मंचर येथील यादवकालीन बारव

मानवी आयुष्यात पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. पाणी ही मानवाची नैसर्गिक गरज आहे. जगभरातल्या अनेक संस्कृतींचा उगम नदीकाठी झाला आहे. उदकदान हे सगळ्यात मोठे पुण्य असल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची कुंड, तलाव, विहिरी आणि बारव बघायला मिळतात. मानवी वसाहतीसाठी कुंड आणि बारव यांच्या निर्मितीत राजा, महारथी, महाभोज, श्रेष्ठी, शेतकरी, व्यापारी इ. अनेकांनी योगदान दिले आहे. महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या काही बारव ह्या मंदिरांसाठी बांधलेल्या असून काही बारव मानवी वसाहतीसाठी बांधलेल्या आहेत. मंचर येथे मंदिरासाठी बांधलेली एक आणि मानवी वापरासाठी बांधलेल्या दोन अशा एकूण तीन बारव बघायला मिळतात.

बदामी चालुक्य राजा विनयादित्य याच्या इ. स. २९ एप्रिल ६९० (शक ६१२) ताम्रपटात ‘मचोह’ गावाची नोंद आहे. या ताम्रपटाचे वाचन करणाऱ्या माधो सरुप वत्स यांच्या मते मचोह म्हणजे मंचर असे असावे. माधो सरुप वत्स यांचे मत मान्य केल्यास मंचरचा हा सगळ्यात जुना लिखित उल्लेख आहे.

पुणे-नाशिक आणि पुणे-भीमाशंकर या दोन मुख्य महामार्गावर असलेले आठवडी बाजाराचे ठिकाण म्हणजे मंचर. गॅझेटीअर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडन्सीनुसार गावाभोवती वेस होती आणि सन १८६८-६९ पर्यंत होळकर घराण्याच्या अखत्यारीत होते. नंतर या गावावर ब्रिटीशांचा अंमल सुरु झाला.

मंचर गावाच्या पश्चिमेस आणि मंचर-भीमाशंकर रस्त्यावर खरडी नाल्याजवळ चौरसाकार बारव आहे. या बारवची नोंद गॅझेटीअर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये (खंड १८, भाग ३ पुणे, पान क्र २७२) केलेली आहे. या माहितीनुसार मंचर येथे हेमाडपंथी बारव आहे आणि तेथील कोनाड्यात असलेला देवनागरी शिलालेख झिजलेला असल्यामुळे वाचता येत नाही. परंतु प्रत्यक्ष भेटीत हा शिलालेख स्पष्ट आणि वाचनीय असल्याचे दिसून येते.

मंचर बारव लांबीरुंदीला अंदाजे २४ मीटर असून साधारणपणे १० मीटर खोल आहे. बारवेची बांधणी एकात एक कमी होत जाणाऱ्या तीन टप्प्यात करण्यात आलेली आहे. बारवेला असलेल्या संरक्षक भिंतींची उंची अंदाजे २.५ मीटर असून भिंतींच्या पूर्व व दक्षिण दिशेला प्रवेश आहेत. संरक्षक भिंतींच्या पश्चिम भिंतीमध्ये असलेल्या देवकोष्ठामध्ये २५ ओळींचा संस्कृत भाषा व देवनागरी लिपीतील यादवकालीन शिलालेख आहे.

पूर्व प्रवेशातून किंवा दक्षिण प्रवेशातून १० पायऱ्या खालती उतरल्यावर बारवेचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यावर संरक्षक भिंतीला चारही बाजूस बसण्यासाठी ओट्याची सोय केलेली आहे. पहिल्या टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी चारही बाजूला पंधरा पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांवर मधूनमधून पुढे आलेले दगड आहेत. संरक्षणाच्या दृष्टीकोनातून ही सोय केलेली आहे हे दिसून येते. तिसरा टप्पा बारवेमधील पाणी कमी झाल्यानंतर बघता येतो.

शिलालेखात श्रीलादिदेव याने मणिचर म्हणजे आजचे मंचर येथे लोकवापरासाठी बारव बांधली असे नमूद असून त्याचबरोबर पूर्वज कडि्डत्तु (वडिल), देवेंद्र (आजोबा), कूर्म (पणजोबा) आणि नंदी (खापरपणजोबा) यांचा उल्लेख केला आहे. लेखात श्रीलादिदेव याच्या वडलांचा उल्लेख पट्टेलवर्य कडि्डत्तु असा केलेला आहे. पट्टेलवर्य म्हणजे गावातील नेता.

पश्चिम भिंतीतील देवकोष्ठामध्ये असलेला शिलालेख ७५ सेमी x ९० सेमी आकाराचा आहे. लेखाच्या सुरुवातीला चंद्र व सूर्य कोरलेले आहेत. चंद्र व सूर्य यांचा अर्थ आचंद्रसूर्य म्हणजे जोपर्यंत आकाशात चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत.

‘आर्किओलॉजी ऑफ डेक्कन’ या प्रबंधात डॉ. ए. व्ही. नाईक यांनी या शिलालेखाची वाचनाशिवाय नोंद केलेली आहे. २००२ साली डेक्कन कॉलेज, पुणे येथे कार्यरत असलेल्या श्री गिरीश मांडके यांनी या लेखाचे पहिल्यांदा वाचन करून चांदवड येथील इतिहास परिषदेत शोधनिबंध सादर केला. श्री मांडके यांच्या मते, “प्राचीन व मध्ययुगीन काळात जुन्नर व पैठण या महत्त्वाच्या व्यापारी शहरांना जोडणाऱ्या मार्गावर मंचर हे गाव वसलेले असल्यामुळे अनेक व्यापारी आपल्या मालाची ने-आण करीत असत. तेव्हा या मार्गावरून व्यापारी मालाची वाहतूक करणाऱ्या लोकांसाठी ही बारव (तलाव) बांधलेली असावी.”  

वाचन

दायक : सुकृतस्यास्येष्टा – ळ – प्रभागिने
लब्धं यदुपदेश स्वेष्टापूर्त्त (सुकृत्फलं) |
||श्री गणेशाय नम:| नैमि (स्वभुज) दोईण्डकृतकोदण्डख
ण्डनं वैदेही हृदयानंदचंदन रघुनंदनं |१| अमरगिरिमही
ध्राद्दक्षिणं वीक्षणीयं मणिचरमिती संज्ञा यस्य (तत्त्वार्थ)
सारं | नगर मतुलवीरै (श्वारू) कैलासकल्पं पुरमथनमनो
तज्ञंद्व निर्मिमे विश्वकर्मा |२| तत्राभवत्प (ज्ज) नुषां कुलाम्ये प
… नंदरिति प्रसिद्ध: | अलं चकार स्वकुलं गुणौधै:
क्त पितु:द्ध कुलं रत्नाकरैरिवेंदु: |३| कूर्माभिधस्तत्तनुजो म्हनून गु(णाकार)
… सेवकाभूत | पुरा (ग्नपं) कच्छपमीशमीक्ष यो भूमिभारं सुमुषो ब
क्तभार |४| द्व तदंगजो देवगणै: प्रदत्त देवेंद्रसंज्ञा वसुधानिवास: | अभीष्ठत
(का) मदुघोधि कामयंतस्य देवेंद्र श्वापरोभूत् |५| कुलक्रमायातगु
(णै) रनून: पट्टैलवर्यस्तु कडित्तुनामा | तत्सूनुरासीद्रुरत्नरा शिराहा
… करीव काम: |६| अभूदभूमि: प्रतिपक्षपक्षैर्गुणानुरागेण परा
क्रमेण – तदंगज: सद्रुणसम्प्रदाय: श्रीलादिदेवष्कुलकीर्त्तिधुर्य: |७|
धर्मार्थ मार्ग्गे क्षणशील चारस्वरूप सम्पज्जित चारूमार: | कृतस्वल
(क्ष्या) त्सदसद्विचार: स्वकंधरे सद्रुणकीर्तिहार: |८| मही तमीशानगणं क
दाचिन्मोदाय… निशि सुप्तमीक्ष्य | त्वसंगतिं संततीमीक्षमाणा स्थास्ये |
त्र योषिद्वपुषेत्युवाच |९| इति प्रबुध्दस्तु निशावसाने स्वप्नानुभूतं मुहुरू
(त्स्म) रन्स: | ग्रामान्तिकासन्नम कालमेव संदृष्टवान्मीनमिवान्यदम्भ: ||१०|| तद्वा
सरं कर्त्तुमशेष दोष शोषाय तोषाय च सज्जनानां शंभोष्कपर्दप्रतिमानक्तरू
पी चद्वकार वापी निहततृतापी |११| स्वस्तिश्री रसवैरिलोचनमहीतुल्ये
… मासि (बुधौ) तिथ विषु मिते पक्षे तु शुक्ले ध्रुवे | योगे भेसु
दिने (यु) ग्लाख्य लग्ने कृत: प्रारंभ: सुकृतोत्तमस्य विदु
… वेन वै ||१२|| शिवमस्तु जगत:

भाषांतर

ज्याच्या उपदेशावरून हे इष्टपूर्तरूपी पुण्यकर्माचे फळ मिळाले, त्याला या पुण्यकर्माच्या फळातील वाटा मिळो. श्रीगणेशाला वंदन असो. ज्याने स्वत:च्या बलदंड अशा बाहुदंडाने शिवधनुष्याचे खंडन केले त्या सीतेच्या मनास चंदनाप्रमाणे आनंद देणाऱ्या रघुनंदनाला मी नमस्कार करतो ||१|| अमरगिरी नामक पर्वताच्या दक्षिणेस प्रेक्षणीय असे स्वत:चे नाम सार्थ असलेले मणिचर नावाचे बलाढ्य वीरांनी युक्त असे, इंद्रदेवालासुद्धा सुंदर वाटावे असे, सुंदर कैलासासमान नगर विश्वकर्मा याने निर्माण केले||२|| तेथे ज्याप्रमाणे चंद्रमा रत्नकिरणांनी अओल्या पित्याच्या कुळास म्हणजे समुद्रास शोभा आणतो, त्याप्रमाणे… नंदी नावाच्या आपल्या गुणांनी निम्न अशा स्ववंशाला अलंकारभूत झालेल्या अशा व्यक्तीने जन्म घेतला, अनेक गुणांची खाण असलेला कूर्म नावाचा मुलगा होऊन गेला ||३||पृथ्वीपती परमेश्वराने कूर्मावतारात पृथ्वीचे रक्षण केलेले पाहून त्याने प्रसन्न वदनाने भूमीचा भार वाहिला ||४|| त्याला देवगणांनी देवेंद्र असे नाव दिल्यामुळे तो देवेंद्र नावाने प्रसिद्ध झाला. कामधेनूपेक्षा देखील अधिक योग्य अशा दानामुळे तो जणू काही प्रती देवराज इंद्रच झाला ||५|| त्याचा मुलगा गुणरत्नांच्या राशींनी युक्त असून कुलक्रमाने आलेल्या गुणांमध्ये कमी नव्हता. तो पट्टेलवर्य असून त्याला कडि्डत्तु असे नाव होते||६||त्याचा मुलगा श्रीलादिदेव हा कुलकीर्ति वाढवणारा असा होऊन गेला. तो परंपरागत सद्गुणांनी युक्त असून त्याच्या गुणानुरागामुळे आणि पराक्रमामुळे त्याच्या भूमीवर प्रतिपक्षी म्हणजे वैरी पाय ठेवू शकले नाहीत||७|| तो धर्म आणि अर्थ या दोन्ही मार्गांमध्ये विचारवंत असून सुंदर मदनाला देखील त्याने स्वरूप संपत्तीने जिंकलेले होते. उद्दिष्टांबद्दल तो विवेकपूर्ण विचार करीत असे. त्याने सद्गुणांमध्ये गुंफलेला कीर्तिरूपी हार खांद्यावर धारण केला ||८|| कदाचित एकदा तो रात्री सुखनिद्रा घेत असताना दैवीगुणांनी युक्त असलेल्या त्याला पाहून मही म्हणजे पृथ्वी म्हणाली की सतत तुझ्या संगतीची अपेक्षा करून मी स्त्रीरूपाने येथे राहीन||९|| रात्र संपल्यावर जागा होऊन स्वप्नात अनुभवलेली गोष्ट हळूहळू स्मरण करताना त्याला असे आढळून आले की दुष्काळ (उन्हाळा) असून देखील गावाच्या जवळच एके ठिकाणी जणू दुसरा मासाच आहे असे स्वच्छ (किंवा चकाकणारे) पाणी वाहते आहे ||१०|| त्यानंतर त्याने त्या दिवशीच सर्व दोषांचा नाश व्हावा आणि सज्जनांना आनंद मिळावा अशी शंभू (महादेवा)च्या कवडीप्रमाणे दिसणारी आणि तिन्ही लोकांचा नाश करणारी वापी (विहीर) खोदण्यास सुरुवात केली ||११|| स्वस्ति श्री (मंगलकारक) अशा बाराशे सहासष्ट (यावर्षी) … या महिन्यात शुद्ध पक्षातील पंचमी या तिथीस …. या योगावर मिथुन (?) लग्नावर या उत्तम व पुण्य अशा कार्याला प्रारंभ झाला.

मंचर शिलालेख राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नसला तरी सामजिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. या लेखात श्रीलादिदेव याने मणिचर म्हणजे आजचे मंचर येथे लोकवापरासाठी बारव बांधली असे नमूद केले आहे. त्याचबरोबर श्रीलादिदेव याचे पूर्वज कडि्डत्तु (वडिल), देवेंद्र (आजोबा), कूर्म (पणजोबा) आणि नंदी (खापरपणजोबा) यांचा लेखात उल्लेख केला आहे. वरील लेखात श्रीलादिदेव याच्या वडलांचा उल्लेख पट्टेलवर्य कडि्डत्तु असा केलेला आहे. पट्टेलवर्य म्हणजे गावातील नेता. सध्या आपण ज्याला पाटील म्हणतो त्याला या लेखात पट्टेलवर्य असे संबोधले आहे.

मणिचर अर्थात मंचर गावाचे फार सुंदर वर्णन लेखात केले आहे. अमरगिरी पर्वताच्या दक्षिणेस विश्वकर्माने कैलासासारखे, इंद्रदेवालासुद्धा सुंदर वाटावे आणि जेथे बलाढ्य वीर राहतात असे प्रेक्षणीय मणिचर नगर निर्माण केले.

शिलालेखांचा अभ्यास करताना कालगणनेला फार महत्त्व असते. बऱ्याच वेळेला शिलालेखात शक अंकांमध्ये नमूद केलेला असतो. पण काही वेळेला शिलालेखात शक अंकात न देता शब्दमूल्यात देण्यात येतो. अंकमूल्यांसाठी काही ठराविक शब्दमूल्य तयार झालेली आहेत. उदा. ० = आकाश, पूर्ण, १ = पृथ्वी, रूप, चंद्र, दोन = नयन, कर, ३ = अग्नी, द्वंद इ. प्रस्तुत शिलालेखाच्या २२व्या ओळीत “रसवैरिलोचनमहीतुल्ये” असा उल्लेख आला आहे. यातील महि, लोचन, वैर आणि रस हे शब्दमूल्य आहेत. या शब्दमूल्यांवरून महि किंवा पृथ्वी = १, लोचन किंवा डोळे = २, वैर = ६ आणि रस = ६ म्हणजे १२६६ हा शक मिळतो. महाराष्ट्रात मंचर शिलालेखाशिवाय अर्नाळा किल्ल्यावरील शिलालेख आणि रायगडावर असलेल्या जगदीश्वर मंदिराच्या शिलालेखात अंकाऐवजी शब्दमूल्य वापरून शकाची नोंद केलेली आहे. मंचर, अर्नाळा आणि रायगड येथील शिलालेखातील शब्दमूल्यनिर्देशक उजवीकडून डावीकडे वाचावे लागतात.

मंचर शिलालेख शके १२६६ (सन १३४४) शुद्ध पंचमी तिथीला बारवनिमिर्ती पूर्ण झाली म्हणून कोरलेला आहे. लेखात संवत्सराचा उल्लेख नसला तरी शके १२६६ मध्ये तारणनाम संवत्सर होते. लेखात महिन्याचा उल्लेख नष्ट झाला असावा किंवा कोरलेला नाही. यादव राजघराण्यातील  रामदेवराय याचा जावई हरपालदेव याच्या काळात ही बारव बांधली गेली आहे.

बारवेच्या पहिल्या टप्प्यावर पूर्व भिंतीत ईशान्य बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग ठेवला आहे. हा मार्ग जेथे बाहेर निघतो गोमुख बांधलेले आहे. गोमुखातून बाहेर पडणारे पाणी त्याच्या खाली असलेल्या दगडी कुंडात जमा होते.

बारव परिसरात नंतरच्या काळात बांधलेली अजून एक बारव आहे. या बारवेच्या तीन दिशांना पाणी काढण्यासाठी मोटांची रचना केलेली आहे.

तपनेश्वर मंदिर

मंचर बारवपासून हाकेच्या अंतरावर तपनेश्वर मंदिर आहे. बाहेरून हे मंदिर जरी आधुनिक वाटत असले तरी मंदिराच्या द्वारशाखेवरून मूळ मंदिराचे बांधकाम १३व्या-१४व्या शतकात झाले असावे असा अंदाज आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे. सभामंडपात गणपती आणि नागांचे शिल्प आहे. मंदिरातील नंदी पण त्याच्या प्राचीनतेची साक्ष देतो. तपनेश्वर मंदिराच्या समोर बांधीव दगडी बारव आहे. मंदिर परिसरात असलेली बारव अंदाजे ६००-७०० वर्ष जुनी असावी. या बारव परिसरात स्मृतिशिळा, गणपती व शंकर यांची प्राचीन शिल्प (पण आता रंगवलेली) आणि इतर कोरीव दगड पसरले आहेत.

संदर्भ

  • एपिग्रफिया इंडिका, खंड २५, १९३९-४०, पृष्ठ २८९-२९२
  • गॅझेटीअर ऑफ दि बॉम्बे प्रेसिडन्सीमध्ये (खंड १८, भाग ३ – पुणे)
  • महाराष्ट्रातील बारव स्थापत्य आणि पारंपारिक जलव्यवस्थापन, ले. अरुणचंद्र शं. पाठक, अपरांत, पुणे, २०१७
  • मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात, ले. महेश तेंडूलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१५
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स