अनंतदेव याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय हे मुंबईतील आणि भारतातील एक प्रमुख संग्रहालय. संग्रहालय १९२२ साली सामान्य लोकांसाठी उघडे झाले. संग्रहालयात प्राचीन, मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भात अनेक पुरावशेष आहेत. हिंदू-जैन-बुध्द धर्माशी संबंधित शिल्पकला, वीरगळ, गध्देगाळ, शिलालेख, शस्त्रास्त्रे, विविध राजवंशाची नाणी, लघुचित्रे, सिंधूसंस्कृतीशी निगडीत पुरावशेष, प्रसिध्द चित्रकारांची चित्रे इ. अनेक गोष्टी संग्रहालयात सर्वसामान्यांना बघायला मिळतात. ह्या सर्व पुरावशेषांमध्ये महाराष्ट्रातील पहिला ज्ञात गद्धेगाळ आहे. या गद्धेगाळापासून महाराष्ट्रात गद्धेगाळ परंपरेला सुरुवात झाली असे सद्यपुराव्यावरून वाटते. प्राचीन महाराष्ट्रातील उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजवंशाच्या काळातील आहेत. ह्या गध्देगाळीची ओळख करून घेण्यापूर्वी शिलाहार राजवंशाबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया.

शिलाहार राजवंश

सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, अभीर इ. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या राजवंशांपैकी अजून एक महत्त्वाचा राजवंश म्हणजे शिलाहार. उपलब्ध शिलालेखांवरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शिलाहारांच्या दहा शाखांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य केले असे दिसून येते. त्यापैकी उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापूरचे शिलाहार ह्या तीन प्रमुख शाखा होत्या.

विहार  गद्धेगाळ महाराष्ट्रातील पहिला ज्ञात गद्धेगाळ आहे. या गद्धेगाळापासून महाराष्ट्रात गद्धेगाळ परंपरेला सुरुवात झाली असे सद्यपुराव्यावरून वाटते.

उत्तर कोकणच्या शिलाहारांचे ठाणे आणि रायगड प्रांतावर राज्य होते आणि त्यांची राजधानी श्रीस्थानक (आताचे ठाणे) होती. ह्या राजघराण्याचा पहिला राजा कपार्दिन पहिला आणि सोमेश्वर हा शेवटचा राजा. इ.स. ८०० ते १२६५ अशी सुमारे ४६५ वर्ष ह्या राजघराण्याची सत्ता ह्या प्रांतावर होती. शिलाहार राजघराणे राष्ट्रकुटांचे मांडलिक राजे म्हणून उदयाला आले. उत्तर शिलाहार राजघराण्याची स्थापना करणारा कपर्दिन पहिला हा राष्ट्रकुट राजा गोविंद तिसरा (सन ७९३-८१४) याच्या समकालीन. कपर्दिन पहिला याने गोविंद तिसरा याला उत्तर कोकणात राज्यविस्तारासाठी मोलाची मदत केली असावी आणि या मदतीबद्दल कपार्दिन पहिला याच्याकडे नवीन प्रांताची जबाबदारी सोपवली. महासामंत, कोकणवल्लभ, पश्चिमसमुद्राधिपती, कोकणचक्रवर्ती, महासामंताधिपती, तगरपुर परमेश्वर, सिलारनरेंद्र, त्यागजगझंप्यगुण, महामंडलेश्वर, स्वर्णगरुडध्वज, गंडरुध्दफोडी, गंडनारायण, मंडलिकत्रिनेत्र, महामंडलेश्वराधिपती, समस्तकोंकणभुवन इ. बिरुदे शिलाहार राजे लावत होते.

शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकणावर राज्य करत होती. ह्यांचे राज्य आत्ताचे गोवा, सावंतवाडी आणि रत्नागिरी ह्या भागात होते. ह्यांची राजधानी चंद्रपूर (आत्ताचे चांदोर) असावी असा अंदाज आहे. ह्यांच्या राज्याला सप्तकोकण असे ओळखले जात होते. सणफुल्ला हा ह्या राजघराण्याचा पहिला ज्ञात राजा, तर रट्टराजा हा शेवटचा ज्ञात राजा. ह्या राजघराण्याने साधारणपणे २६० वर्ष ह्या भागावर राज्य केले.

आत्ताच्या कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव प्रांतावर शिलाहारांची तिसरी शाखा राज्य करत होती. ह्या शाखेचे बरेचसे शिलालेख कोल्हापूर (प्राचीन क्षुल्लाकपूर) येथे मिळालेले असलेले असल्यामुळे ती त्यांची राजधानी असावी असे वाटते. जतीग पहिला हा पहिला आणि भोज दुसरा हा शेवटचा राजा. ह्या राजघराण्याची साधारणपणे २५० वर्ष ह्या भागावर सत्ता होती.

अनंतदेव (शक १००३ / सन १०८१) याचा शिलालेख असलेली विहार गध्देगाळ

ठाणे जिल्ह्यातील विहार येथे अनंतदेव याचा शिलालेख असलेली गध्देगाळ सापडली. सध्या ही गध्देगाळ छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात ठेवलेली आहे. ४’ x १’५” आकाराची गध्देगाळ वालुकाश्म दगडात कोरलेली आहे. गध्देगाळीचा वरचा भाग गोलाकार असून चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. नंतर शिलालेख असून त्याच्या खालती गाढव-स्त्री संकरशिल्प आणि खालच्या भागात अजून तीन ओळी कोरल्या आहेत. पण ह्या तीन ओळी पूर्णपणे अवाचनीय आहेत.

ह्या गध्देगाळीची आणि शिलालेखाची पहिली नोंद १८८२ साली प्रकाशित झालेल्या बॉम्बे गॅझेटीयर, Vol XIV मध्ये करण्यात आलेली आहे. त्यात शिलालेख शक १००३ (सन १०८१) आणि शिलाहार राजा अनंतदेव याच्या कारकिर्दीतील असल्याचे नमूद केले आहे.

अनंतदेव पहिला याचे विहार येथील शिलालेख शक १००३ (सन १०८१) आणि खारेपाटण ताम्रपट शक १०१६ (सन १०९५) असे दोन लेख उपलब्ध आहेत. खारेपाटण ताम्रपटात अनंतदेवाच्या नावाच्या आधी महामंडलेश्वराधिपती, पश्चिमसमुद्राधिपती व समस्तकोंकणभुवना अशी बिरुदे लावलेली आहेत. अनंतदेवाचे अनंतपाल हे अजून एक नाव आहे.

वाचन

संवतु (त्) १००३ महामण्डलेस्व (श्व) राध्दि (धि) पतिश्रीअनं-
तं (त) देव अमात्यरु[द्र]पैयेत्यादि श्रीकरणं (णम्) | विया–
डिकवंस (श) मावैयासुत अज्यपा नायकस्य खै-
रामणं यत्र सिध्दाय देणा पडणं गृहद्रम्म

अर्थ

संवत १००३ मध्ये महामंडलेश्वराधिपति श्रीअनंतदेव याच्या राजवटीत त्याचा अमात्य रुद्रपैय व इतर अधिकारी असताना, वियाडिक वंशातील मावैयाचा पुत्र अज्यपानायक याला खैरामण गावातील काही घरांची घरपट्टी द्रम्माच्या रुपात दान दिली.

लेख नागरी लिपीत कोरलेला असून भाषा संस्कृत असली तरी तिच्यावर मराठीचा प्रभाव आहे. ह्या लेखात खैरामण ह्या स्थानाचा उल्लेख आहे. पण हे स्थान नक्की कोणते हे कळून येत नाही. भगवानलाल इंद्राजी यांनी खरासण असे वाचले आणि त्याचा संदर्भ पारसी जमातीशी जोडला. डॉ. म. गो. दीक्षित यांनी खैरामणच्या ऐवजी वैणापटण असे वाचले आणि ते विहारचे जुने नाव असावे असे त्यांनी सुचवले. परंतु त्याला कोणताही पुरावा नाही आहे.

संदर्भ

  • Corpus Inscriptinum Indicarum Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
  • प्राचीन मराठी कोरीव लेख (संपादक: शं. गो. तुळपुळे)
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.