केशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर

कल्याण-आधारवाडी-सापे रस्त्याने उल्हास नदीवरील गांधारी पूल ओलांडल्यानंतर बापगाव नावाचे गाव आहे. गावकरी आणि अभ्यासक सोडल्यास फार कमी लोकांना बापगावला ७८० वर्षांचा इतिहास आहे याची माहिती असेल. केशिदेव दुसरा याच्या चौधरपाड्यातील शके ११६१ (सन १२३९) मधील शिलालेखात बापगाव किंवा बोपेग्रामचा पहिला उल्लेख वाचायला मिळतो.

शिलाहार राजघराण्यातील केशिदेव दुसरा बाविसावा राजा. अनंतदेव दुसरा याच्यानंतर केशिदेव दुसरा सत्तेवर आला. याचे याचे मांडवी (शके ११२५), अक्षी (शके ११३१) आणि चौधरपाडा (शके ११६१) असे तीन शिलालेख उपलब्ध आहेत.

काही वर्षांपूर्वी माळरानावर पडलेला गद्धेगाळ
(सौजन्य – डॉ. रुपाली मोकाशी)

बरीच वर्ष किंवा शतक हा शिलालेख चौधरपाड्याजवळील माळरानावर पडून होता. गावकऱ्यांना त्या शिलालेखाचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर गावात असलेल्या शिवमंदिराच्याशेजारी शिलालेखाचे जतन करून ठेवण्यात आले आहे. सन १८८२ मध्ये पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी हा शिलालेख उजेडात आणून त्याचे वाचन केले. शिलालेख २२ ओळींचा आहे. लेखाची भाषा संस्कृत आणि नागरी लिपी आहे. लेखाच्या वरील भागात चंद्र-सूर्य आणि मध्यभागी कलश आहे. शिलालेखाच्या खाली गद्धेगाळाचे शिल्प आहे.

वाचन

सिद्धम् ओं नमो विनायकाय || नमामि भुवनोत्पत्तिस्थितिसंहारकारिणं | श्रीमत्षुंपेस्व-
रं भक्तजनसर्वार्त्तिहारिणं ||१|| श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्जीमूतकेतो: कु-
ले विख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय श्रीकेशिपृथ्वीपति: | यस्यापारपवित्र-
पौरुषनिधेरालोक्य राज्यस्थिर्ति श्रीरामादिमहीभुजां भगवती धत्ते
धरा न स्मृतिं ||२|| सकसंवत् ११६१ विकारिसंवत्सरान्तर्ग्गतमाघ व दि १४
चतुर्द्दश्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणि अद्येह समस्तराजावलीसमलंकृ-
तमहाराजाधिराजकोंकणचक्रवर्त्तिश्रीकेशिदेवकल्याणवि-
जयराज्ये तथैतत्प्रसादात्समस्तराजमंडलचिंताभारं समुव्दहति
महामात्ये श्रीझंपडप्रभुमहासांधिविग्रहि के राजदेवे पंडितश्री-|
करणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखेषु सत्सु एतस्मिन्काले प्रवर्त्तमाने
सति ब्रह्मपुरीग्रामदानसासनं समभिलिक्षते यथा || श्रीषोंपेश्व-
रदेवपूजनसदाव्यासक्तसर्व्वा(न्तर:) | सत्पात्रव्दिजसोमनायक व –
टो: संतानयोग्यस्थिति | श्रीब्रह्मपुरीं पुरारिभवनक्ष्माभृन्मनोहा-
रिणीं | वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ||३|| वटुक-
नामानि कथ्यंते | सोमनायक: | सूर्य्यनायक: | गोविंदनायक: | ना(ऊ)-
नायक: | इति चत्वारो वटुका: || निर्व्वाहाव पुरारिपूजकबटुश्रेणीद्वि-
जानां सदा वो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे)सपल्ली पुरा दत्ता श्रीशि-
वरात्रि पर्व्वणी विभो: षोंपेस्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चं-
द्रार्क्कतारावधि ॥४॥ (राज्य)स्य मंत्रिणान्यैर्व्वा कर्त्तव्यं धर्म्मपालनं । धर्म-
ध्वंशे …….. नरकस्थिति ॥५॥ तथा चोक्तं पूर्वाचार्यमुनि-
भि: । सुवर्ण्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या-
(वदाभूत)संप्लवं ॥६॥ मंगलं महाश्री: । (शुभं भ)वतु ॥ लेषकपाठकयोः ॥

भाषांतर

सिद्धी असो. विनायकाचे नमन. विश्वाची उत्पत्ती, सांभाळ आणि संहार करणाऱ्या आणि सर्व भक्तांचे दु:ख दूर करणाऱ्या षोंपेश्वरासमोर मी नतमस्तक होतो. राजा अपरार्क (दुसरा) याचा मुलगा राजा केशी (देव) जो पराक्रमी विद्याधर वंशातील अमुल्य रत्न आहे आणि जीमूतवाहन वंशात सर्वपरिचित आहे. शक ११६१ विकारीन संवत्सर, शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, गुरुवार चतुर्दशी १४, माघ वद्य या दिवशी, त्याच्या आज्ञेनुसार राज्यकारभार सांभाळणारे महामात्य झंपडप्रभु, महासांधीविग्रही राजदेव पंडित, कोषाधिकारी अनंतप्रभु आणि इतर जण असताना ब्रम्हपुरी गावाचे दान दिल्याची राजाज्ञा पुढीलप्रमाणे लिहिण्यात आली आहे: षोंपेश्वराचा परमभक्त असलेल्या शूर आणि पराक्रमी केशी याने पुरारी (शिव) याचे ब्रह्मपुरी येथे भव्य आणि प्रसिद्ध मंदिराची निर्मिती केली, सोमनायक ब्राम्हणाच्या वंशजांकडे मंदिराचे हक्क अबाधित राहतील. सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक आणि नौनायक ब्राम्हणांची नावे आहेत. पराक्रमी राजा केशी (दुसरा) याने षोंपेश्वराच्या समक्ष बोपेग्रामातील मांजसपल्लीचे दान दिले. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत आणि पुरारीचे (शिवाचे) जोपर्यंत ब्राम्हण पूजन करतील तोपर्यंत हे दान कायम राहील. हे दान सांभाळून ठेवण्याचे धर्मपालन मंत्री आणि इतरांनी करावी. हे दान नष्ट करणारा नरकात जाईल. हे आमच्या गुरुंनीं अर्थात प्राचीन ऋषीमुनींनी नमूद करून ठेवले आहे. सर्वत्र मंगलमय आणि भरभराट होऊ दे. तसेच लेखकाचे आणि वाचकाचे कल्याण व्हावे.

शिलाहार राजे शंकराचे भक्त होते. त्यामुळे इतर देवतांची स्तुती शिलालेखातून बघायला मिळत नाही. हा पहिला शिलालेख आहे ज्यात विनायकाचे (गणपती) वंदन केले आहे. लेखात सोमनायक नंतर उल्लेखलेले सूर्यनायक, गोविंदनायक आणि नौनायक हे सोमनायकचे मुलगे आहेत. कारण लेखात स्पष्ट लिहिलेले आहे सोमनायकाच्या वंशजांकडेच मंदिराचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत. लेखात बोपग्राम, ब्रह्मपुरी आणि मांजसपल्ली अशा तीन स्थळांचा उल्लेख आहे. त्यापेकी बोपग्राम म्हणजे चौधरपाड्यापासून जवळच असलेले बापगाव. बोपग्रामतील बहुदा वाडी असलेले मांजसपल्ली गाव काळाच्या ओघात नष्ट झाले आहे. षोंपेश्वराचे मंदिर असलेले ब्रह्मपुरी म्हणजे आजचे चौधारपाडा असावे.

ज्या षोंपेश्वर मंदिराचा उल्लेख वरील शिलालेखात आहे, ते मंदिर बापगाव किंवा चौधारपाडा परिसरात होते. केशीदेवाने “श्रीब्रह्मपुरीं पुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं म्हणजे ब्रह्मपुरी येथील शिवमंदिर पृथ्वीतलावरील अत्यंत मनोहारी आहे” असे कोरून ठेवले आहे. एवढे सुंदर मंदिर कधी आणि कसे नष्ट झाले ह्याचे उत्तर आज कोणाकडेच नाही आहे. मंदिर नष्ट झाले तरी मंदिराच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेले भव्य शिवलिंग आणि उमा-महेश्वर मूर्ती मात्र सुस्थितीत आहेत आणि त्यांची स्थापना पाड्यातील मंदिरात करण्यात आली आहे.

उमा शंकराच्या डाव्या मांडीवर बसलेली असून तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आणि डाव्या हातात कमळ आहे. शिवाच्या उजव्या हातांमध्ये त्रिशूळ व माहळूंग आणि एक डावा हात उमाच्या डाव्या खांद्यावर आहे व दुसऱ्या हातात नाग आहे. उमाच्या डाव्या बाजूला गणपती आणि शिवाच्या उजव्या बाजूला मोरावर आरूढ कुमार (कार्तिकेय) आहे. शंकराच्या पायाजवळ वाहन नंदी आहे. शिवलिंग उंचीला साधारणपणे २ फूट आहे. याचे योनीपीठ चौकोनी आकाराचे आहे.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.