वेरुळ गावातील अष्टभुजा विष्णू

पर्यटकांच्या कोलाहालापासून दूर वेरुळ गावात एका छोट्या देवळात विष्णूची अप्रतिम कोरीवकाम असलेली मूर्ती आहे. स्थानिकांच्या मते ही मूर्ती बाराव्या शतकात वेरुळ येथील एका शेतकऱ्याला शेतात नांगरणी करत असताना मिळाली आणि त्याने ती मूर्ती मल्हारस्वामींना दिली. वेरुळ महात्म्य अर्थात ब्रम्हसरोवर ग्रंथाचे रचनाकार श्री विनायक बुवा टोपरे यांच्या पूर्वजांपासून टोपरे घराणे अविरतपणे या मूर्तीची मनोभावे पूजाअर्चना व उत्सव परंपरा चालवते आहे. सध्या या मूर्तीची पूजा आणि उत्सव टोपरे घराण्यातील श्री डॉ. विनोदमहाराज टोपरे यांच्या देखरेखीखाली पार पाडले जातात. स्थानिक ग्रामस्थ या मूर्तीची हरिहर विठ्ठल म्हणून पूजा करतात.

डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रसिद्ध मंदिरशिल्प व मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मते हा उपेंद्र (विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प) आहे.

विष्णूप्रतिमा समभंग स्वरूपात आहे. मूर्ती सालंकृत (एकावली, यज्ञोपवित, कंकण मेखला इ. आभूषणे) असून डोक्यावर किरीट मुकुट आहे. मुकुटाच्या मागे प्रभावळ दाखवलेली आहे. मूर्ती अष्टभुजा असून उजव्या हातात पद्म, गदा, कट्यार, बाण आणि डाव्या हातात धनुष्य, चक्र, वज्र आणि शंख धारण केले आहे. ही मूर्ती साधारणपणे ९००-१,००० वर्षे जुनी असावी. या प्रतिमेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गदेवर कोरण्यात आलेला समुद्रमंथनाचा प्रसंग. शिल्पकाराने हा प्रसंग कमी जागेत उत्तमरीत्या कोरलेला आहे. मूर्तीच्या दोन्ही पायाजवळ स्त्रीसेविका कोरलेल्या आहेत. त्यातील डाव्या बाजूला असलेल्या चवरीधारी स्त्रीसेविकेपेक्षा उजव्या बाजूची सेविका उंचीला मोठी आहे.

डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात मंदिरशिल्प व मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मते हा उपेंद्र (विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प) आहे. विष्णू व इंद्र यांचे संयुक्त शिल्प असल्यामुळे मूर्तीच्या डाव्या हातात वज्र हे इंद्राचे आयुध दाखवले आहे. महाराष्ट्रात हरिहर (शिव व विष्णू यांचे संयुक्त शिल्प) अनेक ठिकाणी बघायला मिळतात, पण वेरूळ येथील उपेंद्र शिल्प महाराष्ट्रातील एकमेव असावे.

या मंदिराच्या गर्भगृहात दशावतारापैकी वराह आणि नरसिंह या दोन अवतारांच्या मुर्त्या आहेत. वराह आणि नरसिंह या दोन्ही मूर्ती पण अंदाजे ७००-८०० वर्ष जुन्या असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते.

मूर्तिशास्त्रात नरसिंह अवताराच्या १) गिरीजा-नरसिंह, २) स्थौन-नरसिंह आणि ३) यानक-नरसिंह अशा तीन मुर्तीप्रकारांचे वर्णन वाचायला मिळते. विष्णू मंदिरातील मूर्ती स्थौन-नरसिंह प्रकारची आहे. चतुर्भुज असलेला नरसिंह सिंहासनावर बसलेला असून त्याने मांडीवर असलेल्या हिरण्यकश्यपूचे पोट दोन्ही हातांनी फाडले आहे. इतर दोन्ही हातात चक्र आणि पद्म आहे. नरसिंहाच्या उजव्या पायाजवळ प्रल्हाद आणि डाव्या पायाजवळ स्त्रीदेवतेचे शिल्प आहे.

मूर्तिशास्त्रामध्ये वराह अवताराचे १) भूवराह (नृवराह), २) यज्ञवराह आणि ३) प्रलयवराह अशा तीन मुर्तीप्रकारांचे वर्णन केले आहे. भूवराह मूर्तीमध्ये धड वराहाचे आणि शरीर मानवी असते. भूवराह अलंकारांनी आभूषित असून मस्तकावर मुकुट धारण केला आहे. मूर्ती चतुर्भुज असून तीन हातात गदा, पद्म आणि चक्र इ. आयुधे धारण केलेली असून एक हात डाव्या मांडीजवळ आहे. प्रतिमेचा उजवा पाय जमिनीवर, तर डावा पाय आदिशेषाच्या मस्तकावर आहे. गदेच्या शेजारी स्त्रीदेवतेची प्रतिमा आहे.

संदर्भ

  • Iconography of the Hindus, Buddhists and Jains, R. S. Gupte, D. B. Taraporevala Sons & Co. Private Ltd., Mumbai, 1980
  • Temple Architecture and Sculpture of Maharashtra, G. B. Deglurkar, Aparant, Pune, 2019
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.

सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स