वेलिंग्टन कारंजे

संपूर्ण भारताची सत्ता ब्रिटीशांच्या हातात आल्यानंतर मुंबईची (तेव्हाचे बॉम्बे) आर्थिक राजधानी म्हणून भरभराट होण्यास सुरुवात झाली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांनी सन १६८६ ते १७४३ या काळात मुंबई फोर्टच्या आजूबाजूला बांधलेली तटबंदी पाडून टाकली आणि मुंबईच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सर फ्रियर यांनी रस्ते रुंदीकरण, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य व्यवस्था इ. कामे करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक इमारतींच्या बांधकामाचे कामसुद्धा चालू केले. फ्लोरा फाऊंटन परिसरात सार्वजनिक इमारतींबरोबर वाहतूक बेटे, पुतळे, उद्याने, टाऊन हॉल, मोकळी मैदाने, सिनेमागृह/नाट्यगृह इ. अनेक शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वास्तूंच्या उभारणीचे काम चालू होते.

आर्थर वेलस्ली किंवा ड्युक ऑफ वेलिंग्टन यांनी सात राष्ट्रांच्या सैन्याचे नेतृत्व करत वाॅटरलू लढाईमध्ये फ्रान्सचा अजिंक्य राजा नेपोलियन बोनापार्ट याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याचा पराभव केला.

मुंबईत गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कार्यकालात (सन १८६२ – १८६७) व्हिक्टोरियन गॉथिक व निओ क्लासिकल शैलीत अनेक सार्वजनिक इमारती बांधल्या गेल्या. मुंबईचे सौंदर्य वाढवणाऱ्या सार्वजनिक इमारतींबरोबर कलात्मक कारंज्याना विसरून चालणार नाही. ब्रिटीशकाळात मुंबईत सुमारे ५० कारंजी होती. यातील काही कारंजी सरकारी खर्चातून बांधली गेली आहेत, तर काही स्मरणार्थ बांधली आहेत. फ्लोरा फाउंटन (१८६४), वेलिंग्टन फाउंटन (१८६५), भाटीया बाग फाऊंटन (१८६५), फित्झगेराल्ड फाऊंटन (१८६७), केशवजी नाईक फाउंटन (१८७६), हेनरी मेमोरियल फाउंटन (१८७८), बोमनजी होरमरजी वाडिया फाऊंटन व क्लॉक टॉवर (१८८०), रतनसी मुलजी जेठा फाउंटन (१८९४), क्राॅफर्ड मार्केटमधील फाउंटन, मुंबादेवी येथील फाऊंटन (१८९८) इ. मुंबईत असलेल्या काही परिचित आणि परिचित कारंज्यांची नावे. यातील काही कारंजी काळाच्या ओघात आपले अस्तित्व गमावून बसली आहेत, तर काही अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रोड, शहीद भगत सिंग रोड आणि महात्मा गांधी रोड हे तीन रस्ते ज्याठिकाणी एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणी मुंबईतील सर्वात मोठा श्यामप्रसाद मुखर्जी चौक आहे. ह्याच चौकात आहे वेलिंग्टन कारंजे. पण ज्यांच्या नावाने हे कारंजे उभारले ती व्यक्ती कोण होती?

आर्थर वेलस्ली अर्थात ड्युक ऑफ वेलिंग्टन हे नावाजलेले ब्रिटीश सैन्याधिकारी आणि राजकारणी. आर्थर वेलस्ली यांनी आपल्या सैनिकी कारकिर्दीत साधारणपणे ६० लढायांचे नेतृत्व केले आणि त्यातील बऱ्याच लढायांमध्ये त्यांना विजय मिळाला होता. भारतातील कार्यकालात त्यांनी चौथ्या ब्रिटीश-मैसूर आणि दुसऱ्या मराठा-ब्रिटीश युध्दाचे नेतृत्व केले होते. या दोन्ही युध्दात ब्रिटिशांना विजय मिळाला होता. परंतु, आर्थर वेलस्ली लक्षात राहतात ते सन १८१५ मध्ये झालेल्या वाॅटरलू लढाईमुळे. ड्युक ऑफ वेलिंग्टन यांनी सात राष्ट्रांच्या सैन्याचे नेतृत्व करत वाॅटरलू लढाईमध्ये फ्रान्सचा अजिंक्य राजा नेपोलियन बोनापार्ट याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याचा पराभव केला होता आणि नेपोलियन याला जेरबंदी केले होते. वाॅटरलू लढाईच्या आधी झालेल्या सर्व लढाया नेपोलियनने जिंकल्या होत्या. त्यामुळे नेपोलियनचा पराभव करुन त्याला जेरबंदी करणे हा आर्थर वेलस्ली याच्या सैनिकी कारकिर्दीतील परमोच्च बिंदू होता. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आर्थर वेलस्ली यांनी राजकारणात प्रवेश केला व दोनदा इंग्लंडचे पंतप्रधान पद भूषवले होते.

आर्थर वेलस्ली यांची सन १७९७ ते १८०५ या काळात भारतात नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात सन १८०१ व १८०४ मध्ये त्यांनी मुंबईला भेट दिली होती. भारतातील दुष्काळावर लिखाण करणारे आर्थर वेलस्ली हे बहुदा पहिले ब्रिटीश अधिकारी असावेत. आर्थर वेलस्ली यांचा १४ सप्टेंबर १८५२ या दिवशी मृत्यू झाला. ३१ जानेवारी १८५३ रोजी टाऊन हॉल येथे लॉर्ड फॉकलॅण्ड यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या सभेत ड्युक ऑफ वेलिंग्टन यांच्या मुंबईभेटीची  आठवण कायम राहावी म्हणून स्मारक उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला स्मृतीस्तंभाचा विचार होता, परंतु १९ मार्च १८६० च्या बैठकीत कारंजे उभारण्याचा निर्णय झाला. मुंबई भेटीत आर्थर वेलस्ली यांचा मुक्काम एस्प्लनेड परिसरात असे आणि म्हणूनच एस्प्लनेडपासून जवळच असलेल्या सध्याच्या जागेत कारंजे उभारले असावे. लेफ्टनंट कोलोनल स्कॉट हे कारंज्याचे स्थापत्यकार. कारंज्याच्या बांधकामासाठी आणि त्यावरील चार दिव्यांसाठी रु११,१२६ खर्च आला. कॅप्टन फुलर याने आराखड्यात बदल करून चार दिव्यांऐवजी आठ दिवे लावण्याची केलेली सूचना मंजूर करण्यात आली. चार दिव्यांचा वाढीव खर्च रु१,००० लोकवर्गणीतून करावा असे सांगण्यात आले. कारंज्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेले दिवे इंग्लंडवरून मागवण्यात आलेले होते. कारंज्याचे काम १८६५ साली पूर्ण झाले. दिव्यांसाठी गॅस आणि पाण्याची सोय झाल्यानंतर ११ मे  १८६६ रोजी फाउंटन सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. मुंबईतील वाहतूक वाढू लागल्यानंतर हे कारंजे सध्याच्या जागेवरून हलवून नविन जागेत स्थलांतरीत करण्याचे प्रस्ताव सन १८८८ व १९०९ करण्यात आले होते. पण काही कारणास्तव हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाही. मुंबईतील हे एकमेव कारंजे आहे ज्याच्याबद्दल भरपूर पत्रव्यवहार उपलब्ध आहे. १८९२ सालातील एका पत्रात “ही एक पाणपोई आहे त्याचबरोबर एक सार्वजनिक वास्तुसुध्दा आहे” असे नमूद करण्यात आले आहे.

जमिनीलगत असलेला दगडी अष्टकोनी हौद अंदाजे १०-१२ मीटर व्यासाचा आणि २-२.५ फुट खोल आहे. दगडी हौदाच्या मध्यभागी असलेल्या दगडी स्तंभावर संगमरवरी दगडातील ड्युक ऑफ वेलिंग्टन आर्थर वेलस्ली याची अर्धउठावातील प्रतिमा आणि त्याच्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त झालेल्या काही महत्त्वाच्या लढायांचे दाखले शिल्परुपात बघायला मिळतात. दगडी स्तंभाच्यावर खोलगट तबकडी आहे. ह्या तबकडीच्या बाह्यभागावर आणि किनारीपट्टीवर सुंदर असे कोरीवकाम केले आहे. दगडी तबकडीच्या मध्यभागी ओतीव लोखंडाचा स्तंभ असून त्याच्यावर पानांचे नक्षीकाम केले आहे. काळ्या रंगांतील पानांच्या किनाऱ्यावर सोनेरी रंग दिलेला असल्यामुळे फाउंटनच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे. लोखंडी स्तंभांच्या वर अजून एक लहान तबकडी आहे. या तबकडीच्या मध्यभागी असलेल्या स्तंभावर पानांची कलात्मक रचना केली आहे. फाउंटनच्या शिखरावर असलेल्या फवाऱ्यातून उसळणारे पाणी पहिल्यांदा लहान तबकडीत, नंतर मोठ्या तबकडीत आणि मोठ्या सर्वात शेवटी जमिनीलगत असलेल्या मोठ्या दगडी हौदात जमा होते.

परिसरात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (कावसजी जहांगीर हॉल) महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाची इमारत (रॉयल ऑल्फ्रेड सेलर्स होम), मॅजेस्टिक हाउस, रिगल सिनेमागृह, एल्फिन्स्टन कॉलेज, जहांगीर आर्ट गॅलरी, डेव्हिड ससून लायब्ररी, वॅटसन हॉटेल इ. उतमोत्तम सार्वजनिक इमारती आहेत. या इमारतींबरोबर चौकात असलेल्या वेलिंग्टन फाउंटनमुळे या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

संदर्भ

  • Shirgaonkar, Varsha S. 2011 Exploring the Water heritage of Mumbai, Aryan Books International
Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2019. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.