शाही दफनभूमी – खोकरी

मुरुडवरून म्हसळा येथे जाताना अंदाजे चार किमीवर एका टेकाडावर असलेल्या खोकरी या ठिकाणी मशिदीसारख्या वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. परंतु मशिद समजून आपण तिथे जाण्याचे टाळतो. पण प्रत्यक्षात त्या मशिदी नसून मुरुड संस्थानचे सिद्दी यांच्या शाही कबरी आहेत.

खोकरी येथील तीन दगडी कबरी सुमारे ४५० वर्षे जुन्या आहेत. सगळ्यात मोठी कबर सिद्दी सुरूल खान याची आहे. सन १७०७–१७३४ या काळात जंजीऱ्याची सत्ता याच्या हातात होती. सुरूल खानाची कबर त्याच्याच हयातीत बांधण्यात आली असे सांगितले जाते. सुरूल खानाची कबर एका उंच चौथऱ्यावर बांधलेली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात कोरलेली जाळ्या आहेत, तसेच छोटीछोटी कोष्टक पण बनवलेली आहेत. कबरीत सर्वत्र फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरूल खान आणि त्याच्या गुरुचे थडगे आहे.

दुसऱ्या दोन लहान कबरींपैकी एक कबर सन १६७७-१६९६ या काळात मोगली सत्तेच्या नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. जनमानसात सिद्दी कासीम हा याकुत खान नावाने ओळखला जात होता. याने सन १६७०-१६७७ आणि पुन्हा सन १६९७-१७०७ अशी सत्ता उपभोगली. तिसरी कबर याकुत खानाचा भाऊ खैरीयत खान याची आहे. दंडा-राजापुरी प्रांताचा सन १६७०-१६७७ या काळात खैरीयत खान प्रमुख होता. सन १६७७-१६९६ या काळात खैरीयत खान जंजिऱ्याचा प्रमुख होता. याकुत खान आणि खैरियत खान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरलेले आहेत. या शिलालेखांनुसार खैरीयत खान याचा मृत्यू हिजरी ११०८ (सन १६९६) आणि याकुत खान याचा मृत्यू ३० जमादिलवल हिजरी १११८ (सन १७०७) मध्ये झाला.

सुरूल खानाच्या कबरीच्या देखभालीसाठी २,००० रुपये वार्षिक महसूल असलेले सावळी-मिठागर आणि याकुत खान व खैरियत खान यांच्या कबरीच्या देखभालीसाठी दोडाकल गावाचा महसूल नवाबाने लावून दिला होता.

खोकरी येथे मुरुड संस्थानचे सिद्दी यांच्या शाही कबरी आहेत

ह्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरले आहेत. कबरींच्या परिसरात मशिदसुध्दा आहे. तसेच रस्त्याच्या पलीकडे अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे माहिती नाही.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.