शेवटचा शिलाहार राजा – सोमेश्वर आणि त्याचे लेख

उत्तर शिलाहार राजवंशाने सुमारे ४६५ वर्ष (इ.स. ८०० – १२६५) कोकणप्रांतावर राज्य केले. ठाणे आणि रायगड या प्रांतावर यांचे राज्य पसरले होते. उत्तर शिलाहार राजवंशाचा संस्थापक कपर्दिन पहिला (अंदाजे सन ८००-८२५) हा उत्तर कोकणावर राज्य करणारा पहिला ज्ञात राजा. कपर्दिन पहिला हा राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (सन ७९३-८१४) याच्या समकालीन. कपर्दिन पहिला राष्ट्रकुटांचा मांडलिक राजा असावा आणि त्याने राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा याला उत्तर कोकणात राज्यविस्तारासाठी महत्त्वपूर्ण मदत केली असावी. राज्यविस्तारासाठी केलेल्या मदतीबद्दल कपर्दिन पहिला याच्याकडे नवीन प्रांताची जबाबदारी सोपवली असावी. कपर्दिन पहिला याच्या राज्यकाळातील एकही शिलालेख उपलब्ध नाही. कपर्दिन पहिला हा शिलाहार राजघराण्याचा संस्थापक होता हे उत्तर कोकणला त्याच्या सन्मानार्थ दिलेल्या कपर्दिक द्वीप किंवा कवडी द्वीप या नावावरून समजते. श्रीस्थानक (आत्ताचे ठाणे) ही उत्तर शिलाहारांची राजधानी होती. महासामंत, कोकणवल्लभ, पश्चिमसमुद्राधिपती, कोकणचक्रवर्ती, महासामंताधिपती, तगरपुर परमेश्वर, सिलारनरेंद्र, त्यागजगझंप्यगुण, महामंडलेश्वर, स्वर्णगरुडध्वज, गंडरुध्दफोडी, गंडनारायण, मंडलिकत्रिनेत्र, महामंडलेश्वराधिपती, समस्तकोंकणभुवन इ. बिरुदे शिलाहार राजे लावत होत. 

सोमेश्वर (सोमेश्वरदेव) हा उत्तर शिलाहार राजवंशाचा शेवटचा राजा असून सन १२५५-१२६५ या काळात त्याने राज्य केले.

अशा वैभवशाली उत्तर शिलाहार राजवंशाचा सोमेश्वर (सोमेश्वरदेव) शेवटचा राजा असून सन १२५५-१२६५ या काळात त्याने उत्तर कोकणावर राज्य केले. सोमेश्वराचे सन १२५९ आणि १२६० मधील शिलालेख उपलब्ध आहेत. याच्या काळात देवगिरीच्या यादवांचे सामर्थ्य वाढीस लागले होते. उत्तर कोकण ताब्यात घेण्यासाठी यादव राजा कृष्ण (सन १२४७-१२६१) याने सेनापती मल्ल याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. पण या मोहिमेतून यादवांना कोणताही जास्तीचा भूभाग मिळाला नाही. कृष्णानंतर सत्तेवर आलेल्या त्याचा भाऊ महादेव याने हत्तींचा समावेश असलेल्या मोठ्या सैन्यासह उत्तर कोकणावर आक्रमण केले. जमिनीवर झालेल्या दारुण पराभवानंतर सोमेश्वराने आपल्या नौसेनेचा आश्रय घेतला. परंतु महादेवाने सोमेश्वराचा समुद्रातसुध्दा पाठलाग केला. महादेवाबरोबर झालेल्या नौकायुध्दात सोमेश्वर बुडून मेला असावा. ह्या घटनेबद्दल हेमाद्री म्हणतो महादेवाच्या क्रोधाग्नीपेक्षा समुद्रातील वडवानळ अधिक सुसह्य असावा असे मानूनच सोमेश्वराने समुद्राचा ठाव घेतला. हेन्री कझिन्स यांनी मेडीएवल टेंपल ऑफ डेक्कन या पुस्तकात एक्सर येथे सात वीरगळ होत्या असे नमूद करून ठेवले आहे. परंतु सद्यस्थितीत चार अखंड वीरगळ, तर एक अर्धवट वीरगळ आणि काही वीरगळांचे अवशेष बघायला मिळतात. या वीरगळ १२व्या-१३व्या शतकातील असल्यामुळे तसेच या वीरगळांवर हत्तींचा समावेश असलेले जमिनीवरील युध्द आणि एकमेकांवर आक्रमण करण्याऱ्या नौकांचे युध्द दाखवण्यात आलेले असल्यामुळे वीरगळांवर दाखवलेला युध्दप्रसंग शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यातील असे हेन्री कझिन्स यांचे मत आहे.

सोमेश्वर राजाचे रानवड (शक ११८१) आणि चांजे (शक ११८२) असे दोन शिलालेख उपलब्ध आहेत.

रानवड शिलालेख (शक ११८१)

शिलालेख असलेली गध्देगाळ उरण जवळील रानवड गावात मिळाली. या शिलालेखाची नोंद पहिल्यांदा पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी केली. भगवानलाल इंद्राजी यांच्यानंतर डॉ. अळतेकर, डॉ. सांकलिया व एस. सी. उपाध्याय, डॉ. दिक्षित, डॉ. तुळपुळे यांनी या शिलालेखाची नोंद घेतली आहे.

हा शिलालेख सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहे. नागरी लिपीतील हा शिलालेख संस्कृत-मराठी अशा संमिश्र भाषेत असून ११ ओळींचा आहे.

वाचन

सिध्दम् (|) स्वस्ति (|) श्री: अद्येह समस्तराजावलीसमलंकृतमहाराजाधि-
राजकों(क)णचक्रवर्तिश्रीमत्सोमेश्वरदेवरायकल्याणविजयराज्ये
तथैतप्र सादाव्याप्तसमस्तमंडलचिंत्ताभारं समुद्वहति महामात्यश्री-
झंपडप्रभु महासांधिविग्रही (तैज)प्रभु श्रीकरणी दादप्रभु इत्यादी (श्री)
करणभांडागारे (सत्येतस्मिन्) काले प्रवर्त्तमाने सति शकसंवतु ११८१ (सि)-
धार्थसंवछरे चैत्र व दि १५ सामाई श्रीदामोदरभट्ट तथा भ्रातर वासु-
दे(व) भट्ट नेऊन २ नारियले (दे)णे निमित्ते श्रीराउलें दामोदरभट्टांचिया
उरणेंपडिवसेंग्रामपतिबध्दखंडपलास्थानिचा | भाग १ देउलेखं(ड)-
समग्र हिया वृत्ती ३(सर्वे)चां वृत्तिची निमित्तें सूर्यपर्वे हस्तोदकपू-
र्वक दामोदरभटांचेआं भाउआं प्रती भाउआं प्र(ती) सकरंति दीन्ह-
लीआ (|) मंगल महाश्री:||

भाषांतर

सिध्दी असो. समस्तराजावलिसमलंकृत, महाराजाधिराज, कोंकणचक्रवर्ति श्रीमत सोमेश्वरदेव हा राज्य करत असताना आणि त्याच्या मंत्रीमंडळात महामात्य झंपडप्रभु, महासांधिविग्रही तैजप्रभु आणि श्रीकरणी दादप्रभु असताना, शक संवत ११८१ सिध्दार्थ संवत्सरी चैत्र वद्य १५ रोजी श्रीराउलाने (सोमेश्वरदेवाने) श्रीदामोदरभट्ट तसेच भाऊ वासुदेवभट्ट यांना आमंत्रण देऊन २ नारळ अर्पण करून, दामोदरपंत आणि त्यांच्या भावाला संक्रांतीच्या निमित्ताने उरणेंपडिवसें या गावातील खंडपलास्थानाचा एक भाग, देउलेखंड संपूर्ण व तीन वृत्ती (म्हणजे शेते) हस्तोदकपूर्व दिले. मंगल महाश्री.

ह्या लेखाची पहिल्यांदा नोंद घेणारे भगवानलाल इंद्राजी यांनी काल चुकीने ११७१ असा नोंदून ठेवला. परंतु डॉ. अळतेकर यांनी हा शिलालेख शके ११८१ मधील असल्याचे दाखवून भगवानलाल इंद्राजी यांची चूक दुरुस्त केली. चैत्र वद्य १५ शके ११८१ या दिवशी मेषसंक्राती होती आणि त्या निमित्ताने लेखातील दान दिले आहे. लेखातील उल्लेख आलेले उरण गाव अजूनही त्याच नावाने ओळखले जाते. पण पडिवसे नावाचे कोणतेही गाव उरण परिसरात नाही आहे. डॉ. सांकलिया आणि डॉ. उपाध्याय यांच्या मते उरण जवळील फुंडे किंवा पांजे म्हणजे पडिवसे गाव. खंडपलास्थान म्हणजे नक्की काय हे सांगता येत नाही आणि देउलखंड म्हणजे देवळाशी निगडीत भाग किंवा देवळाशी निगडीत जमीन.

चांजे शिलालेख (शक ११८२)

उरण जवळील चांजे गावात शिलालेख असलेली गध्देगाळ मिळाली. पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी या शिलालेखाची नोंद पहिल्यांदा केली. भगवानलाल इंद्राजी यांच्यानंतर डॉ. सांकलिया व डॉ. उपाध्याय, डॉ. तुळपुळे यांनी या शिलालेखावर काम केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात हा शिलालेख असलेली शिळा सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे. नागरी लिपीतील हा शिलालेख संस्कृत-मराठी अशा संमिश्र भाषेत असून १८ ओळींचा आहे.

वाचन

ओं नमो विनायकाय | लंवोदर नम(स्तु)भ्यं सततं मोदकपृयं ||
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा | अद्येह समस्तरा–
जावलीसमलंकृत | महाराजाधिराज | कोंकणचक्रव-
र्तिश्रीसोमेस्वरदेवरायकल्याणविजयराज्ये तथैतत्प्रसादा-
व्याप्तसमस्तमंडलचिंताभारं समुद्वहति महामात्य श्रीझांपडप्रभु
महासांधिविग्रह माइनाकु | बेबलप्रभु | पोमदेपंडित | श्रीकरणीभां-
डागारे प्रथमच्छेपाटी गोवेनाकु | इत्येतस्मिन्काले प्रवर्तमाने सति श-
कनृपकालातीतसंवच्छरसतेष्वेकादशसु | द्वासीत्यधीकेषु अत्रांकतोपि
सक संवतु ११८२ रौद्रसंवच्छरे चैत्र वदि १५ सोमदिने | सूर्योपरागे उ-
रण आगराभू | चांडिजेग्रामप्रतिवदकोंथलेस्थानवाटिकाभू | अस्य चा-
घाटनानि | पूर्वे | सानु ठाकुराची वृति | दक्षिणें विष्नु(क)न्हाची वृति | पश्चिमें
राजमार्ग | उत्तरें विरा | एवं चतुराघाटनानि | ससीमापर्यंतं सतृणकाष्ठो-
दकोपेतं रुणदायाद्यदिसंवंधविजर्जितं सर्व्वोत्पतिसहितं सिधा(या) पोरुत्थ(द्र)-
माणां दश विसोव द्विषष्ठीद्रमाभ्यधीकमेकशतानि | अंकतोपि द्र १६२
श्रीस्थानकीयश्रीउत्तरेस्वरदेवाय शासनप्रतिवधं कृत्वा | महाराजश्री-
सोमेस्वरदेवेन उदकातिसर्ग्गेण प्रदत्तं || वर्तमानस्यास्य धर्मस्य परिपं-
थना न सेनापि कार्या | स्वदतां परदतां वा यो हरेत वसुंधरा | षष्ठिवर्षसह-
स्त्राणि विष्ठायां जायते कृमि || मंगलं माहाश्री (:) सुभं भवतु ||

भाषांतर

सिध्दी असो. विनायकाला नमन. ज्याला मोदक प्रिय आहेत त्या लंबोदराला नमस्कार. देवा, कायम माझी सर्व विघ्न दूर कर. महाराजाधिराज, कोंकणचक्रवर्ती श्री सोमेश्वरदेव हा राज्य करीत असताना आणि महामात्य श्री झांपडप्रभु, महासांधिविग्रही माईनाकु, बेबलप्रभु, पोमदेपंडित आणि प्रथमच्छेपाटी (कोषाध्यक्ष) त्याच्या कृपेने मंत्रीमंडळात असताना, शक संवत ११८२ रौद्र संवत्सर चैत्र वद्य 15 सोमवार सूर्यग्रहणप्रसंगी, सोमेश्वरदेवाने हस्तोदकपूर्व श्रीस्थानक येथील श्रीउत्तरेश्वरदेवाच्याप्रित्यर्थ उरणजवळील चांडिजे गावातील कोंथळेस्थानातील जमीन, जमिनीच्या सीमा पुढीलप्रमाणे: पूर्वेला सानु ठाकुराची वृत्ति (शेत), दक्षिणेस विष्णुकान्हाची वृत्ति, पश्चिमेस राजमार्ग आणि उत्तरेस विरा (माळरान जमीन) आणि १६२ पोरुत्थ द्राम यांचे दान दिले. हे दान हस्तेपरहस्ते घेण्याचा प्रयत्न केल्यास तो विष्ठेतील कृमी होईल. मंगल महाश्री. शुभं भवतु.

शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वरदेव याचा हा शेवटचा लेख. उत्तर शिलाहारांच्या आधीच्या सर्व लेखांमध्ये गणपतींची स्तुती दिसून येत नाही. परंतु केशीदेव (दुसरा) याचा चौधरपाडा शिलालेख आणि सोमेश्वरदेवाच्या चांजे लेखात अशा दोन लेखातच गणपतीचे नमन केले आहे. लेखात उल्लेखलेली श्रीस्थानक, उरण, चांडिजे ही ठिकाणे म्हणजे आताचे ठाणे, उरण आणि चांजे होय. लेखातील कोंथळेस्थान म्हणजे नक्की कोणती जागा हे सांगता येत नाही. डॉ. सांकलिया आणि डॉ. उपाध्याय यांच्या मते कोंथळेस्थान म्हणजे उरण जवळील कलधोंड.

संदर्भ

  • Corpus Inscriptionum Indicarum, Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स