्हा या शिलालेखाचा ठसा १९३२ साली ओसाका (जपान) येथील निचिरेन पंथाचे उपदेशक रेव्ह. इहारा यांना दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी हा शिलालेख फार जुना नसून जास्तीत जास्त २० वर्षांपूर्वी म्हणजे १९१२ च्या आसपास कोरलेला असावा असे सांगितले.

इहारा यांनी दिलेल्या माहितीनुसार रीस्शो कॉलेज, टोकियो येथील प्रोफेसर आणि निचिरेन पंथाचे अनुयायी क्योत्सुई ओका साधारणपणे १९११ किंवा १९१२ मध्ये भारतात आले होते आणि त्यांनी विविध बौद्ध धार्मिक स्थळांना भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान त्यांनी कान्हेरी येथे हा लेख कोरलेला असावा. कान्हेरी शिवाय भेट दिलेल्या इतर धार्मिक स्थळांवरही क्योत्सुई ओका यांनी असे शिलालेख कोरलेले असावेत असे रेव्ह. इहारा यांना वाटते. क्योत्सुई ओका यांच्या आधी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात बिशप असाही निची म्यो भारतात आले होते. पण त्यांनी असे कोणतेही शिलालेख कोरलेले नाही असे इहारा यांचे मत आहे. इहारा यांनी दिलेल्या संदर्भानुसार निचिरेन याचा शिष्य निचिजी बाराव्या शतकात जपान येथून भारतभेटीसाठी निघाला होता. मांचुरिया, मंगोलिया असा प्रवास करत तो तिबेट येथे पोहोचला. पण भारतात पोहोचण्यापूर्वीच तिबेट येथील जंगलात निचिजी यांचा मृत्यू झाला असे मानले जाते.

जपानी शिलालेख निचिरेन पंथासंबंधित असला तरी शिलालेख बाराव्या शतकातील नाही. त्याचबरोबर अकराव्या शतकात इराणमधील पारशी लोकांपर्यंत कान्हेरी येथील लेण्यांची माहिती पोहोचली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी हजारो किलोमीटर प्रवास करून कान्हेरी लेण्यांना भेट दिली. पारशी लोकांनी दिलेल्या भेटीवरून कान्हेरीचे तत्कालीन सांस्कृतिक महत्त्व आणि बौद्धधर्माबद्दल असलेले आकर्षण समजण्यास मदत होते.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.