रतनसी मुलजी कारंजे

मिंट रोड, पी. डीमेलो रोड आणि शहीद भगतसिंग रोड हे तीन रस्ते एकमेकांना जेथे एकमेकांना छेदतात, त्याठिकाणी रतनसी मुलजी जेठा कारंजे आहे. मुंबई जनरल पोस्ट ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट परीसरापासून हे कारंजे जवळ आहे.

१८९४ साली मुंबईतील व्यापारी रतनसी मुलजी जेठा यांनी आपला एकुलता एक मुलगा धरमसी याच्या स्मरणार्थ हे फाउंटन बांधले आहे. धरमसी याला पुस्तकवाचनाची आवड होती आणि म्हणून फाउंटनवर त्याची पुस्तकवाचन करणारी मूर्ती बसवली आहे. धरमसी याचे अल्पवयात निधन झाले. ह्याचा आराखडा १९व्या शतकातील नामांकित आर्किटेक्ट फ्रेडरिक विलिअम स्टीवन्स आणि शिल्पकार होते सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख (तेव्हाचे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट) जॉन ग्रिफिट्स. इंडो-सार्सेनिक शैलीमध्ये बांधलेल्या ह्या फाउंटनवर घुमट, छत्री, छज्जे, जाळ्या, स्थानिक फुले व प्राणी बघायला मिळतात. ८ जानेवारी १८९४ रोजी एच. एम. बर्डवूड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

धरमसी याला पुस्तकवाचनाची आवड असल्यामुळे मूर्तीचे तोंड एशियाटीक सोसायटीच्या दिशेला आहे

फाउंटनच्या सर्वात खालती वर्तुळाकार पाण्याचा हौद आहे. ह्या हौदाच्या चार दिशांना चार घुमट असलेले छोटे मिनार आहेत. पूर्व व पश्चिमेच्या मिनाराला असण्याऱ्या गोमुखातून बाहेर पडणारे लोकांना पाणी पिता येत असे, तर उत्तर व दक्षिण दिशेच्या मिनारांच्या खाली प्राण्यांना पाणी पिता यावे ह्याच्यासाठी हौद बांधले आहेत. मुख्य हौदाच्या मध्यभागी अष्टकोनी आकारात आठ खांबांची रचना केलेली आहे. ह्या खांबांच्यावर खोलगट असलेले छत आहे. खोलगट भागाच्या मध्यभागी आठ खांबांनी तोलून धरलेला घुमट आहे. घुमटाच्या वरती पुस्तकवाचन करणाऱ्या धरमसी याची मुर्ती आहे. ही मूर्ती जॉन ग्रिफिट्स यांनी तयार केली आहे. मूर्तीचे तोंड एशियाटीक सोसायटीच्या दिशेला आहे. फाउंटनमध्ये गाय, सिंह, हत्ती, बोकड, मगर आणि सरडा इ. प्राण्यांच्या ४२ शिल्पांचा वापर करण्यात आला आहे.

फाउंटनच्या बांधकामासाठी बसॉल्ट, संगमरवर, ग्रॅनाईट इ. वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचा वापर केला आहे. तसेच फाउंटनवर असलेल्या नक्षीकामासाठी आणि धरमसी याच्या पुतळ्यासाठी चुनखडी दगडाचा वापर केला आहे. फाउंटनच्या बांधकामासाठी रु २३,००० खर्च आला. या फाउंटनमुळे फोर्ट बाजारात कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या आणि प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली.

बरीच वर्ष दुर्लक्षित राहिल्यामुळे मोडकळीस आलेल्या या कारंज्याचे मुंबई महानगरपालिका, खाजगी संस्था आणि खाजगी कंपन्यांनी पुढाकार घेऊन नूतनीकरण केले आणि त्यांला पुन्हा जुने रूप दिले आहे. आता आपली जबाबदारी आहे त्यांचे संरक्षण करण्याची आणि येणाऱ्या पिढीला त्याचे महत्त्व सांगण्याची.

संदर्भ

  • Shirgaonkar, Varsha S. 2011 Exploring the Water heritage of Mumbai, Aryan Books International
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.