कोळीवाड्यात लपलेला वरळी किल्ला

मुंबई बेट सुरक्षित करण्यासाठी पोर्तुगीजांनी मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले, त्यापैकीच वरळी कोळीवाड्यातील छोट्याश्या टेकडीवर बांधलेला हा वरळीचा किल्ला. वांद्रे-वरळी सीलिंकवरून जाताना ह्या किल्ल्यावर घंटा लावण्यासाठी असलेला मनोरा लक्ष वेधून घेतो आणि किल्ल्याबद्दल असलेली उत्सुकता आणखीन वाढते.

वरळीच्या किल्ल्याची बांधणी पोर्तुगीजांनी १५६१ साली केली. तळाकडे जाड होत जाणाऱ्या तटबंदीच्या भिंती, त्रिकोणाकृती बुरुज आणि ह्या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी मनोरा इ. पोर्तुगीजकालीन स्थापत्याची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यात दिसून येतात. मुंबई बेट पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाले त्यावेळी ह्या किल्लाचा ताबा ब्रिटीशांना मिळाला. ब्रिटन आणि फ्रांस यांच्या दरम्यान झालेल्या सप्तवार्षिक युध्दात वरळी किल्ल्यावर जादा शिबंदी आणि तोफा ठेवण्यात आल्या होत्या असे उल्लेख मिळतात.

वरळी कोळीवाड्यातील छोट्याश्या रस्त्याने जेव्हा आपण किल्ल्याच्या समोर येतो, तेव्हा सगळ्यात पहिले लक्ष जाते ते किल्ल्याच्या तटबंदीकडे. हा किल्ला साधारणपणे १.५० मीटर उंचीच्या जोत्यावर बांधला आहे. जोत्याच्या भिंती तटबंदी सारख्याच उताराच्या आहेत. किल्ल्याच्या दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या सुरुवातीला जोत्याच्या उंचीपर्यंत आणि नंतर दरवाजाच्या उंचीपर्यंत जातात.

किल्ल्याचा दरवाजा चार मीटर रुंदीच्या तटबंदीच्या भिंतीतून एखाद्या बोगद्यासारखा ठेवण्यात आला आहे. दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर दोन कौलारू खोल्या, उत्तरेकडील खोलीलगतच्या तटबंदीमध्ये असेलेली आणखीन एक खोली आणि ह्या खोलीसमोर असलेली गोड्या पाण्याची विहीर व तटबंदीवर जाण्यासाठी जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. किल्ल्यात एवढेच  बांधकाम / अवशेष आहे. तटबंदीमध्ये असलेल्या खोलीचा वापर बहुधा दारुगोळा आणि बंदुका ठेवण्यासाठी केला जात असावा.

तटबंदीला लागून असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तटावरील गस्तीमार्गावर जाता येते. हा गस्तीमार्ग तटबंदीच्या चार मीटर रुंदीमुळे तयार झाला आहे. किल्ल्याला साधारणपणे चार मीटर रुंदीचा गस्तीमार्ग आणि त्याला अंदाजे १ मीटर उंचीचा कठडा आहे. कठड्यामध्ये तोफा ठेवण्याकरिता १५ खाचा आहेत. या खाचांच्या खालील भागात पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे. खाचांच्या दोन्ही बाजूला आयताकार कट्ट्यांची उभारणी केली आहे. दोन खाचांच्या मधल्या भागात अर्धवट झाकलेले कोनाडे असून यांच्या तळाकडील भागात दिवे ठेवण्यासाठी गोलाकार खाचा आहेत. दिव्यांच्या उजेडाचा उपयोग फक्त पहाऱ्यावरील शिपायांनाच होईल, किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने प्रकाश दिसणार नाही अशी ह्या दिव्याच्या खाचांची रचना आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूला त्रिकोणाकृती बुरुज असून या बुरुजावर घंटा बांधण्यासाठी दगडी मनोरा बांधलेला आहे.

किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात चौकोनी आकाराची विहीर आहे. विहिरीचा आतील भाग तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असून विहिरीला वर्षभर पाणी असते. मुंबई बेट आणि परिसरात पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी गोड्या पाण्याची विहीर असलेला हा एकमेव किल्ला असावा आणि हे ह्या किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.

लष्करीदृष्ट्या वरळी किल्ला मोक्याच्या जागी आहे. माहिम भागातील समुद्रकिनारा उलट्या C सारखा आहे. या उलट्या C च्या दोन टोकांवर आहेत वांद्रे किल्ला आणि वरळी किल्ला. पोर्तुगीज काळात मुंबई सात बेटांची होती. वरळी व बांद्रे समुद्रालगतची बेटे असल्यामुळे ह्या दोन्ही बेटांचे सामरिक महत्त्व पोर्तुगीजांनी ओळखले होते आणि म्हणून त्यांनी वरळी, बांद्रे आणि मध्यभागी माहीमच्या किल्ल्याची उभारणी केली. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर नियंत्रण आणि समुद्रातील दळणवळणावर लक्ष ठेवणे हे ह्या किल्ल्याचे मुख्य काम.

वरळी किल्ला म्हणजे छोटी चौकी आहे, पण मोक्याच्या जागी असल्यामुळे वरळीच्या चौकीवजा किल्ल्याला भरपूर महत्त्व होते. तसेच मुंबई परिसरातील हा एकमेव किल्ला आहे ज्याची बाह्य तटबंदी आणि पोर्तुगीजकालीन अवशेष दिमाखात उभे आहेत. हेच ह्या किल्ल्याला भेट देण्याचे मुख्य कारण आहे. एकेकाळी शत्रूला धडकी भरवणारा हा किल्ला आपल्याकडे वारसास्थळांचे महत्त्व व जतन यांची माहिती नसल्यामुळे किल्ल्याचा बाह्यभाग कचरा व घाण यांच्या दुष्टचक्रात अडकला आहे.

Creative Commons License

© ||महाराष्ट्र देशा||, 2020. Unauthorized use and/or duplication of this material without express and written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to ||महाराष्ट्र देशा|| with appropriate and specific direction to the original content.