वाडिया कारंजे आणि क्लॉक टॉवर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पेरीन नरीमन रस्त्याने (जुना बझार गेट रोड) फिरोझशहा मेहता रोडवर जाताना रस्त्याच्या मधोमध अग्यारीसारखे दिसणारे बोमनजी होरमारजी वाडिया फाउंटन आणि क्लॉक टॉवरची वास्तू आपले लक्ष वेधून घेते.

१८५४ साली बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर रेल्वेवाहतुक सुरु झाल्यानंतर परिसरातील वाहतूक आणि लोकांची वर्दळ यांच्यात भरपूर वाढ झाली. फोर्ट परिसरात येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी लोकवर्गणीतून बोमनजी होरमारजी वाडिया फाउंटन व क्लॉक टॉवरची उभारणी करण्यात आली. नामांकित व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकवर्गणीतून उभारले मुंबईतील हे एकमेव फाउंटन आहे.

नाना शंकरशेठ, लोकहितवादी, फ्रामजी कावसजी, जमशेटजी जीजीभॉय इ. नामांकित व्यक्तींच्या बरोबर बोमनजी होरमारजी वाडिया यांचे मुंबईच्या (तत्कालीन बॉम्बे) शैक्षणिक जडणघडणीतील योगदान विसरता येत नाही.

कारंज्याच्या दर्शनी भागात लमास्सु (अर्धा भाग दाढी असलेल्या पुरुषाचा आणि अर्धा भाग पंख असलेल्या बैलाचा) या काल्पनिक प्राण्याच्या आठ दगडी प्रतिमा चार दिशांना आहेत. लमास्सु पारशी धर्मातील संरक्षक देवता असून त्यांना पवित्र मानले जाते.

जस्टीस ऑफ पिस (सन १८३४-१८४५), बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एलफिस्टन इन्स्टिट्यूट (सन १८४२) सेव्हिंग बँकचे संचालक (सन १८३५), नंतरच्या काळात स्मॉल कॉज कोर्टात रुपांतरीत झालेल्या कोर्ट ऑफ रिक्वेस्टचे आयुक्त (सन १८३९), ग्रेट इंडिअन पेनिन्सुलर रेल्वे या कंपनीचे संचालक, बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य (सन १८५०), बॉम्बे प्रेसिडन्सीमधील बॉम्बे असोसिएशन या राजकीय संस्थेचे उपाध्यक्ष (सन १८५२) आणि  सन १८५९ मध्ये मुंबईचे शेरीफ इ. मानाची पदे बोमनजी यांनी भूषवली होते. युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बेने त्यांची १८५७ साली फेलो म्हणून नियुक्ती केली.

३ जुलै १८६२ रोजी बोमनजी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या हितचिंतकांनी बोमनजी यांच्या नावाने शिष्यवृत्ती आणि पिण्याच्या पाण्याचे फाउंटन उभारायचे असे ठरवले. जेम जमशेदमध्ये वरील कार्यासाठी देणगी दिलेल्या पारशी लोकांची नावे दिलेली आहेत. भव्य क्लॉक टॉवर असलेले फाउंटन बांधण्यासाठी ३ मे १८७२ रोजी समितीची स्थापन करण्यात आली. सचिव सोराबजी शापूरजी बेंगाली यांच्या देखरेखीखाली फाउंटन उभारण्यासाठी निधी जमा करण्यात आला.

बझारगेट येथील क्लॉक टॉवर असलेले फाउंटनचे बांधकाम १८८० साली सुरु झाले. महापालिकेचे मुख्य अभियंता रीएन्जी वॉलटन यांनी फाउंटनचा आराखडा बनवला आणि त्यांच्याच देखरेखीखाली कामाची सुरुवात झाली. सोराबजी बेंगाली यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार क्लॉक टॉवरसाठी रु १९,४५१ खर्च आला. तसेच पर्सेपोलिस शैलीचा (प्राचीन पर्शिया) वापर ह्या क्लॉक टॉवरच्या बांधकाम शैलीत करावा अशी सूचना केली होती. फाउंटनचे काम १८८२ साली पूर्ण झाले.

हे फाउंटन अधिक (+) चिन्हाप्रमाणे आहे. जोत्याची उंची अंदाजे २-२.५ फुट त्याच्यासाठी करड्या रंगाच्या बॅसॉल्ट दगडाचा वापर केला आहे. कारंज्याच्या दर्शनी भागात लमास्सु (अर्धा भाग दाढी असलेल्या पुरुषाचा आणि अर्धा भाग पंख असलेल्या बैलाचा) या काल्पनिक प्राण्याच्या आठ दगडी प्रतिमा चार दिशांना आहेत. लमास्सु पारशी धर्मातील संरक्षक देवता असून त्यांना पवित्र मानले जाते. कधीकधी बैलाऐवजी सिंहाचा भाग असतो. पारसी अग्यारींच्या दर्शनी भागात लमास्सु प्रतिमा प्रामुख्याने बघायला मिळतात. बॅसॉल्ट दगडातील ह्या आठ प्रतिमा लांबून बघितल्यास फाउंटनचे आधारस्तंभ वाटतात.

फाउंटनला चार दिशांना चार दरवाजे आहेत. उत्तरेकडील दरवाज्यावर असलेल्या संगमरवरी दगडावर इंग्रजी आणि गुजराथी भाषेत ह्या स्मारकाबद्दल माहिती कोरून ठेवली आहे. पर्शियातील बेहस्तून येथील साधारणपणे २५०० वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील काही भाग उरलेल्या तीन दरवाज्यांच्यावर असलेल्या संगमरवरी दगडावर क्युनिफॉर्म लिपीत कोरून ठेवला आहे. खिडक्या आणि तावदानांचा वापर केल्यामुळे स्मारकाच्या आतील भागात सूर्यप्रकाश पोहोचण्यास आणि हवा खेळती राहण्यास मदत होते. ह्या दालनात ब्रिटीशकालीन पाण्याची विहीर, तोट्या आणि नळजोडणी साहित्य आहे.

छतावर मध्यभागी असलेला आयताकार चबुतरा दोन भागात विभागला आहे. चबुतऱ्याच्या शिर्षभागावर झोराष्ट्रीयन लोकांसाठी पवित्र असलेल्या अग्नीचे प्रतीकात्मक शिल्प आहे.चबुतऱ्याच्या चारही दिशांना वर्तुळाकार घड्याळे बसवली असल्यामुळे लोकांना वेळ समजण्यास मदत होते.

मधल्या काळात दुर्लक्षित राहिल्यामुळे फाउंटन मोडकळीस आले होते. २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात फाउंटनचे नूतनीकरण करण्यात आले. लोकांसाठी लोकवर्गणीतून बांधलेल्या वास्तूला लोकांपासून वाचवण्यासाठी, तिचा दुरुपयोग/नासधूस होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधून कडीकुलुपात ठेवावे लागत असेल तर आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल.

संदर्भ

  • Shirgaonkar, Varsha S. 2011 Exploring the Water heritage of Mumbai, Aryan Books International
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.