सप्तमातृका

प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय

सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.

भुलेश्वर मंदिर

सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.

भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.

पाटेश्वर लेणी

सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात. शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.

वेरूळ लेणी

मातृकांचे वर्णन

ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस

वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड

भुलेश्वर लेणी

इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती

वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य (पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.

माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल

कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर

वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष

चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव

घारापुरी लेणी

वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.

राजा दिनकर केळकर संग्रहालय

महाराष्ट्रातील काही सप्तमातृका शिल्प

 • घारापुरी लेणी
 • वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
 • वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
 • भुलेश्वर मंदिर, यवत
 • पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका)
 • धर्मापुरीचा किल्ला, धर्मापुरी
 • औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
 • दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
 • छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
 • जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
 • राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
 • टाकळी ढोकेश्वरची लेणी
धर्मापुरी

संदर्भ

 • भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
 • भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
 • Iconography of the Saptamatrikas, O. P. Misra
 • Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.