कै. गंगाधर रघुनाथ केळकर यांचे दुर्लक्षित स्मारक

शनिवार पेठेतील अमृतेश्वर मंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाताना रस्त्याच्या डाव्या हाताला असलेले स्मारक वृंदावन जाणाऱ्यायेणाऱ्यांचे नेहमीच लक्ष वेधून घेते. मध्यवर्ती मुख्य स्मारक आणि त्याच्या चारही बाजूंना कमी उंचीचे चार स्तंभ अशी या स्मारकाची रचना आहे. परंतू स्मारकाच्या खोलगट भागात साचलेल्या पाण्यामुळे सर्वच जण ह्या स्मारकाकडे दुर्लक्ष करतात. मध्यवर्ती स्तंभावर असलेल्या संगमरवरी पाटीवर असलेल्या मजकुरामुळे हे स्मारक गंगाधर रघुनाथ केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भास्कर व दिनकर या दोन मुलांनी बांधले असे समजते.

श्री. गंगाधर र. केळकर हे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर गं. केळकर किंवा कवी अज्ञातवासी यांचे वडील

पण कोण होते श्री. गंगाधर केळकर आणि त्यांच्या मुलांनी एवढे देखणे स्मारक का उभारले? नवीन पिढीला गंगाधर केळकर माहिती नसतील, पण जुन्याजाणत्या लोकांना गंगाधर केळकर कोण होते याची नक्कीच माहिती असणार. श्री. गंगाधर र. केळकर हे राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर गं. केळकर किंवा कवी अज्ञातवासी यांचे वडील. तसेच गंगाधर रघुनाथ केळकर जुन्या काळातील नावाजलेले नेत्रशल्यतज्ञ होते.

स्मारकाच्या मध्यवर्ती असणाऱ्या चौकोनी चौथऱ्यावर दोन टप्प्यात अष्टकोनी चौथरा आहे. अष्टकोनी चौथऱ्याच्या वर शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या वारीमार्गाखाली फणाधारी नाग आहे. मध्यवर्ती स्तंभाच्या चार मुख्य दिशांना व उपदिशांना असलेल्या संगमरवरी पाट्यांवर गंगाधर केळकर यांच्याविषयी माहिती कोरलेली आहे.

उत्तरेकडील पाटीवर ।।श्री।। तीर्थस्वरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ असा मजकूर कोरलेला आहे. पश्चिमेकडील पाटीवर जन्मतिथी, शनिवार फाल्गुन शु. ५, शके १७७६, ता. ४ मार्च १८५४ असे कोरलेले आहे. पुर्वेच्या पाटीवर देहावसान स्वगृही, पुणे, सोमवार नागपंचमी, निजश्रावण शु. ५, शके १८५०, ता. २० ऑगस्ट १९२८ कोरलेले आहे. दक्षिणेला वास्तव्य, शांतिकुंज, जाईचे गेटाजवळ, सदाशिव पेठ, पुणे शहर कोरलेले आहे.

आग्नेयास ॐ हा स्तूप भास्कर व दिनकर यांनी आपल्या वडिलांचे दहनभूमीवर डिसेंबर १९२८ मध्ये बनवला असे कोरले आहे. नैऋत्येस ।।श्री।। तीर्थरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ असा मजकूर आहे. वायव्येस ॐ परं धाम, पवित्रं परमं भवान|| गीता अ. १०.१२ असे कोरले आहे. इशान्येला असलेल्या पाटीवर ॐ नमो नमस्तेऽस्तु सहस्त्र कृत्व: पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते|| गीता अ. ११.३९ असा मजकूर आहे.

मध्यवर्ती स्तंभाच्या पाठीमागील बाजूस डावीकडच्या स्तंभावर धनुर्धारी, विष्णू, गरुड आणि रुक्मिणी अशी शिल्प आहेत. पाठीमागील उजवीकडच्या स्तंभावर विठोबा, मारुती, विष्णू आणि धनुर्धारी शिल्प आहेत. दर्शनी भागातील डावीकडच्या स्तंभावर कृष्ण, विष्णू, दोन हात वर व दोन हात कमरेवर ठेवलेली मूर्ती, सरस्वती व मोर यांची शिल्प आहेत. दर्शनी भागातील उजवीकडच्या स्तंभावर कृष्ण, गणपती, धनुर्धारी आणि विष्णू अशी शिल्प कोरली आहेत.

कित्येक वर्ष दुरावस्थेत असलेल्या ह्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम पुणे महानगरपालिकेने हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर स्मारकाला चांगले दिवस येतील अशी आशा करायला हरकत नाही.

Creative Commons License

caption…

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

This image has an empty alt attribute; its file name is blog-footer.jpg