समर्थांचा सज्जनगड

संपूर्ण महाराष्ट्राला बलोपासनेची समर्थ रामदासस्वामी यांनी ओळख करून दिली. शक्तीची देवता हनुमान वेशीचा रक्षक म्हणून वेशीच्या बाहेर पुजला जात होता. परंतु समर्थांनी त्याला वेशीच्या आत आणून त्याची पूजा मोठ्या प्रमाणात सुरु केली. शिवाजी महाराज मावळ्यांनी सहाय्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांनी समर्थांना सोयीस्कर किल्ल्यावर राहण्याची विनंती केली. त्याप्रमाणे समर्थांनी महिपतगड आणि नंतर परळीचा किल्ला न्याहाळला. शेवटी समर्थांनी आटोपशीर परळीचा किल्ला निवडला. याच सुमारास परळीच्या किल्ल्याचे सज्जनगड असे नामकरण झाले. संतसज्जनांचे वास्तव्य म्हणून सज्जनगड हे नाव रूढ झालेले असले तरी श्री रामदासी संशोधन – पांधरी व चाफळ खोरे यातील ३२९ व्या बाडात समर्थांची १४ नावे दिली आहेत. त्या चौदा नावांपैकी एक नाव सज्जन. त्यामुळेच सज्जन म्हणजे रामदासस्वामी राहतात तो सज्जनगड अशी पण एक शक्यता सज्जनगड नावामागे असावी.

परळी हे पायथ्याचे गाव असल्यामुळे हा किल्ला परळीचा किल्ला किंवा परळीगड म्हणून सुध्दा ओळखला जातो. किल्ल्याला आश्वलायनगड हे पण नाव आहे. आश्वलायनगड हे नाव त्या भागात आढळणाऱ्या अस्वलांमुळे की आश्वलायन ऋषींनी ह्या डोंगरावर वास्तव केले म्हणून रूढ झाले हे नक्की सांगता येत नाही. साधारणपणे १०-११ व्या शतकात शिलाहारांनी सातारा किल्ल्याबरोबर ह्या परळीच्या किल्ल्याची बांधणी केले असे मानले जाते. चवथा बहमनी राजा महमद शहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत परळीच्या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. बहमनी राजांकडून हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. त्यांनी किल्ल्याला नवरसतारा हे नवीन नाव दिले. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये सातारच्या किल्ल्याबरोबर परळीचा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. नंतर महाराजांनी समर्थांना एखाद्या किल्ल्यावर राहण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे समर्थांनी परळीच्या किल्ल्याची निवड केली. महाराजांनी २,००० होन खर्च करून समर्थांसाठी मठ बांधून घेतला. तोपर्यंत समर्थांबरोबर आलेले संतसज्जन आणि शिष्यपरिवार यांचे वास्तव किल्ल्यांवरील ओवऱ्यातच होते. शके १५७५ (सन १६७३) ते शके १६०३ (सन १६८१) पर्यंत म्हणजे समर्थ समाधी घेईपर्यंत ह्या किल्ल्यावर वास्तव करून होते. समर्थांच्या एवढ्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे हा किल्ला रामदासी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र बनला. समर्थांच्या वास्तव्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास समर्थ रामदास आणि रामदास संप्रदाय यांच्याशीच निगडीत राहिला.

परळीचा किल्ला / परळीगड, आश्वलायनगड, नवरसतारा ही या किल्ल्याची इतर नावं

२१ एप्रिल १७०० रोजी साताऱ्याचा किल्ला प्रयागजी प्रभू यांच्याकडून जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाची नजर सज्जनगडाकडे वळली. साताऱ्याचा किल्ल्यावरील प्रयागजी प्रभू यांना सज्जनगडावरील परशुराम त्रिंबक प्रतिनिधींचे सहाय्य होत होते. औरंगजेब ३० एप्रिल १७०० रोजी सज्जनगडाच्या वेढ्यात सामील झाला. किल्ल्यावर होणाऱ्या  हल्ल्यांचे गांभीर्य ओळखून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व उध्दवस्वामी यांनी गडावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू घेऊन गड सोडला आणि कोयनेच्या खोऱ्यातील दुर्गम वासोटा (व्याघ्रदुर्ग) किल्ला गाठला. ९ जून १७०० रोजी औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आला. किल्ल्याचे सज्जनगड हे नाव बदलून नवरसतारा असे करण्यात आले. औरंगजेब या भागातून निघून गेला आहे ह्या संधीचा फायदा घेऊन परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी किल्ला पुन्हा जिंकून घेतला. किल्ला ताब्यात आल्यानंतर वासोटा किल्ल्यावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू पुन्हा सज्जनगडावर आणून त्यांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

सज्जनगड किल्ल्याचे पायथ्याचे गांव परळी साधारणपणे १० किमी वर आणि इथपर्यंत येण्यासाठी चांगला डांबरी रस्ता आहे. परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे ७५० पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या वाटेने एका तासात आपण किल्ल्यावर जातो. त्याचबरोबर सातारा-परळी रस्त्यावर गजवडी गावातून किल्ल्यावर जाणारा डांबरी रस्ता आहे. ह्या मार्गाने गेल्यास जास्तीतजास्त ५० पायऱ्या चढाव्या लागतात. या मार्गावर सातारा-सज्जनगड एसटी सेवा पण उपलब्ध आहे. स्वतःचे वाहन असलेल्यांनी आणि ज्यांना ७५० पायऱ्या चढायच्या नसतील त्यांनी ह्या मार्गाचा वापर करायला हरकत नाही. ज्यांना किल्ला मुख्य वाटेने चढायचे आहे त्यांनी परळीच्या वाटेने चढाई करावी.

किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यापर्यंत स्वतःच्या गाडीने किंवा एसटीने जाता येते. या टप्प्यावरून आपल्याला समोरच किल्ला आणि किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट नजरेस पडते. ह्या वाटेवर  समर्थ रामदासस्थापित मारुतींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे.

साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे मंदिर आहे. ह्या मंदिराजवळच परळी गावातून येणारी वाट आपल्या वाटेला येऊन मिळते. कड्यावरून पडलेल्या गायीच्या स्मरणार्थ १९२२ साली ह्या मंदिराची उभारणी झालेली आहे.  मंदिरात सवत्सधेनूची मूर्ती आहे. ह्या मंदिरासमोरच मारुतीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर मुख्यवाटेपासून उजवीकडे जाणारी छोटी पायवाट. ही पायवाट आपल्याला रामघळीकडे घेऊन जाते. ही समर्थांच्या साधनेची जागा आहे.

रामघळ बघून पुन्हा पायऱ्यांच्या मुख्य वाटेला आल्यानंतर गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारासमोर येतो. या प्रवेशद्वाराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे नामकरण करण्यात आलेले आहे. महाद्वाराच्या डावीकडे कातळ आणि उजवीकडे बुरूज आहे. महाद्वारानंतर असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. या दरवाज्याला श्री समर्थ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. हा दरवाजा पहिल्या दरवाज्यापेक्षा प्रशस्त आहे. प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात असलेल्या तीन कमानी आणि कमानींच्या वर असलेल्या फार्सी भाषेतील शिलालेख यांच्यावरून या दरवाज्याची बांधणी शिवपूर्वकाळात झाली असावी असे वाटते. या दरवाज्यात असलेल्या देवड्यांचे (पहारेकरांच्या  खोल्या) छत घुमटाकार आहे. घुमटाकार छत हे मुस्लीम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे. या प्रवेशद्वारातून  आत आल्यावर दोन देवड्या आहेत. त्यापैकी एका देवडीत श्रीधरस्वामींनी हनुमानाची स्थापना केली आहे.

किल्ल्याच्या दोन्ही दरवाज्यांच्या बाहेर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. तसेच किल्ल्याचा पहिला दरवाजा दुसऱ्या दरवाज्यातून माऱ्याच्या टप्प्यात आहे. किल्ल्याच्या इतर भागात तुटलेले कडे असल्यामुळे फक्त ह्याच भागातून शत्रू शिड्या किंवा माळांच्या सहाय्याने किल्ल्यात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे किल्ल्याच्या याच भागात तटबंदी जास्त मजबूत आहे.

समर्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरील पर्शियन शिलालेख आपले लक्ष वेधून घेतो. शिलालेख ५६ सेंमी x ४१ सेंमी आकाराचा असून उठावाच्या पद्धतीने कोरलेला आहे. हा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे:

फार्सी वाचन

दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद
हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद
तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती
हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद
बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख ३
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही

मराठी अर्थ

ऐश्वर्य तुझ्या दारातून सर्वांना तोंड दाखवत आहे
हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे
तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचनामुक्त आहेस
तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात
परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जमादिलाखर या तारखेस तयार झाला.
आदिलशाही रेहान याने काम केले.

बांधकाम करणारा आदिलशाही रेहान कोण हे कळून येत नाही. कारण इतिहासात दुसऱ्या इब्राहीम आदिलशहापर्यंत कोणत्याही रेहानचा संदर्भ मिळत नाही.

शिलालेखाच्या जवळच पण तटाच्या वरील बाजूस सिंह हत्तीवर मागील बाजूने हल्ला करीत आहे असे शिल्प आहे. हे शिल्प किल्ल्यावरील एखाद्या मंदिराचे असावे. शिल्प पाहून पुढे गेल्यानंतर लोकमान्य टिळकांची स्मृती जतन व्हावी म्हणून बांधलेली लोकमान्य स्मृती कमान दृष्टीस पडते. कमानीच्या थोडे अलीकडे डाव्या बाजूला घोडाळे तळे आहे. या तळ्यातील पाण्याचा वापर जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असे. तळ्याच्या काठावर वीराचे स्थान आहे. तळ्याच्या काठावर चुना मळण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा आहे. तळ्यावरून पुढे घेल्यानंतर भग्नावस्थेत असलेली मशीद आपल्याला दिसते. मशिदीच्या स्थापत्यकलेवरून ही मशीद बहामनी काळात बांधली असावे वाटते. भिंतीच्या बांधकामासाठी दगडी चिऱ्यांचा, तर छताच्या बांधकामासाठी विटांचा वापर करण्यात आलेला आहे.

मशीदीच्या पूर्वेला आंग्लाईदेवीचे मंदिर आहे. आंग्लाईदेवीची मूर्ती समर्थांना अंगापूर गावातील डोहात सापडली. आंग्लाईदेवीच्या मूर्तीबरोबरच सापडलेल्या रामाच्या (मूर्तिशास्त्रानुसार सूर्य) मूर्तीची स्थापना चाफळ येथे करण्यात आली. देवीची मूर्ती चतुर्भुजा असून महिषासुरमर्दिनीरुपात आहे. मूर्तीच्या मागे पितळी महिरप असून कीर्तिमुख कोरलेले आहे. या मंदिराबाबत एक गोष्ट सांगितली जाते. समर्थांना आपल्या आईचा अंतकाळ जवळ आल्याचे त्यांच्या अंतर्ज्ञानाने कळल्यानंतर त्यांनी स्वतःला या मंदिरात कोंडून घेतले. तसेच विशिष्ट दिवशाच्या आधी हे मंदिर उघडू नये अशी सक्त ताकीद समर्थांनी शिष्यांना दिली. समर्थांच्या आज्ञेनुसार शिष्यांनी विशिष्ट दिवशी मंदिराचे दार उघडल्यानंतर समर्थ बाहेर आले, तेव्हा शिष्यांना समर्थांनी क्षौर केलेले दिसून आले. क्षौराचे स्पष्टीकरण देताना त्यांनी आईचा जांब येथे देहांत झाला व अंत्यविधी आटोपून येत असल्याचे सांगितले.

मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते. मंदिर परिसरातच तटबंदीचे अवशेष दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. मंदिराजवळ असलेल्या तटबंदीत एक बंदिस्त गुहा आहे. ह्या गुहेत मारुतीची मूर्ती आहे.

आंग्लाईदेवीचे दर्शन घेऊन पुन्हा घोडाळे तळ्याजवळ असलेली फरसबंदी वाट ओलांडल्यानंतर समोरच उजव्या हातास चिरेबंदीने बांधलेले मुक्काम तळे दृष्टीक्षेपात पडते. या तळ्याच्याजवळ समर्थांच्या दोन मुसलमान शिष्यांच्या कबरी आहेत. कबरीच्या जवळून जाणारी वाट कल्याण स्वामींनी छाटीसाठी उडी मारली त्या ठिकाणी घेऊन जाते. ह्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. ह्या ठिकाणाबद्दल अशी कथी सांगितली जाते की एकदा रामदासस्वामी व कल्याण स्वामी फिरावयास गेलेले असताना समर्थांची छाटी वाऱ्याने उडून कड्याखाली गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, “कल्याणा छाटी उडाली बघ.” समर्थांचे बोल ऐकताच कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी मारली आणि ती छाटी जमिनीवर पडण्यापूर्वीच हातात धरली. तसेच जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली तेथे कल्याणस्वामी मंदिर आहे.

कल्याणस्वामींच्या उडी मारलेल्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर मुख्य वाटेने श्रीराम मंदिराकडे जाताना पेठेतील मारुती मंदिर आहे. हे मंदिर समर्थांच्या आधीपासून होते. या मारुती मंदिराच्या मागील बाजूस आहे सोनाळे तळे. या तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. तळ्यात सातीआसरा ठिकाण आहे. या तळ्याच्या एका कोपऱ्यात प्राचीन लेणी आहेत. या लेणी तळ्याची साफसफाई करताना सन १९५२ मध्ये आढळल्या. तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या लेणी नजरेस पडतात. शेंदूर लावलेला वीरगळ तळ्याच्या काठावर उभा करून ठेवलेला आहे. वीरगळावर पायदळ व घोडदळ यांच्यातील युध्दप्रसंग कोरून ठेवला आहे. पेठेतील  मारुती मंदिरासमोर श्रीधरकुटी आहे. सन १९१५ मध्ये श्रीधर स्वामींच्या शिष्यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. या वास्तूत श्रीधर स्वामींनी अनेकदा वास्तव केलेले होते.

श्रीधरकुटी बघून मुख्य फरसबंदीवाटेने पुढे गेल्यानंतर उंच जोत्यावर बांधलेला समर्थांचा मठ नजरेस पडतो. मठासमोरील फरसबंदीच्या कामासाठी श्री शंकर कृष्ण देव यांनी आर्थिक सहाय्य केले. समर्थांचा मुक्काम शिवकाळात याच मठात होता. हा मठ छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधला असून बांधकामासाठी २००० होन खर्च आला असे सांगितले जाते. या मठात असलेल्या शेजघराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले हस्तरेखांकित चित्र ठेवलेले आहे. पलंगाशेजारी असलेल्या स्टॅंडमध्ये एक कुबडी, गुप्ती, वेताची काठी व सोटा ठेवलेला आहे. कुबडी श्रीदत्तात्रयांनी दिलेली समर्थांना दिली आणि गुप्तीत फिरंगी तलवार असून ही तलवार छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३६० होनांना विकत घेतलेली आहे असे सांगितले जाते. लाकडी सोटा हिमालय परिभ्रमणाच्या वेळी एका सिद्धी पुरुषाने (बहुधा मच्छिंद्रनाथ) समर्थांना दिला अशी आख्यायिका आहे. स्टॅंडच्या शेजारी दोन मोठे तांब्याचे हंडे आहेत. या हंड्यांच्या कावडीतून कल्याणस्वामी उरमोडी नदीचे पाणी समर्थांना आणून देत असत असे सांगितले जाते. येथेच समर्थांच्या नित्य वापरातील पाणी पिण्याचा लोटा, पीकदानी आणि विड्याच्या पानांचा डबा ठेवलेला आहे. मारुतीने समर्थांना प्रसाद म्हणून दिलेला हुर्मुजी रंगाचा फेटा व हिमालयातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने दिलेली वल्कलेही येथे ठेवलेली आहेत. शेजघरात अग्निकुंड व प्रतापमारुतीची पितळी मूर्तीसुध्दा आहे. येथे असलेल्या मातीच्या सिंहासनावर मुख्य मंदिरातील श्रीराम मूर्ती सुरुवातीला त्यावर ठेवल्या होत्या. समर्थांचे देहावसनही याच मठात झाले.

समर्थ मठाच्या उत्तरेला श्रीराम मंदिर आहे. ज्या खड्ड्यात समर्थांवर अग्निसंस्कार झाले त्यावरच हे मंदिर उभारले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात वर्णन केल्याप्रमाणे आहे. गणपतीच्या मागे श्रीरामाकडे तोंड असणारी पश्चिमाभिमुखी दासमारुतीची मूर्ती आहे. सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती डोळ्याचे पारणे फेडतात. व्यंकोजीराजे यांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदास तंजावरला गेलेले असताना तेथे अरणीकर आडनावाच्या अंध कारागिराला दृष्टि देऊन त्याच्याकडून पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुती यांच्या सुंदर मूर्ती करवून घेतल्या. या मूर्ती शके १६०३ माघ वद्य ६ म्हणजे समर्थनिर्वाणाच्या चार दिवस आधी गडावर आल्या. शेजघरात असलेल्या मातीच्या सिंहासनावर या मूर्तींची स्थापना झाली. श्रीरामाच्या मूर्तीजवळ स्वतंत्र प्रभावळीत दासमारुतीची मूर्ती आहे. या मुर्तीजवळ रामदास स्वामींची छोटी प्रतिमा ठेवलेली आहे. श्रीराममूर्तीच्या समोर पितळी कलमदान असून ते समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर यांचे आहे असे सांगितले जाते. मंदिराचा सागवानी सभामंडप श्री गोवर्धनदास गुजर यांनी बांधलेला आहे. मंदिराचे सर्व मुख्य कार्यक्रम या सभामंडपातच होतात.

राममंदिराच्या खाली असलेल्या तळघरात समर्थांची समाधी आहे. ही समाधी कोणीही तयार केलेली नसून स्वयंभू समाधी आहे अशी मान्यता आहे. ज्या ठिकाणी समर्थांच्या देहावर अग्निसंस्कार केले, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही समाधी निर्माण झाली आहे. समाधी काळ्या पाषाणाची असून आयताकार आहे. समर्थांचे निर्वाण झाले तेव्हा कल्याणस्वामी डोमगावी होते. गडावर आल्यानंतर त्यांना समर्थांच्या निर्वाणाची बातमी समजताच शोक केला आणि समाधीपाशी जाऊन एकवार दर्शनाचा आग्रह धरला. त्यावेळी समाधी दुभंगून समर्थांनी कल्याणस्वामींना दर्शन दिले. ती चीर आजही समाधीवर दिसून येते. समाधीच्या मागील बाजूस असलेल्या कोनाड्यात पितळी पेटीत चंदनाच्या पादुका आहेत. या पादुका समर्थांना दत्तगुरुनी करवीर क्षेत्री दिल्याचे सांगितले जाते. समाधी फक्त पूजेच्या वेळी (सकाळी ७.३० ते ८.४५) विनाआच्छादित असते. इतर वेळी वस्त्र आणि फुले यांनी आच्छादलेली असते. समाधी स्थानावर पितळी मेघडंबरी आहे.

समर्थमठ व श्रीराममंदिर यांच्या सभोवती दगडी फरसबंदी पटांगण आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागे असलेल्या ओवऱ्यांपैकी एका ओवरीत वेणाबाईंचे वृंदावन आहे. वेणाबाई यांनी शके १६०० चैत्र वद्य १४ रोजी समर्थ रामदास स्वामींच्या समोर देहत्याग केला. या वृंदावनावर मारुतीची मूर्ती आहे. समर्थांच्या स्त्रीशिष्यांपैकी फक्त वेणाबाई यांनाच उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी होती. समर्थांनी मिरजेच्या मठाची व्यवस्था वेणाबाईंकडे सोपवली होती. वेणाबाईंनी उत्तम दर्जाच्या वाड्मयाची निर्मिती केली. तसेच एका ओवरीत मारुती आणि देवतांची स्थापना केली आहे. या वृंदावनाच्या जवळच असलेल्या भिंतीच्या कामासाठी एक वीरगळाचा वापर करण्यात आलेला आहे.

समर्थ मठासमोर असलेल्या अशोकवनाच्या जागी पूर्वी एक तळे होते. याच अशोकवनात आक्काबाईंचा मठ आहे. या मठात अक्काबाई यांचे वृंदावन आहे. समर्थांच्या मृत्यूनंतर चाफळ व सज्जनगड येथील दोन्ही मठांची आणि मंदिरांची व्यवस्था अक्काबाई यांनी उत्तमरीत्या सांभाळली. या अशोकवनात अजून एक तुळशीवृंदावन आहे.

मंदिर आणि मठ यांच्यामध्ये असलेल्या पश्चिम दिशेच्या दरवाज्याने बाहेर पडल्यावर दूरवर असलेले मारुती मंदिर नजरेस पडते. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरूजाजवळ हे मंदिर आहे. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणतात. या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी तटाच्या रक्षणार्थ केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त मंदिर, फरसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. एकांत आणि रामनामात वेळ घालवण्यासाठी ह्या मंदिरासारखी दुसरी जागा संपूर्ण गडावर नाही.

धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधीमंदिरावर परत येत असताना साधारणपणे मध्यावर तटाच्या कडेजवळ ब्रह्मपिसा स्थान आहे. येथे असलेल्या ओट्यावर हनुमानमूर्ती आहे. हे ठिकाण कल्याण स्वामींशी निगडीत आहे. कल्याण स्वामी हे समर्थांचे आवडते शिष्य आहेत ही गोष्ट काहीजणांना खटकत होती. त्यामुळे कल्याणस्वामींची योग्यता इतरांना पटवून देण्याचे समर्थांनी ठरवले. एकदा समर्थांनी सर्वांगाला शेंदूर फासला, मळवट भरून हातात तलवार घेऊन वेड लागल्याप्रमाणे शिष्यांच्या मागे धावत होते. कल्याण स्वामींना ही बातमी समजल्यावर लगोलग तिथे पोहोचले. कल्याण स्वामी येत आहेत हे बघून समर्थांनी तटावरून खाली उडी मारली आणि अवघड जागी बसले. समर्थांच्या पाठोपाठ कल्याण स्वामी देखील त्या अवघड जागी पोहोचले. तेव्हा समर्थ पळत जाऊन पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात लपून बसले. तेथेही कल्याण स्वामी जाऊन पोहोचले. हे बघून समर्थ कल्याण स्वामींच्या धावून गेले. “महाराज ! खुशाल मारा. अशा मरणाने मोक्षच मिळेल. आपल्या या लीलेवरून आपणास वेडे म्हणणारे लोकच वेडे आहेत. ” असे उद्गार कल्याण स्वामींनी काढले. कल्याण स्वामींचे उद्गार ऐकताच समर्थांची परीक्षा संपली आणि कल्याण स्वामींचे श्रेष्ठत्व सिध्द झाले. ज्या जागेवरून समर्थांनी उडी मारली तेथे एक कट्टा तयार करून त्याच्यावर मारुतीची स्थापना करण्यात आली.

किल्ल्यावर दासनवमी, रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपोर्णिमा, श्रीवेणाबाई पुण्यतिथी, अक्काबाई पुण्यतिथी, गणेशोत्सव, विजयादशमी, श्रीधरस्वामी पुण्यतिथी इ. दिवस गडावर साजरे केले जातात. किल्ल्यावर संस्थानाची निवासव्यवस्था आणि प्रसाद-भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक उपहारगृहेसुध्दा उपलब्ध आहेत. किल्ल्याचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे पुन्हा उघडले जातात.

समर्थ रामदास आणि त्यांचे कार्य अनुभवायचे असेल तर तर सज्जनगडला भेट दिलीच पाहिजे.

माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी |
परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर ||
नका करू खटपट |
पहा माझा ग्रंथ नीट |
तेणे सायुज्याची वात | गवसेली की ||
आत्माराम दासबोध |
माझे स्वरूप स्वत:सिध्द |
असता न करावा हो खेद | भक्तजनी ||

Creative Commons License

© Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा||, 2018. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to Pankaj Vijay Samel and ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.